अफजलखान क्रूरकर्मा होता; धर्मवेडा, खुनशी होता. विजापूरच्या बादशहाशी एकनिष्ठ होता. भोसले कुटुंबाचा वैरी होता. ह्याच दुष्टाने शहाजीराजांना पकडून गोत्यात आणले होते. कनकगिरीच्या संग्रामात शिवरायांचा मोठा भाऊ संभाजीराजांना गोवून त्यांचा प्राण घेण्याचा डाव ह्याच अफजलखानाने सिद्धीस नेला होता. शहाजीराजांच्या कर्नाटकच्या स्वारीत शिऱ्याचा नाईक कस्तूरीरंग अफजलखानाशी लढत असता, ह्याच खानाने त्याला शपथ देऊन भेटीस बोलाविले आणि कपटाने त्याला ठार मारले होते. ह्याच खानाने विजापूरचा प्रधान खान महंमद याचा खून केला होता. असा हा कपटी क्रूर अफजलखान.
ह्याने भर दरबारात पैजेचा विडा उचलून शिवाजीला ठार मारण्याची प्रतिज्ञा केली. त्या वेळी बडीबेगम हिने अफजलखानाला एक कानमंत्र दिला की, ‘शिवाजी मोठा युक्तिबाज आहे. तो युद्धाला समोर उभा राहणार नाही. त्याला गुप्तभेटीस आणा, सापडल्यास जिवंत पकडा नाहीतर खलास करून टाका. मावळातले देशमुख किंवा इतर कोणी विरुद्ध वागतील त्या सर्वांची बेलाशक कत्तल करा.’ असे सांगून बड्या बेगमने त्याला निरोप दिला. शिवाजी महाराजांना जिवंत पकडून आणावयास किंवा वाटेल त्या उपायांनी त्यांचा निर्मूळ फडशा पाडण्यास अफजलखान अतिशय अधीर झाला होता.
जय्यत तयारीनिशी आणि आपल्या साहाय्याला अंकुश खान, नाईकजी पांढरे, बाजी घोरपडे, फाजलखान इत्यादी सरदारांना घेऊन अफजलखान मोहिमेवर निघाला. शिवरायांना खानाच्या प्रत्येक हालचालींची खडान्खडा माहिती गुप्तहेरांकडून मिळत होती. खान तुळजापुरात आला. सगळे गाव भयभीत होऊन सैरावैरा पळत सुटले. खानाने जाळपोळ, लुटालुट सुरू केली. खान भवानीमातेच्या देवळात शिरला. ‘तुळजाभवानी’ शिवरायांची, मराठ्यांची, अवघ्या महाराष्ट्राची आराध्य देवता! खानाने देवीच्या मूर्तीवर घाव घातला. ती फोडून जातियांत भरडून पीठ केले.
हे सर्व त्याच्याच सैन्यात असलेल्या खराटे, मोहिते, घोरपडे इत्यादी मराठ्यांच्या देखत! ….पण लाचार, स्वाभिमानशून्य बनलेल्या त्यातील कोणाही मराठ्याला काहीही वाटले नाही. त्यांना काळजी होती फक्त आपल्या सरदारकीची! तुळजापूरचा विध्वंस करून खान पंढरपुरावर चालून गेला. त्याने पंढरपुरात थैमान घातले. विठ्ठलाचे मंदिर फोडले. बडवे पुजाऱ्यांनी पांडुरंगाची मूर्ती आगोदरच लपवून ठेवली होती; म्हणून वाचली. बाकी सगळ्याची राखरांगोळी झाली. शिवरायांना गुप्त हेरांकडून हे सगळे समजले. त्यांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली, पण ते शांत राहिले.
‘मंदिरे फोडण्यात खानाचा मोठा धूर्त डाव होता. मंदिरे फोडल्यामुळे चिडलेला शिवाजी डोंगरी किल्ल्यातून बाहेर पडून आपल्यावर हल्ला करील. मग उघड्या मैदानावर त्याला खलास करणे अगदी सोपे.’ खानाचा हा डाव ओळखून शिवराय शांत राहिले असले, तरी त्यांच्या डोक्यात विचारचक्रे सुरू झाली. त्यांनी मनाशी पक्के केले. आपण प्रताप गडावर जावे व खानाला जावळीत गाठून युद्ध करावे व त्याला ठार मारावे. त्यांनी आपली योजना सर्व सहकाऱ्यांना सांगितली. खानाशी युद्ध? हे कसे शक्य आहे ? खानाशी युद्ध ही गोष्ट कुणालाही पटेना. ‘आपण खानाशी तह करावा.
युद्ध नको. सलाह करावा.’ असे सर्वांनी सांगितले. …पण महाराजांना हे मुळीच पटले नाही. खान कपटी आहे. तहाचा बहाणा करून त्याने संभाजीराजांना ठार मारले तसे तो आपणास ठार मारील; म्हणून सलाह नाही, युद्धच. मग जे होईल ते होईल! महाराजांनी विचार पक्का केला. ह्या खानाने तुळजाभवानीचा अपमान केला आहे. हा खान सत्धर्माचा नाश करण्यासाठी जन्मास आला आहे, पण खांबातून प्रकट झालेल्या नृसिंहाने दुष्ट हिरण्यकशिपूला पकडले त्या प्रमाणे मीही या खानाला ठार मारीन.’ एके दिवशी महाराजांना तुळजाभवानीने स्वप्नात दृष्टान्त देऊन सांगितले, “चिंता करू नकोस. तुजला यश मिळेल. मी तुझी तलवार होऊन राहिले आहे.” असे बोलून तुळजाभवानी महाराजांच्या भवानी तलवारी’त शिरून अदृश्य झाली. महाराज जागे झाले. त्यांना अतिशय आनंद झाला. त्यांनी मांसाहेब, नेताजी, मोरोपंत इत्यादींना ते दिव्य स्वप्न सांगितले.
महाराज म्हणाले, “श्री प्रसन्न झाली. आता मी त्या अफजलखानास ठार मारणारच. आता महाराज राजगडावरील सर्व व्यवस्था करून प्रतापगडावर जाण्यास निघाले. शिवबा आपल्याला सोडून प्रतापगडावर जाणार; म्हणून आईसाहेबांच्या काळजाचे पाणी पाणी झाले. तशाही स्थितीत त्यांनी शिवरायांना आशीर्वाद दिला, “शिवबा, विजयी होशील! शिवबा, यशाचा विडा मिळवून आण! संभाजीचे उसने फेडून घे!” शिवाजीराजे आपल्या सहकाऱ्यांसह प्रताप गडावर आले. अफजलखान आपल्या प्रचंड सेनेसह वाईला येऊन ठेपला आहे हे महाराजांना समजले. वाईहन अफजलखानाने शिवाजीराजांना निरोप पाठविला, ‘हे शिवाजी, तू पदोपदी उद्धटपणा करीत आहेस. निजामशाही बुडाल्यावर स्वत: मिळविलेला त्यांचा मुलूख आदिलशाहने मोंगलांना दिला.
तो मुलूख तू बळकविला आहेस. तू कल्याण आणि भिवंडी घेऊन तेथील मशिदी पाडून टाकल्या व तेथील काजीमुल्लांना कैद केलेस. तू चक्रवर्ती राजचिन्हे धारण केली आहेस. हे राजा, आता माझ्या आज्ञेप्रमाणे संधी कर आणि सर्व किल्ले आणि मुलूख मला देऊन टाक.’ खानाचा हा दमदाटीचा निरोप घेऊन आलेल्या, खानाच्या कृष्णाजी भास्कर या वकिलाला शिवराय म्हणाले, “खानसाहेबांनी माझ्या हातून जिंकले गेलेले गडकोट व मुलूख परत मागितला आहे व मला तह करण्याची आज्ञा केली आहे. ही खरोखर माझ्यावर मोठी कृपाच आहे.
मला हे माहीत आहे की त्यांचे सामर्थ्य फार मोठे आहे, त्यांच्या ठायी कपट मुळीच नाही; पण मला मात्र फार भीती वाटते; म्हणून खानसाहेबांनी स्वत:च जावळीत यावे. खानसाहेब मागत आहेत ते सर्व किल्ले व मुलूख मी त्यांच्या स्वाधीन करीन. ते जावळीत आले म्हणजे मी माझी कट्यार त्यांच्या पायाशी ठेवीन. आपण खानसाहेबास जावळीत घेऊन यावे. खानसाहेब म्हणजे आमचे प्रत्यक्ष काकाच! काकांची भेट घेऊ. आमच्या मनात कसलेही कपट नाही.” “तुम्ही खानसाहेबांना भेटण्यासाठी वाईला चला.” कृष्णाजी भास्कराने शिवरायांना पुनःपुन्हा आग्रह केला, मला खानसाहेबांची भीती वाटते.
मी आजवर खप चका केल्या आहेत; म्हणून खानसाहेबानीच जावळीस येऊन मला क्षमा करावी व मला बादशहाकडे न्यावे.” महाराजांनी आग्रहाने सांगितले. कृष्णाजी भास्कराला ते खरे वाटले व तो महाराजांचा निरोप घेऊन वाईकडे परत निघाला. महाराजांनी पंताजीकाकांना एकांतात सर्व सूचना दिल्या. खानाशी काय बोलावे हे पढविले. मग पंताजीकाका कृष्णाजी भास्कराबरोबर वाईला गेले. पंताजीकाका काही सांगकाम्या बाळ नव्हते; मोठे वस्ताद होते. त्यांनी वाईत गेल्यावर लष्करी छावणीत फिरून अनेक गोष्टींची माहिती गोळा केली. कोण काय बोलतो, खानाच्या मनात काय आहे हे लक्षात घेतले.
खान महाराजांना ठार मारण्यासाठीच आला आहे हे चाणाक्ष पंताजीकाकांच्या लक्षात आले. कृष्णाजी भास्कर खानास भेटला आणि म्हणाला, “खानसाहेब, तो शिवाजी आपणास फार घाबरतो. त्याला पश्चाताप झाला आहे. तो अगदी दीनवाणा होऊन आपली क्षमा मागत आहे. आपली फौज वाईत आल्यापासून तो प्रतापगडावर लपून बसला आहे. आता तो जावळीसह सर्व गडकोट व मुलूख आपल्या ताब्यात देण्यास तयार आहे.” हे ऐकताच खान अतिशय खूश झाला. त्याने कृष्णाजी भास्करबरोबर निरोप दिला व पंताजीकाकांना मुलाखतीला बोलाविले.
पंताजीकाका महाबिलंदर. कृष्णाजी भास्कराने खानाला जे सांगितले तेच काकांनी तिखटमीठ लावून खानाला सांगितले. पंताजीकाका म्हणाले, “खानसाहेब, आपल्या ठायी जराही कपट नाही हे महाराजांना चांगले माहीत आहे. महाराज आपणास वडिलांसमान मानतात, पण महाराज आपणास फार घाबरतात; म्हणून त्यांची आपणास नम्र विनंती आहे की, आपणच जावळीत येऊन भेटावे.” खानाला ही योजना एकदम पसंत पडली. खानाला हवा होता शिवाजी. खान अगदी उतावीळ झाला होता, शिवाजीला भेटण्यासाठी नव्हे शिवाजीला ठार मारण्यासाठी! पंताजीकाकांची नजर अगदी भेदक.
खानाच्या छावणीत हिऱ्यामोत्यांचे व्यापारी मोठा माल घेऊन आले होते. काकांच्या नजरेत ते भरले होते. काकांनी खानाला विनंती केली, “शिवाजी महाराजांना काही हिरे मोती खरेदी करावयाचे आहेत; म्हणून आपल्याबरोबर आलेल्या सराफांना प्रतापगडावर पाठवावे.” खानाला हे पटले. त्याने सर्व सराफांना माल घेऊन गडावर जाण्यास सांगितले. सगळे सरा आपला बहमोल माल घेऊन गडावर गेले. महाराजांनी तो सगळा सराफी माल ताब्यात घेतला खानसाहेबांच्या भेटीनंतर मालाची किंमत दिली जाईल असे सांगितले. भोळसट व्यापारी सगळा सराफी माल महाराजांच्या ताब्यात दिला.
काकांनी त्या व्यापाऱ्यांना व खानालाही चांगलेच चकविले. अफजलखान आणि शिवाजी महाराज यांच्या भेटीचा दिवस निश्चित झाला. गुरुवार दिनांक १० नोव्हेंबर १६५९ दुपार. भेटीची जागा प्रतापगडाच्या पायथ्याशी एका अडचणीच्या मेटावर होती. महाराजांनी ही अडचणीची जागा मुद्दामच निवडली होती. हेतू हा होता की, खानाने काही दगलबाजी केली, तरीही त्याचे सैन्य सहजासहजी तेथे येऊन पोहोचू नये. भेटीसाठी अगदी राजेशाही थाटाचा भव्य शामियाना उभारला होता. शिवाजी महाराजांचे वकील पंताजीकाका प्रतापगडावरून अफजलखानाकडे आले व त्यांनी भेटीची योजना खानाला सांगितली.
‘आपले सैन्य आहे तेथेच ठेवून खानाने एकट्यानेच सशस्त्र निघावे आणि पालखीत बसून पुढे यावे. सेवेसाठी दोन-तीन सेवक असावेत. प्रतापगडाच्या मेटावर येऊन शामियान्यात थांबावे. शिवाजीराजांनी सशस्त्र तेथे यावे व पाहण्यांचा आदरसत्कार करावा. दोघांच्या रक्षणार्थ स्वामिनिष्ठ, शूर आणि निष्ठावान असे दहा-दहा सैनिक दोघांनी बरोबर आणावेत, पण ते बाणाच्या टप्प्यावर उभे राहावेत. दोघांनी एकमेकांस भेटल्यावर मग बोलणे करावे.’ खानाने ते मान्य केल्यावर पंताजीकाका गडावर परत आले.
भेटीच्या आदले दिवशी रात्री शिवाजी महाराजांनी आपल्या जिवाभावांच्या सवगड्यांना वडीलधाऱ्या मुत्सद्यांना बोलावून घेतले व त्यांना सांगितले, “उद्या खान आमच्या भेटीसाठी येत आहे. त्या वेळी तुम्ही सर्वांनी खानाच्या सैन्याभोवती असलेल्या दाट झाडीत शत्रूला कळू न देता दडून बसावे. खानाने जर काही बदमाशी, बेइमानी केली, तर गडावरून तोफांची इशारत होईल. ती होताच सर्वांनी एकच एल्गार करून खानाची सारी फौज कापून काढावी.” हे ऐकताच सर्वांचे हात शिवशिवू लागले. महाराजांनी गडाची सर्व व्यवस्था केली. भेटीच्या दरम्यान कोणी काय करायचे हे सर्वांना समजावून सांगितले.
खानाच्या भेटीला जाताना कोणाकोणाला बरोबर न्यायचे याचा विचार महाराजांनी केला. संभाजी कावजी कोंढाळकर, जिवा महाला, येसाजी कंक इत्यादी अत्यंत शूर, हशार व निष्ठावंत अशा दहा जणांची निवड केली. हे दहा जण म्हणजे महाराजांचे दहा पदरी चिलखत होते. पंताजीकाका बरोबर असणार होतेच. मार्गशीर्ष शुद्ध दशमीचा तो दिवस उगवला. महाराजांनी शिवशंकराची मनोभावे पूजा केली… तुळजाभवानीचे चिंतन केले… थोरामोठ्यांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेतले… अंगात चिलखत घातले… डोक्यात जिरेटोप घातला…
चिलखतावर जरीचे कडते व अंगरखा घातला… जिरेटोपावर मंदिल बांधला… पायी सुरवार घातली… एका हाताच्या अस्तनीत बिचवा, तर दुसऱ्या हाताच्या बोटांत वाघनखे आणि कमरेस कट्यारही लपवून ठेवली. अफजलखानही आपल्या अनुयायांसह शामियान्यात आला. त्याच्याबरोबर कृष्णाजी भास्कर, सय्यद बंडा, पिलाजी, शंकराजी मोहिते आणि इतर चार यवन होते. शिवाजी महाराज आलेले पाहताच अफजलखानाने आपल्या हातातील तलवार कृष्णाजी भास्कराच्या हातात दिली आणि आपल्या मनात कोणतेही कपट नाही असे दाखविले.
पंताजीकाकांच्या सांगण्यानुसार सय्यद बंडाला शामियान्याच्या बाहेर जाऊन उभे राहण्यास सांगितले. अफजलखान शिवाजी महाराजांना म्हणाला, “हे शिवाजी, तू आदिलशाह, कुतुबशाह किंवा दिल्लीपतीची सेवा करीत नाहीस. तुला गर्व झाला आहे. तू उन्मत्तपणे स्वैर वर्तन करतोस. तुला शिक्षा करण्यासाठी मी येथे आलो आहे. मी स्वत:च्या हाताने तुला पकडून आदिलशाहपुढे उभा करणार आहे. तुझे मस्तक तेथे नमविण्यास तुला भाग पाडणार आहे. तू आपली घमेंड सोडून दे आणि पुढे येऊन मला आलिंगन दे.” असे बोलून खान शामियान्याच्या मध्यभागी आला…
शिवाजी महाराजही जपून पावले टाकत त्याच्याकडे जाऊ लागले… दोघेही एकमेकांजवळ आले… महाराज जवळ येताच खानाने महाराजांना आलिंगन देण्याच्या आमिषाने त्यांना जवळ ओढले… …आणि क्षणार्धात त्यांची मान आपल्या डाव्या बगलेत जोराने दाबली व उजव्या हाताने कट्यार काढून महाराजांच्या डाव्या कुशीत खुपसली. पण… अंगात चिलखत असल्याने महाराजांना काहीच झाले नाही.. तेवढ्यात महाराजांनीसुद्धा अत्यंत चपळाईने उजव्या हातातील वाघनखे खानाच्या पोटात खस्कन खुपसली… खानाची आतडी भस्कन बाहेर आली… रक्ताचा धबधबा सुरू झाला…
खानाने प्राणांतिक आरोळी मारली… खान दुःखाने ओरडला, “या खुदा! दुश्मनने मुझे कत्ल किया! दगाऽ दगाऽऽ दगाऽऽऽ काटो उसको!” खान झोकांड्या खात ओरडत ओरडत शामियान्याच्या बाहेर निघाला. खानाचा वकील कृष्णाजी भास्कर, खानाने दिलेली तलवार घेऊन महाराजांवर धावून गेला; पण महाराजांनी एकाच फटक्यात त्याच्या डोक्याची दोन शकले केली. एवढ्यात खानाचा ओरडा ऐकून सय्यद बंडा आत आला. त्याने महाराजांवर आपली तलवार उगारली. तेवढ्यात जिवा महालाने आपल्या तलवारीने सय्यद बंडाचा हात वरच्यावर छाटला व त्याला ठार मारले.
पोटातून बाहेर आलेला रक्तबंबाळ कोथळा दोन हातांनी कसातरी दाबून धरून खान झोकांड्या खात शामियान्याबाहेर पडला. त्याला पाहताच त्याचे सेवक त्याला पालखीत घालून पळत सुटले. संभाजी कावजीने हे पाहताच धावत जाऊन पालखीच्या भोयांचे पाय तलवारीने सपासप कापून त्यांना आडवे केले. तलवारीच्या एकाच फटक्याने खानाचे मुंडके छाटले व ते हातात धरून प्रचंड गर्जना केली, ‘हरहर महादेव!’ ती गर्जना ऐकताच झाडीत लपून बसलेल्या मावळ्याने जोरात तुतारी फुकली. ‘महाराज विजयी झाले. खानाचा मुडदा पडला.’ असा संदेश प्रतापगडावर पोहोचला.
सदश मिळताच गडावर तोफा दणाणू लागल्या. तोफांचे आवाज ऐकताच खानाच्या छावणीभोवती लपून बसलेले कान्होजी जेधे, तानाजी मालुसरे, नेताजी पालकर इत्यादी सेनानी व त्याचे सेनिक खानाच्या छावणीवर तुटून पडले. खानाच्या सरदारांची व सैनिकांची एकच कापाकापी सुरू झाली. खानाच्या सैनिकांची पळापळ सुरू झाली. असंख्य सैनिक ठार झाले. अनेक जण भयंकर जखमी झाले. कित्येक जण पकडले गेले. खानाचा मुलगा फाजलखान भयंकर जखमी होऊन पळत सुटला. अफजलखानाची अमाप संपत्ती पासष्ट हत्ती, हजारो घोडे, उंट, बैल, कापडचोपड, तंबू, पालख्या, हत्यारे, खजिना आणि सराफांनी विक्रीसाठी आणलेले जडजवाहीर अशी अफाट संपत्ती महाराजांच्या सैनिकांच्या हाती सापडली.
खानाचा फडशा पाडून विजयी झालेले शिवाजी महाराज प्रतापगडावर गेले. त्यांच्या स्वागतासाठी तोफा दणाणू लागल्या. गडावर सर्वत्र दिवाळी सुरू झाली. ‘देवद्वेष्टा, धर्मद्वेष्टा अफजलखान ठार झाला’ ही आनंदाची बातमी मांसाहेबांना सांगण्यासाठी महाराज राजगडावर गेले, तेव्हा मासाहेबांनी महाराजांवर आनंदाणूंचा वर्षाव केला. गडागडांवर विजयोत्सव सुरू झाला. या विजयामुळे महाराजांना व त्यांच्या सहकाऱ्यांना दिगंत कीर्ती मिळाली. …आणि आदिलशाहची व बड्याबेगमची अब्रू धुळीस मिळाली.