एकनिष्ठ एकलव्य

ज्या ज्या वेळी धनुष्य, धनुर्धारी अन् धनुष्यविद्येचा विषय निघतो; त्या वेळी ज्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही, तो एकमेव धनुर्धर म्हणजेच एकलव्य! त्या वेळी ज्या एकलव्याकडे गुरू द्रोणाचार्य ह्यांनी जर त्या तशा गुरुदक्षिणेची मागणी केली नसती; तर अर्जुनाच्या जागी तो भिल्लपुत्र एकलव्य हाच जगातला सर्वांत श्रेष्ठ असा धनुर्धर ठरला असता.

गुरू द्रोणाचार्य हे कौरव-पांडवांना ती धनुर्विद्या शिकवीत होते, त्या वेळेची ही गोष्ट. – केवळ हस्तिनापूरच्या राजकुमारांनाच धनुर्विद्या शिकवायची, अशी द्रोणाचार्याना खास राजाज्ञाच होती. त्यानुसार जवळच्याच अरण्यात कौरव-पांडव राजपुत्रांना घेऊन जात. तिथे ते त्यांना ह्या कलेचे पाठ देत. धनुष्य कसं उचलायचं? त्याच्यावर बाण कसा लावायचा? धनुष्याची दोरी कशी अन् किती ओढायची? आपल्या लक्ष्यावर लक्ष कसं केंद्रित करायचं? ह्या अन् अशा बऱ्याच गोष्टी ते अत्यंत बारकाईने शिकवीत होते.

राजकुमारांकडून त्या सर्व गोष्टी लक्षपूर्वक करवून घेत, गुरुजी त्यांना त्या कलेत परिपूर्ण करीत होते. एक दिवस असाच मुलांचा अभ्यास सुरू असताना अचानक एक भिल्ल पोर पुढे आला अन् हात जोडून गुरू द्रोणाचार्यांना तो म्हणाला, “गुरुदेव! मी एक भिल्लपुत्र आहे. मलाही धनुर्विद्या शिकायची फार आवड आहे. आपण कृपा करून मला ही विद्या शिकवाल का? मी त्यासाठीच आपल्याकडे आलो आहे.” एकलव्याचं बोलणं ऐकून सर्वच कुमारांना आश्चर्य वाटलं.

कौरवांमधील एकानं तर, “अरे, तू तर साधा भिल्लपुत्र आहेस; तुला काय करायचं आहे, ही कला शिकून?” असं म्हणून त्याचा उपहासही केला. खरं तर त्या बालकाची ती विनंती गुरू म्हणून द्रोणाचार्यांना मोडवत नव्हती. पण केवळ राजकुमारांशिवाय अन्य कुणालाही ही कला शिकवायची नाही, ह्या राजाज्ञेत त्यांचे हात अडकले होते. “बाळा, तुझी ही विनंती, शिकण्याची ओढ, तुझी ज्ञानजिज्ञासा हे पाहून खरं तर, मला तुलाही कला शिकवायला फार आवडलं असतं. पण काय करू? ह्या राजपुत्रांशिवाय अन्य कुणालाही ती कला शिकविण्याची मला परवानगी नाही रे बाळ!…. तेव्हा….” एकलव्यानं द्रोणाचार्यांचे ते शब्द ऐकले आणि त्याला फार वाईट वाटलं. त्याची घोर निराशा झाली.

पण त्याला मात्र त्यांचा राग आला नाही. उलट गुरू-द्रोणाचार्य यांना विनम्रभावे वंदन करीत तो म्हणाला, “जशी तुमची इच्छा; पण गुरुदेव मी मनोमन तुम्हाला माझे गुरू मानले आहे. आता माझी एवढीच विनंती आहे की, आपण मला आपला माना अन् फक्त गुरुकृपेचा आशीर्वाद द्या.” पायी विनम्र झालेल्या त्या आर्त, मुमुक्षू, जिज्ञासू अन् ज्ञानार्थी बालकाला गुरू द्रोणाचार्य ह्यांनी आशीर्वाद दिला, तो पण मूकपणेच! आणि एकलव्य जसा आला तसाच दूर निघून गेला. एकलव्याने दुसऱ्या दिवशी वनात जाऊन एक छान जागा निवडली.

तिथंच एक चबुतरा वजा खडकावर त्याने द्रोणाचार्यांचा एक मातीचा पुतळा बनवला. त्या पुतळ्याला वंदन करून, त्यांना गरू मानन, तेच आपल्याला शिकवीत आहेत. अशा एकनिष्ठ भावाने त्याने आपला धनुर्विद्येचा अभ्यास केला. मागे त्याने जे जे दूर उभे राहून पाहिले होते, गुरू द्रोणाचार्य हे मुलांना जे शिकवीत सांगत, ते-ते सर्व त्याने जीवाचे कान करून ऐकले होते. सूक्ष्म निरीक्षणाने अनेक गोष्टी पाहिल्या होत्या. त्या सर्व गोष्टी आता तो गुरूंच्या पुतळ्याच्या साक्षीनं प्रयत्नपूर्वक आत्मसात करीत होता.

प्रयत्न, अभ्यास अन् गुरुकृपा ह्याच्या बळावर तो भिल्ल- पुत्र एकलव्य लवकरच धनुर्विद्येत मोठा तरबेज झाला एक दिवस द्रोणाचार्य हे राजकुमारांना घेऊन नेमके त्याच जंगलभागात आले. त्यांच्या सोबत एक कुत्रा पण होता. गुरू द्रोणाचार्य ह्यांच्या मार्गदर्शनाखाली राजपुत्रांचा सराव सुरू होता. तोच दूरवर गेलेला त्यांचा कुत्रा समोर आला…. आणि सारे कुमार आश्चर्यचकित होऊन पाहताच राहिले. कुणीतरी त्या कुत्र्याच्या तोंडावर सात बाण अशा कौशल्याने मारले होते की, कुत्र्याच्या तोंडाला एकही जखम नव्हती; पण तोंडावरच्या त्या सात बाणांच्या जाळ्यामुळे त्या कुत्र्याला भुंकता मात्र येत नव्हते. ते कौशल्य पाहिलं मात्र आणि धनुर्धारी अर्जुन पण संभ्रमात पडला. नकळत तो बोलून गेला, “गुरुदेव, हे तर मलाही करता येणे शक्य नाही.

याचाच अर्थ असा की, माझ्यापेक्षाही अन्य कुणी तरी श्रेष्ठ…” “नाही अर्जुना, नाही. तुझ्याशिवाय अन्य कुणी श्रेष्ठ धनुर्धर होऊच शकत नाही. चला आपण जरा शोध घेऊ या”, असे म्हणून गुरू द्रोणाचार्य हे कुमारांसह त्या धनुर्धराच्या शोधात निघाले. द्रोणाचार्य अन् कुमार मागे, तर तो कुत्रा पुढे- असे सारे जण नेमके त्याच जागी येऊन पाहतात तो कायहा एक मातीचा द्रोणाचार्यांचा पुतळा! त्या पुतळ्याच्या गळ्यात ताज्या वनफुलांचा एक हार आणि त्या पुतळ्यासमोर धनुर्विद्येचा अभ्यास करणारा तो भिल्लपुत्र, एकलव्य.

त्याची श्रद्धा एकाग्रता अन् कुत्र्याच्या तोंडात त्यानेच मारलेले ते सात बाण हे कसब ओळखले अन् द्रोणाचार्य भारावून त्याच्याकडे आले. कसलासा आवाज झाला. एकाग्र एकलव्य भानावर आला. त्याने समोर पाहिले तो काय- समक्ष द्रोणाचार्य समोर उभे! त्यांना पाहताच एकलव्य पुढे आला. त्याने त्यांचे पदवंदन केले. द्रोणाचार्यांनी न राहवून चटकन् त्याला विचारले, “बाळा! अरे, तुला हे धनुर्विद्येचे ज्ञान कुणी दिले, कुणी शिकवले?” तेव्हा तो म्हणाला, “कुणी म्हणजे काय, तुम्हीच!” “अरे बाबा, मी तर इथे कधीच आलो नाही.

राजकुमारांना सोडून मी अन्य कुणालाही ही कला शिकविली नाही.” तेव्हा शांतपणे एकलव्य म्हणाला, “गुरुजी, आपण इथे आला नाहीत, पण ह्या मातीच्या पुतळ्यामधून माझ्यावर जी कृपा झाली ना, त्या कृपेमधूनच मी हे सर्व शिकलो आहे. माझी श्रद्धा-निष्ठा, एकाग्रता हीच माझी गुरू!” द्रोणाचार्य तिथे आले नव्हते, हे सत्य असलं तरी, त्या भिल्लपुत्राला त्याच्या निष्ठेने मात्र खरंच सर्वश्रेष्ठ धनुर्धर ठरण्याचा मान मात्र नक्की मिळाला होता. गुरू द्रोणाचार्यांनी जरी तसं बोलून दाखवलं नसलं, तरी त्यांना हे पटलं होतं की, अर्जुनापेक्षाही अन्य कुणीतरी श्रेष्ठ आहे.

पण ते सिद्ध झालं तर ‘अर्जुना! तुझ्यापेक्षा अन्य कुणी श्रेष्ठ असूच शकत नाही.’ असं जे अभिवचन दिलं त्याचं काय? आणि दुसऱ्याच क्षणी द्रोणाचार्यांनी त्या एकलव्याकडे त्या विलक्षण गुरुदक्षिणेची मागणी केली. ती मागणी ऐकूनही एकलव्य शांत व स्थिर होता. त्यानं गुरुवंदन केलं आणि पुढच्याच क्षणी आपल्या उजव्या हाताचा अंगठा कापून गुरुचरणांवर ठेवला.

द्रोणाचार्यानी एकलव्याचं ते धाडस, निष्ठा, गुरुभक्ती पाहिली आणि त्यांचे डोळे भरून आले. एकलव्याला पोटाशी घेत ते म्हणाले, “बाळा! खरंच तू श्रेष्ठ आहेस, धन्य आहेस. अवघं जग हा तुझा त्याग कधीच विसरू शकणार नाही.”

तात्पर्य : विद्यार्थ्यांकडे एकलव्यासारखी निष्ठा, श्रद्धा हवी. त्यांनी एकलव्यासारखा आदर्श सदैव समोर ठेवावा, व स्वयंसिद्ध व्हावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: