एक गड घेतला, पण एक सिंह गमावला!

सन १६७० चा काळ. शिवाजी महाराज आग्ऱ्याहन सुखरूप परत आले त्याला आता चार वर्षे झाली. महाराजांची महत्त्वाकांक्षा डोळे विस्फारून सगळीकडे पाहत होती. मांसाहेबांची (जिजामातांची) हीच महत्त्वाकांक्षा होती. अगदी तेजस्वी, गप्प न बसणारी. भारतभूमी स्वाधीन असावी यवनमुक्त असावी हीच त्यांची इच्छा होती. हेच त्यांचे सुख होते. मांसाहेब राजगडावरच राहत होत्या. पद्मावती माचीवर ईशान्येस त्यांचा वाडा होता. या वाड्याचे तोंड ईशान्येला व दरवाजा उत्तरेला होता.

या वाड्यातून मांसाहेबांची नजर अगदी सहज ईशान्येला सहा कोस दूर असलेल्या एका अभेद्य प्रचंड किल्ल्यावर जाई. तो किल्ला होता कोंढाणा (सिंहगड). या गडावर मांसाहेबांचे व शिवाजी महाराजांचे फार प्रेम होते, पण हा गड स्वराज्यात नाही. आपल्या ताब्यात नाही. गडावर यवनांचा हिरवा ध्वज फडकतोय. मांसाहेबांच्या मनाला ही फार मोठी बोच होती. पूर्वी हा गड स्वराज्यात होता.

शहाजीराजे विजापूरच्या कैदेत होते. त्या वेळी महाराजांनी केवळ नाईलाजाने हा गड विजापूरच्या हवाली केला. शहाजीराजांची सुटका झाल्यावर महाराजांनी काही वर्षांतच हा किल्ला आदिलशाहकडून जिंकून घेतला होता, परंतु जयसिंगाबरोबर झालेल्या पुरंदर तहामुळे हा किल्ला पुन्हा मोंगलांना द्यावा लागला. या किल्ल्याचे महत्त्व मांसाहेबांना नक्की वाटत होते. हा किल्ला स्वराज्यात असलाच पाहिजे, ही त्यांची इच्छा होती आणि एक दिवस मांसाहेब महाराजांना म्हणाल्या, “शिवबा, हा समोरचा कोंढाणा जिंकून घेणे.” कोंढाणा स्वराज्यात आणायचाच असा दृढसंकल्प महाराजांनी सुद्धा सोडला.

पण हे काम मोठे दुर्घट. किल्ला अभेद्य होता. उदयभान राठोड हा कडवा शूर गडावर किल्लेदार होता. उदयभान हा रजपूत होता. अत्यंत शूर होता. किल्ल्यावर त्याची मोठी जरब होती. औरंगजेबाशी तो एकनिष्ठ होता. किल्ल्यावर पंधराशे हत्यारबंद रजपुतांची कडवी शिबंदी होती. तोफा, दारुगोळा, शस्त्रास्त्रे भरपूर होती. एकूण, हे काम मोठे कठीण होते; तरीसुद्धा महाराजांनी कोंढाण्याचं लगीन काढलंच. हा किल्ला घ्यायचाच. पण हे काम कोणावर सोपवावे? काम तसे कठीण. काय करावे? महाराज विचार करीत होते.

याच वेळी महाराजांचा बालपणापासूनचा जिवलग मित्र तान्हाजी मालुसरे राजगडावर आले त्यांनी आपल्या मुलाचे रायबाचे लग्न काढले होते. त्याचे बोलावणे करायला ते आले होते. कोंढाणा घेण्यासाठी महाराज स्वत:च जाणार आहेत हे समजताच तान्हाजींना अतिशय वाईट वाटले. ते म्हणाले, “राजे, कोंढाणा घ्यायला तुम्ही स्वत: जाणार? मग, आम्ही कशासाठी आहोत? राजे, माझे तन-मन-धन मी आपल्या चरणांशी वाहिले आहे. तुम्ही आमचे राजे आहात. आम्हाला तुम्हीच गुलामीतून मुक्त केले आहे.

राजे, तुमचे आमच्यावर इतके उपकार आहेत की, माझ्यासारखे हजारो तान्हाजी आपल्यासाठी कामी आले, तरी भरपाई होणार नाही. नाही! महाराज, कोंढाणा घ्यायला तुम्ही जाण्याची गरज नाही. हे काम माझ्यावर सोपवा. मी कोंढाणा घेतो.” महाराज त्याला समजावीत म्हणाले, “अरे तान्ह्या, तू रायबाचे लग्न काढले आहेस. ते अगोदर झाले पाहिजे. तुला सून येणार आहे. तुला मी कसे पाठविणार?” तान्हाजी निर्धाराने म्हणाले, “राजे, आधी लगीन कोंढाण्याचे, मग रायबाचे!” कोंढाणा मी घेणार, महाराजांच्या चरणांवर त्याने शब्द वाहिला. दणकट, घोटीव, जडीव देहाची इमारत असलेल्या निधड्या छातीच्या तान्हाजीने ‘आजपासून आठ दिवसांत कोंढाणा स्वराज्यात सामील करतो’ असा पैजेचा विडा मांसाहेब व महाराज यांच्यासमोर उचलला.

महाराजांना तान्हाजीचे केवढे कौतुक. शब्दांत सांगता येणार नाही एवढे. महाराजांनी तान्हाजीला मानाचा विडा व वस्त्रे दिली. प्रेमाचा निरोप दिला. महाराजांचा व मांसाहेबांचा आशीर्वाद घेऊन तान्हाजी निघाले, कोंढाणा घ्यायला! तान्हाजीचा धाकटा भाऊ सूर्याजी अगदी तान्हाजी सारखाच. एकाला झाकावे दुसऱ्याला उघडावे. तसाच शूर, धाडसी. सूर्याजी तान्हाजीच्या मदतीला धावला. कसे जायचे, कुठून जायचे. बरोबर कुणाकुणाला घ्यायचे याचा दोघांनी अगदी पक्का निश्चय केला. किल्ला झटपट घ्यायचा होता. मराठ्यांच्या पद्धतीने. रेंगाळत रेंगाळत मोंगली पद्धतीने नाही.

सगळी तयारी झाली. दिवस ठरला. माघ वद्य नवमी शुक्रवारची रात्र ४ फेब्रुवारी १६७०. झडप घालायला अगदी चांगली वेळ! अंधारी रात्र. कोंढाणा पूर्वी स्वराज्यात होता; त्यामुळे तान्हाजीला गडाची खडान्खडा माहिती होती. – कोंढाणा अगदी दुर्घट-दर्गम. घडीव चिऱ्याची पक्की तटबंदी. गडाखाली शत्रू आला, तर त्याच्यावर मारा करण्यासाठी तोफाबंदुकांच्या जागा ठेवलेल्या होत्या, त्याला जंग्या म्हणतात. गडाच्या पश्चिमेला सरळसोट खोल कडा आहे, याला डोणागिरीचा कडा म्हणतात. वरून खाली डोकावले तर डोळे गरगरतील. कड्याखाली कार्वीचे दाट जंगल.

याशिवाय कळकी, साग, जांभळी, बोरी यांची दाट झाडी. या बाजूकडून शत्रू कशाला मरायला येईल? म्हणून तर या बाजूला पक्की तटबंदी करण्याची गरज कधीच भासली नाही. इकडे फारसा राबताही नव्हता. चौक्या, पहारे नव्हते. गडाची ही पश्चिम बाज अगदी बळकट नि?क. तानाजीला हे चांगले माहीत होते; म्हणून त्याने गडावर जाण्यास हीच बाजू निवडली. माघ वद्य नवमीची रात्र आली. गडावर चौकीदार, पहारेकरी गस्त घालीत होते… गडाचे दरवाजे बंद झाले… रात्र दाटत चालली… काळाकुट्ट अंधार.. वाघासारख्या चपळ, शूर अशा पाचशे मावळ्यांसह तान्हाजी मालुसरे गडाच्या पश्चिमेला डोणागिरीच्या कड्याखाली आला… अगदी गुपचूप, कसलाही आवाज नाही… मुंगळे धावावेत तसे मावळे आले… बरोबर सूर्याजी होताच. कोठून वर जायचे हे अगोदरच ठरले होते.

तानाजीने प्रथम दोन तरबेज मावळ्यांना कड्यावरून वर जाण्याची खूण केली… मावळे गडावर झेपावले… खाचांत हात घालून वर चढू लागले… बघता-बघता वर गेले. तान्हाजी खाली उभा होता. तो मनातल्या मनात देवाला प्रार्थना करीत होता. “देवा, मला यश दे.” ते दोन मावळे गडावर गेले. जेथे चौक्या, पहारे काहीही नव्हते. मावळ्यांनी वरून माळ खाली सोडली… लगेच तान्हाजी माळेवरून सरसर वर गेले… त्यांच्या मागोमाग दुसरा, तिसरा.

पाचशे मावळे वर जाऊन पोहोचले. सूर्याजीही वर गेला. गडावरील पहारेकऱ्यांना कसलीतरी चाहल लागली. कोणीतरी परके लोक गडावर आले आहेत असा त्यांना संशय आला. त्या काळोखातही ते निरखून पाहत होते. …आणि एकदम ‘हर हर महादेव’ अशा गर्जना सुरू झाल्या. तान्हाजी, सूर्याजी आणि पाचशे मावळ्यांनी गर्जना करीत शत्रूची गवतकापणी सुरू केली. रक्ताचे पाट वाहू लागले. ‘घाल झडप, कर गडप’ असा एकच धुमाकूळ सुरू झाला.

रजपुतांची धावाधाव सुरू झाली. ‘मराठे आले, मराठे आले’ असा आरडाओरडा सुरू झाला. किल्लेदार उदयभानाला ही खबर मिळताच तो क्रोधाने पेटून उठला. ढाल तलवार घेऊन तो धावत आला. हे भयंकर मराठे आले कोठून? केव्हा? अन् हे आहेत तरी किती? काही समजत नव्हते… बाराशे गडकरी हत्यारे घेऊन धावत आले… मशालींचा हतूतू खेळ सुरू झाला… जिकडेतिकडे आक्रोश… किंकाळ्या… आणि आरोळ्या. गड अगदी दणाणून गेला. गडाचा कडेकोट बंदोबस्त असतानाही मराठे गडात शिरलेच कसे? हे मराठे म्हणजे सैतानाची अवलाद! उदयभान भयंकर संतापला होता.

तान्हाजी, सूर्याजीने अत्यंत वेगाने कापाकापी सुरू केली होती. थोड्या वेळात सगळे उरकायचे होते. शत्रूचे सैन्य तिप्पट होते. काहीही करून तान्हाजींना कोंढाणा जिंकायचाच होता. अपयश घ्यायचे नव्हते. निर्धार पक्का होता. तान्हाजी आणि उदयभान भडकलेल्या आगीप्रमाणे लढत होते. दोघेही नरशार्दूल. कोणी कोणापेक्षा कमी नव्हता आणि महाप्रलयंकारी अशा त्या युद्धात तान्हाजी आणि उदयभान अचानक समोरासमोर आले.

पृथ्वी हादरली. दोन पर्वत एकमेकांवर कोसळू लागले. तान्हाजी आणि उदयभान. दोन भयंकर ज्वाला. दोन सिंह. दोन बळकट पर्वत. महावीर. मोठ्या शर्थीचे युद्ध करीत होते. दोघांनाही परस्परांचे प्राण हवे होते. इकडे मावळेही घनघोर युद्ध करीत होते. त्यांना झटपट निकाल लावावयाचा होता. सूर्याजीने तर युद्धाचा कहर मांडला होता आणि… आणि तान्हाजींच्या ढालीवर उदयभानच्या तलवारीचा प्रचंड घाव पडला… तान्हाजींची ढाल तुटली… आता? आता काय? मरणच! तान्हाजींना आपला मृत्यू दिसू लागला, पण ते होते खरे क्षत्रिय.

तसेच लढत होते. त्यांनी आपल्या डाव्या हाताचीच ढाल केली. उदयभानला अवसान चढले… तो तान्हाजींवर सपासप घाव घालू लागला… तान्हाजीही अत्यंत त्वेषाने घाव घालीत होते… दोघेही धुंद झाले होते… इतक्यात, दोघांनीही एकाच वेळी एकमेकांवर घाव घातले आणि दोघेही जमिनीवर कोसळले! तान्हाजींना पडलेले पाहून मावळ्यांचा धीर खचला. ते ओरडत ओरडत सैरावैरा धावत सुटले. आपला भाऊ तान्हाजी धारातीर्थी पडलेला पाहून सूर्याजीवर दुःखाची कुन्हाड कोसळली, पण दुःख करीत बसायला किंवा रडायला वेळ होता कोठे ? कोंढाणा घ्यायचाच होता.

तान्हाजीने महाराजांना तसे वचन दिले होते. ते मोडून कसे चालेल ? मावळे खच खाऊन पळत सुटलेले पाहून संतापलेला सूर्याजी मावळ्यांच्या पुढे आडवा उभा राहिला. सर्वांना रोखून तो म्हणाला, “अरे, नामर्दासारखे पळता कुठे? अरे, भ्याडपणे पळून जाण्यापेक्षा लढून मरा. तुम्ही कोण आहात? तुमचा सरदार येथे मरून पडला आहे आणि तुम्ही पळून जाता? पळालात तर लोक काय म्हणतील? शत्रू काय म्हणेल आणि महाराजांना काय वाटेल? अरे, लढता लढता मेलात तर तुमच्यासाठी स्वर्गाची द्वारे उघडी असतील.

युद्धातून पळालात, तर नरकात जाल आणि आता पळून जाणार कोठे? मी कड्याचे दोर कापून टाकले आहेत. दरीत पडून मरण्यापेक्षा युद्ध करत मरा. गड जिंका. अरे, आपण धर्मासाठी, देशासाठी, आपल्या राजासाठी लढतो आहोत याची जाणीव ठेवा.” सूर्याजीचे हे ओजस्वी शब्द ऐकताच मावळ्यांना धीर आला. त्यांच्यात वीरश्री संचारली. त्यांनी तुंबळ युद्ध केले. गडावर प्रेतांचा खच पडला. मावळे इरेला पेटले. हजारांच्यावर गडकरी मरून पडले. उरले ते पळत सुटले. कित्येक जण गडावरून खाली कोसळले.

कोंढाणा किल्ला मावळ्यांनी जिंकला! सिंहगडावर भगवा ध्वज फडकू लागला! सूर्याजीला अतिशय आनंद झाला, पण या साऱ्या आनंदावर पाणी पडले. कोंढाण्याचं लगीन बघायला तान्हाजी नव्हता! महाराजांचा लाडका तान्ह्या महाराजांना सोडून गेला! महाराजांनी विचारले, तर त्यांना काय सांगायचे या विचाराने सूर्याजीला अतिशय दुःख झाले. एवढ्यात सूर्याजीला आठवण झाली. कोंढाणा घेतल्याची बातमी महाराजांना कळवावयास हवी. पूर्वी ठरल्याप्रमाणे सूर्याजीने गडावरील गंजींना आग लावली. आगीच्या ज्वाळा आकाशाला भिडल्या.

राजगडावर त्या काळोख्या रात्री महाराज कोंढाण्याकडे टक लावून बसले होते. लढाई सुरू झाल्याचे महाराजांना समजले. धावता, पळताना अनेक मशाली अंधुक दिसत होत्या, पण लढाईचा शेवट काय झाला ते समजत नव्हते. आणि अचानक कोंढाण्यावर जाळ दिसला. आनंदाच्या भरात महाराज म्हणाले, “माझ्या तान्ह्याने गड घेतला. फत्ते झाली. तान्ह्याने कोंढाण्याचे लगीन लावले.” महाराजांनी मासाहेबांना ताबडतोब ही खबर दिली.

राजगडावर आनंदाच्या तोफा दणाणू लागल्या. याच वेळी सूर्याजीचा जासूद राजगडावर आला. महाराजांना तो म्हणाला, काढाणा घेतला. फत्ते झाली. उदयभान मारला गेला, पण सुभेदार तान्हाजीही युद्धात कामी आले.” महाराजांवर वीज कोसळली! महाराजांचा तान्ह्या गेला! महाराज दुःखाने म्हणाले, “एक गड घेतला, पण एक सिंह गमावला.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: