Site icon My Marathi Status

सत्यरथ, धर्मगुप्त व सुचिव्रताची कथा

विदर्भ देशात सत्यरथ नावाचा राजा होता. तो पराक्रमी व सद्गुणी होता. पण तो शंकराची भक्ती कधीच करीत नसे. सत्यरथाकडे ऐश्वर्य होते. तो धनवान होता. पण त्याच्या आजूबाजूच्या राजांना ते सहन होईना. ते सर्वजण एक झाले व त्यांनी एकत्र येऊन सत्यरथाच्या राज्यावर स्वारी केली. घनघोर युद्ध सुरू झाले. सत्यरथ शूर होता. पण त्याचा एकट्याचा अनेक राजांच्या सैन्यापुढे टिकाव लागेना. रणांगणातच त्याला शत्रूच्या हातून मरण आले.

शत्रुसैन्य नगरात घुसले व सैन्याने लुटालूट सुरू केली. सत्यरथाची पत्नी गरोदर होती. तिने जिवाच्या भीतीने नगर सोडले व ती निबिड अरण्यात शिरली. रानांतून काट्याकुट्यांतून ती धावत होती. ती खूप सुंदर होती. धावून ती दमली. तिच्या पायात काटे रुतले होते. ती एका वृक्षाखाली दमून बसली. तोच तिला प्रसूतिवेदना सुरू झाल्या. त्या वेदना इतक्या वाढल्या की ती गडबडा लोळू लागली. आणि तिला एक गुटगुटीत बाळ झाले.

बाळाला झाडाखाली सोडून ती जवळच्या सरोवरापाशी पाण्यासाठी गेली. ती गुडघाभर पाण्यात गेली. तिने ओंजळीत पाणी घेतले. पण तिला सरोवराच्या बाहेर येता येईना. कारण सरोवरातल्या सुसरीने तिचा एक पाय तोंडात पकडला आणि तिला वेगाने ओढत आपल्या अणकुचीदार दातांनी खाऊन टाकले. तिकडे तो बाळराजपुत्र एकटाच हातपाय हालवत रडत होता.

पण त्या घनदाट अरण्यात त्याचे रडणे कोणालाही ऐकू येत नव्हते. त्याचवेळी तेथून एक ‘उमा’ नावाची विधवा ब्राह्मण स्त्री चालली होती. तिने आपल्या छोट्या मुलाला कडेवर घेतले होते. तिने या नुकत्याच जन्मलेल्या बाळाचा आवाज ऐकला. त्याच्याकडे बघितल्यावर तिच्या हृदयात वात्सल्य वाटू लागले. कुणीतरी हिंस्र श्वापद येईल आणि या कोवळ्या बाळाला खाऊन टाकेल, असेही तिला वाटले.

ती धावत त्या बाळाजवळ गेली आणि तिने त्याला उचलून छातीशी धरले. तिच्या स्तनांना पान्हा फुटला. ती त्याला दूध पाजू लागली. ती विचार करीत होती, याची आई कोण? ती कुठे गेली? या बाळाला आपण न्यावे का? तोच तेथे एका यतीचे रूप घेऊन श्री शंकर आले व तिला म्हणाले, “हा बाळ राजपुत्र आहे. याला तू घरी ने. तुझ्या मुलाबरोबर तू याला वाढव.”

इतके सांगून श्री शंकर गुप्त झाले. ती स्त्री दोन्ही मुलांना घेऊन अनेक गावांतून भिक्षा मागत हिंडू लागली. तिच्या मुलाचे नाव ‘सुचिव्रत’ होते व राजपुत्राचे नाव तिने ‘धर्मगुप्त’ ठेवले. ती दोन्ही मुले स्वत:चीच आहेत, असे ती सांगत असे. एकदा भीक मागत हिंडता हिंडता ती ‘एकचक्र’ नावाच्या नगरात गेली. तेथे तिला दूरवर एक शिवमंदिर दिसले. उमा दोन्ही मुलांना घेऊन देवळात गेली. तेथे ‘शांडिल्य’ नावाचे ऋषी शंकराची पूजा करीत होते.

तिला व मुलांना पाहून शांडिल्य ऋषी म्हणाले, “राजपुत्र भिकारी झाला आहे. दैवगती गहन असते हेच खरे.” उमेने ते ऐकले. तिने ऋषींचे पाय धरले व ती म्हणाली, “ऋषिवर्य, आपण काय बोललात? हा मुलगा कोण आहे?” शांडिल्य म्हणाले, “या मुलाचे वडील, एक मोठा राजा होता. त्याचे नाव ‘सत्यरथ’. सत्यरथ त्याच्या अगोदरच्या जन्मात प्रदोषसमयी पूजा करीत होता. त्याचवेळी शत्रू त्याच्या राज्यावर चालून आला.

म्हणून शंकराची पूजा अर्धवट सोडून राजा रणांगणात धावला. राजाने शत्रूचा पराभव करून त्यांच्या राजाला पकडून आणले व शत्रूपक्षातील राजांचा शिरच्छेद केला. नंतर प्रदोषाची पूजा तशीच अर्धवट सोडून राजा भोजनास बसला. त्यामुळे हा सत्यरथ राजा या जन्मी त्याच्या शत्रूकडून मारला गेला. । या मुलाच्या आईने गेल्या जन्मी सवतीचा जीव घेतला होता म्हणून या जन्मी सुसरीचे रूप तिच्या सवतीने घेऊन तिला फाडून खाल्ले. हा तुझा ‘धर्मगुप्त’ याने गेल्या जन्मी ‘शिवपूजा’ केली नाही, त्यामुळे या जन्मी तो पोरका झाला.

प्रदोषकाळात कधीही शंकराची पूजा अर्धवट सोडू नये.” उमेने शांडिल्य ऋषींना विचारले, “माझा मुलगा ‘सचिव्रत’ याच्या नशिबी दारिद्रय का?” ऋषी म्हणाले, “याने गेल्या जन्मी काहीच दान केले नाही. शिवपूजा तर मुळीच केली नाही. त्यामुळे हा दरिद्री.” उमेने शांडिल्य ऋषींच्या पायावर दोन्ही मुलांना घातले. ऋषींनी त्यांना ‘नमः शिवाय’ हा मंत्र दिला व प्रदोषव्रत कसे करावे हे उमेला समजावून सांगितले.

शांडिल्य ऋषींनी मुलांना प्रदोषव्रत करायला सांगितले. मुलांनी एकचक्र नगरीत चार महिने प्रदोषव्रत केले. आता दोन्ही मुले आनंदाने शंकराची भक्ती करीत. एकदा सुचिव्रत नदीकाठी हिंडत असताना समोरची एक दरड कोसळली आणि तेथून धन भरलेला एक हंडा गडगडत खाली आला. सुचिव्रताने तो हंडा उचलून घरी आणला व त्यातील द्रव्य आईला दिले. आई म्हणाली, “हा प्रदोषव्रताचा महिमा आहे.” सुचिव्रताने राजपुत्राला अर्धे द्रव्य दिले. पण ते त्याने घेतले नाही. एकदा दोघे वनविहारासाठी गेले असता त्यांना गंधर्वकन्या दिसल्या. त्या खूप सुंदर होत्या. राजपुत्र त्यांच्याकडे टक लावून पाहू लागला.

सुचिव्रत त्याला म्हणाल्या, “धर्मगुप्ता, या परक्या स्त्रियांकडे अभिलाषेने पाहू नकोस.” राजपुत्र धर्मगुप्त म्हणाला, “सुचिव्रता. मी गंधर्वकन्यांच्या जवळ जातो. तुला यायचे नसेल तर तू येऊ नकोस.” राजपुत्र गंधर्वकन्येजवळ गेला. सुचिव्रत मागेच थांबला. त्या गंधर्वकन्यांपैकी ‘अंशुमती’ नावाची गंधर्वकन्या ‘कोद्रविण’ राजाची मुलगी. त्याच्यावर शिवशंकर फार पूर्वी प्रसन्न झाले होते.

शंकराला त्याने विचारले होते, “माझी मुलगी अंशुमती कोणाची पत्नी होईल?” तेव्हा शंकर त्याला म्हणाले होते, “सत्यरथाचा मुलगा ‘धर्मगुप्त’ याला तू तुझी कन्या शिवशंकरानेच असे ठरविले होते. योगायोगाने ‘अंशुमती’ धर्मगुप्ताच्या दृष्टीस पडली. अंशुमतीलाही तो मदनाहून सुंदर भासला. तिने धिटाईने राजपुत्राला जवळ बोलावले. ती लाजून त्याला म्हणाली, “मी तुमचीच आहे.” धर्मगुप्त म्हणाला, “तू सुंदर आहेस.

पण माझ्याकडे आत्ता काहीच नाही. मी फक्त नावाचाच राजपुत्र. तुझ्या वडिलांना मी जावई म्हणून पसंत पडेन का?” अंशुमतीने त्याला जवळ घेतले व आपल्या जवळचा मोत्याचा कंठा त्याच्या गळ्यात घातला व ती म्हणाली, “मी आजपासून तीन दिवसांनी वडिलांची संमती घेऊन याच ठिकाणी येईन. तुम्हीही त्याचवेळी या. म्हणजे आपले लग्न होईल.” अंशुमतीने घरी जाऊन वडिलांना सर्व हकिकत सांगितली.

शिवाने सांगितलेले घडणार हे लक्षात येताच ‘कोद्रविण’ राजा मनात सुखावला. ‘धर्मगुप्त’ व ‘सुचिव्रत’ यांच्या लक्षात आले की प्रदोषव्रत करण्यामुळे हे योग येत आहेत. तीन दिवसानी ते दोघे पुन्हा त्या वनात गेले. कोद्रविण राजा आपल्या कन्येला घेऊन तेथे आला व तेथे ‘अंशुमती’ व ‘धर्मगुप्त’ या दोघांचा विवाह झाला. गंधर्वराजाने आपल्या जावयाला भरपूर काही दिले.

राजपुत्राने आपल्या पित्याचे गेलेले राज्य परत मिळवले. अंशुमतीसह तो सुखाने राज्य करू लागला. त्याची प्रजा सुखी झाली. धर्मगुप्ताचे हे आख्यान जे पठण करतील, श्रवण करतील, लिहितील त्यांचे रक्षण शिवशंकर करतील. त्यांना समृद्धिप्राप्ती होईल. अपमृत्यूचे भय राहणार नाही. त्यांचा पाठीराखा शिवशंकर असेल.

Exit mobile version