Site icon My Marathi Status

देवाचा निर्णय

मुलांनो, अनेक वेळा असं होतं की, आपण जी गोष्ट करू, निर्मिती करू, रचना करू, लिखाण करू, शोध लावू किंवा कलाकृती तयार करू; तीच सुंदर आहे, उत्तम आहे, श्रेष्ठ आहे, असं आपल्याला वाटत असतं, पण खरं काय आहे? तिचं योग्य मूल्यमापन हे इतरांनी करायला हवं. लोकांनी ती चांगली म्हणायला हवं. ह्यालाच वेगळ्या भाषेत लोकमान्यता असं म्हणतात. जगन्नाथ क्षेत्रात एक राजा राज्य करीत होता. तो राजा हुशार, बुद्धिवान आणि ईश्वरभक्त होता. त्याच क्षेत्रात श्री व्यास ह्यांनी ‘जयदेव’ नावाच्या एका हरिभक्ताच्या रूपात जन्म घेतला होता.

जयदेव हा सश्रद्ध कुटुंबाचा मुलगा. तो लहानपणापासून हरिभक्ती करणारा, देवदर्शन, भजन-पूजन, मनन-चिंतन करणारा होता. जयदेवाची मुंज झाली. शास्त्राभ्यास झाला आणि एक मंगल दिवशी त्याच्या काव्यप्रतिभेला पंख फुटले. अल्पावधीत त्याने उत्तम, रसाळ अशी काव्यरचना असणारा ‘गीत गोविंद’ ह्या नावाचा ग्रंथ लिहून तयार केला. ‘गीत गोविंद’ ह्या ग्रंथात त्याने श्रीकृष्णाच्या अनेक लीला, त्यांचे गुणवर्णन, त्याचा बोध इ. गोष्टी मोठ्या उत्तम त-हेने सांगितल्या आहेत.

मधुर रसाळ भाषा, उत्तम शब्दरचना, सुंदर कल्पनाविस्तार, प्रभावी वर्णन ह्या गुणांनी परिपूर्ण असणाऱ्या त्या ‘गीत गोविंद’ ह्या ग्रंथाला लोकमान्यता मिळाली नसती, तरच नवल! त्याच्या या ग्रंथाला प्रचंड लोकमान्यता मिळाली होती. लोक जयदेवचा हा ग्रंथ मोठ्या आदराने वाचत होते. जयदेवाप्रमाणेच त्या नगरीच्या खुद्द राजाने पण श्रीकृष्ण लीला वर्णन करणारा तसाच एक ग्रंथ लिहिला होता. राजालाही असं वाटत होतं की, ‘मी राजा आहे. तेव्हा लोकांनी माझ्या ग्रंथाला श्रेष्ठ म्हणावं.

तो सर्वांनी वाचावा. त्याचं कौतुक करावं,’ पण… नेमकं काय होत होतं, तर एकाच विषयावर असलेल्या या दोन ग्रंथांपैकी लोकांना मात्र जास्त प्रिय होता तो जयदेवाचा ग्रंथ! लोक त्याच्या ग्रंथाचे वाचन, पारायण करीत राजाचा ग्रंथ घेत, पाहत अन् ठीक आहे, म्हणून लगेच ठेवून टाकीत, ह्या गोष्टीचा त्या राजाला फार राग येई. वाईटही वाटे, लोकांनी आपल्या ग्रंथाला मान्यता द्यावी, त्याचा स्वीकार करावा; म्हणून त्या राजाने थोडासा राजसत्तेचा, सामर्थ्याचा अन् राजाज्ञेचा वापर करून पाहिला पण त्याचा म्हणावा असा काहीच उपयोग झाला नाही.

मग एकदा राजाने काही महापंडितांना खास दरबारात बोलावून घेतले. त्यांना दोन्ही ग्रंथ दाखवले. राजाश्रित पंडितांपुढे प्रश्न पडला की, आता तोंडावर तरी डावे-उजवे कसे ठरवायचे? म्हणून मग सर्वांमते एक उपाय काढला गेला. तो असा की, राजा आणि जयदेव ह्यांनी लिहिलेले ते दोन्ही ग्रंथ हे प्रत्यक्ष मंदिरात नेऊन जगन्नाथाच्या पुढेच ठेवायचे अन् त्याच्या श्रेष्ठतेबद्दल प्रत्यक्ष देवाकडूनच निर्णय मागायचा झाले! सर्वानुमते असे ठरलं की, दुसऱ्या दिवशी रात्रीची शेजारती झाली की, ते दोन्ही ग्रंथ देवापुढे ठेवायचे.

जो ग्रंथ देवाला मान्य असेल, तो देवाजवळ राहील अन् जो मान्य नाही तो….. दुसऱ्या दिवशी राजाज्ञेप्रमाणे जयदेव आपला ‘गीत गोविंद’ हा ग्रंथ घेऊन आला, तर राजानेही त्याचा ग्रंथ आणला. दोन्ही ग्रंथ रात्री देवापुढे ठेवले गेले. दोन्ही ग्रंथकारांनी देवाला त्याचा निर्णय देण्यासाठी हात जोडून कळकळीची प्रार्थना केली. राजा, जयदेव, पुजारी अन् प्रजाजन ही मंडळी बाहेर आली. सर्वांसमोर मंदिराला कुलुपे घालण्यात आली. सर्व बंदोबस्त करून मंडळी आपापल्या घरी परतली.

दसऱ्या दिवशी सकाळी पहाटे काकड आरतीला भक्तमंडळी मंदिरात येऊन पाहतात तो काय ! जयदेवाचा ग्रंथ आत देवाच्या पायाशी तसाच होता; तर राजाचा ग्रंथ मात्र गाभाऱ्याबाहेर पडलेला ! देवीचा निवाडा मिळाला. लोकांना आनंद झाला. जयदेवाच्या त्या ग्रंथप्रियतेवर ईश्वरी इच्छेचाही शिक्का मिळाला. पण देवानं आपल्या लेखनसेवेचा अनादर केला, अस्वीकार केला; ह्या गोष्टीचे राजाला मात्र फार दुःख झाले. “देवा, तुला माझी भक्ती, माझी सेवा जर पसंत नाही; तर मग आता माझ्या जगण्यात तरी काय अर्थ आहे?’ असे म्हणत राजाने आपली तलवार मानेवर ठेवली.

आता ती तलवार चालवून राजा देहार्पण करणार…. तोच देव प्रगट झाले अन् म्हणाले, “राजा! थांब, मला तुझ्या भक्तीसेवेचा अनादर करायचा नाही. तुझ्या ग्रंथातल्या चोवीस ओव्या आपण जयदेवाच्या ग्रंथात समाविष्ट करू. ह्या निर्णयाला मात्र राजाने मान्यता दिली. राजा देवदर्शनाने धन्य झाला. पुढे श्री गीत गोविंदात त्या ओव्या घातल्या गेल्या. सर्वांनाच आनंद झाला.

तात्पर्य : श्रेष्ठत्व हे व्यक्तीवर नव्हे, तर गुणांवर ठरत असते.

Exit mobile version