दोन कुळांतील यादवी

मालोजीराजे भोसले हे निजामशाहचे सरदार होते. निजामशाहच्या शत्रूशी लढतांना त्यांनी मृत्यू आला. त्या वेळी त्यांचे दोन पुत्र शहाजी आणि शरीफजी दोघेही लहान होते. मालोजींच्या मृत्युनंतर या दोन मुलांचा सांभाळ मालोजींच्या भावाने म्हणजे विठोजींनी केला. मालोजीराजांकडे पुणे, सुपे प्रांताची जहागिरी होती. मोलोजींच्या मृत्युनंतर ती जहागिरी निजामाने शहार्जीच्या नावे केली व शहाजी सज्ञान होईपर्यंत त्या जहागिरीची देखरेख करण्याची जबाबदारी विठोजींवर सोपविली.

विठोजींनी शहाजी आणि शरीफजी यांचा स्वत:च्या मुलांप्रमाणे सांभाळ केला. शहाजींना सर्व प्रकारचे शिक्षण दिले. घोडदौड करणे, तलवार चालविणे इत्यादिंत शहाजी अगदी तरबेज झाले. त्या वेळच्या रीतीप्रमाणे शहाजींचे लग्नाचे वय झाले ; म्हणून त्यांच्या आईने, उमाबाईनी विठोजीमार्फत शिंदखेडच्या सरदार लखुजी जाधवराव यांच्या अत्यंत देखण्या, सुंदर अशा जिजाऊला मागणी घातली. जाधवरावांच्या घराण्याशी आपली सोयरीक व्हावी अशी पूर्वी मालोजीराजांची इच्छा होती; ती लक्षात घेऊन लखुजींनी आपली मुलगी जिजाऊ, शहाजीराजेंना देण्याचे आनंदाने मान्य केले.

शहाजी व जिजाऊ यांचे मोठ्या थाटात लग्न झाले. त्या वेळी शहाजीराजे पंधरा वर्षांचे होते व जिजाऊ दहा वर्षांच्या होत्या. दौलताबाद ही निजामाची राजधानी होती. साहजिकच शहाजीराजे जिजाऊंना घेऊन दौलताबादला आले. त्या वेळची एकूण परिस्थिती मोठी विचित्र होती. सुलतानासुलतानांत सत्तेसाठी सतत संघर्ष, युद्धे, जाळपोळी, लुटालुट यांना ऊत आला होता. यात मारले जात होते ते फक्त मराठे. राखरांगोळी होत होती ती मराठ्यांच्या घरादारांची! हे मराठे कुणाची तरी बाजू घेऊन आपापसात लढत होते. परक्यांसाठी मरत होते.

हे सर्व पाहन जिजाऊंच्या अंगाची लाहीलाही होत होती. हे सगळे मराठे जर एक झाले, तर ह्या परक्या सैतानी सत्तांना भारी पडतील; पण तसे न करता हे परक्यांची गुलामी स्वीकारून आपल्याच लोकांचे काळ होत आहेत. असे का? असे का? या प्रश्राने जिजाऊ अस्वस्थ, बेचैन होत होत्या, संतापत होत्या. आणि एके दिवशी एक भयंकर, अतिभयंकर असा प्रकार घडला. निजामशाहचा दरबार बरखास्त झाला. सगळे सरदार आपापल्या घरी जाण्यासाठी बाहेर पडू लागले. बाहेर सेवक आपापल्या धन्याचे वाहन, कुणाची पालखी, कुणाचा घोडा, तर कुणाचा हत्ती घेऊन पुढे जाऊ लागले.

दरबारचे भालदार वाट मोकळी करण्याचा कसोशीने प्रयत्न करीत होते. त्याच वेळी अचानक मोठा आरडाओरडा सुरू झाला. सरदार खंडागळ्यांचा एक धिप्पाड हत्ती पिसाळला होता. तो सोंड सपासप फिरवीत, मोठा चीत्कार करीत गर्दीवर तुटून पडला. दिसेल त्याला सोंडेने उडवू लागला. त्याच्या पायाखाली अनेक जण चिरडले जाऊ लागले. हत्तीवरचा माहूत हत्तीच्या गंडस्थळावर खचाखच अंकुश मारीत होता. पण त्याचा काहीही उपयोग होत नव्हता. वेडापिसा झालेला हत्ती सैरावैरा धावत होता. लोक जिवाच्या आकांताने वाट फुटेल तिकडे धावत सुटले.

आपल्या दोन सेवकांना त्या हत्तीने पायदळी तुडविलेले पाहन लखुजी जाधवरावाचा मुलगा म्हणजे जिजाऊंचा भाऊ दत्ताजी हाती तलवार घेऊन हत्तीला मारण्यासाठी धावत आलेले पाहून शहाजीराजांचे चुलतभाऊ संभाजी भोसले ओरडून म्हणाले, ‘राजे, हत्तीला मारू नका. मारण्याची गरज नाही.” पण.. तेवढ्यात दत्ताजींनी हत्तीवर तलवारीने घाव घालण्यास सुरुवात केली होती. अत्यंत चिडलेल्या दत्ताजींनी कुणाचे काहीही न ऐकता हत्तीच्या सोंडेवर तलवारीचा जोरात घाव घातला. हत्तीची सोंड तुटली… रक्ताचा धबधबा सुरू झाला. आणखी घाव घालून हत्तीला पुरते घायाळ करतच दत्ताजींनी संभाजीला विचारले, “हत्तीला मारू नको, तर काय तुला मारू?’ दत्ताजींच्या या बोलण्याने संभाजी भोसले भयंकर चिडले.

दत्ताजींना ठार मारण्यासाठी. धावून गेले आणि क्षणार्धात. दत्ताजींचे डोके उडविले गेले. आपल्या मुलाला ठार केल्याचे पाहून संतापाने लालेलाल झालेले लखुजी जाधवराव संभाजींवर धावून गेले. आपला चुलत भाऊ संभाजी याला ठार मारण्यासाठी आपला सासरा चाल करून आल्याचे समजताच शहाजीराजे प्रत्यक्ष आपल्या सासऱ्याशी लढू लागले. लखुर्जीच्या तलवारीचा घाव शहाजीराजांच्या दंडावर पडला.

जखमी झालेले शहाजीराजे बेशुद्ध पडले. सेवकांनी त्यांना उचलून सुरक्षित स्थळी नेले. जावयाचा अडथळा दूर होताच लखुजी जाधवराव संभाजीवर चाल करून गेले व तलवारीच्या एकाच फटक्यात संभाजींची गर्दन उडविली. संभाजी ठार होताच त्यांच्या पक्षाचे लोक लखुजी जाधवरावांवर धावून गेले व पुन्हा दोन पक्षात जोरदार लढाई सुरू झाली. हे रणकंदन निजामशाह आपल्या वाड्याच्या खिडकीतून मोठ्या चवीने पाहात होता. हे मराठे सरदार मोठे शूर असले, तरी यांच्या ठिकाणी काडीमात्र सारासार विचार नाही. हे असेच आपापसात झुंजत राहिले, तर आपली सत्ता बळकट होईल याची त्याला खातरी पटली.

तो आपल्या महालातून बाहेर आला. त्याने दोन्ही पक्षांचे सांत्वन केले व त्यांना झगडण्यापासून परावृत्त केले. जाधव आणि भोसले दोन्ही कुटुंबं शोकाकुल झाली. पण जिजाऊंचे काय? त्यांनी कोणासाठी रडायचे? आपला तरणाबांड भाऊ दत्ताजी गेला म्हणून रडायचे की, आपला चुलत दीर संभाजी याची हत्या झाली म्हणून रडायचे की, मूर्खपणा आणि अविचाराने आपल्याच लोकांचे मुडदे पाडणाऱ्या या मराठ्यांसाठी रडायचे? आपल्यातील ही यादवीच आपल्या विनाशाला कारणीभूत होईल याचे जिजाऊंना फार दुःख होत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: