देव प्रगटला खांबामधूनी
शिष्य मैत्रेय ह्याने आपले गुरू पाराशरऋषी ह्यांना एकदा एक प्रश्न विचारला की, “गुरुदेव ! जन्माने नव्हे, तर स्व-कर्माचे श्रेष्ठत्व प्राप्त झालेला अशा एखाद्या भक्ताची कथा आपण मला सांगा ना!” तेव्हा पराशरऋषी म्हणाले, “मैत्रेया, दिती ही दक्ष प्रजापती ह्यांची कश्यपांना दिलेली एक स्त्री. तिच्या दोन पुत्रांची नावे हिरण्याक्ष अन् दुसरा हिरण्यकश्यपू. हिरण्यकश्यपूने कठोर तप करून प्रत्यक्ष ब्रह्मदेवांकडून एक आशीर्वादपर वर मिळवला होता की, ‘दिवसा किंवा रात्री, जमिनीवर किंवा आकाशात, देवदेवता, नर किंवा पशू ह्यांच्या कुणाच्याच हातून त्याला मरण येणार नाही.
कोणतेही अस्त्र किंवा शस्त्र हे हिरण्यकश्यपूचा वध करू शकणार नाही. त्या मुळे त्याला मृत्यूचे भय उरले नाही. हा वर हिरण्यकश्यपूला मिळाला मात्र अन् तो असुरराज अधिकच उन्मत्त झाला. तो देव- देवता, ऋषी-मुनी, इंद्र, सूर्य, चंद्र, अग्नी, कुबेर आदी देवतांना फारच त्रास देऊ लागला. त्याने देवांचे अधिकार, होम-हवन, यज्ञ-याग ह्यामार्फत देवतांना मिळणारे हविद्रव्य हा भाग देवतांना मिळेनासा झाला.
त्याने यज्ञ-याग, होम-हवने बंद पाडले. यज्ञातला भाग हा देवदेवतांना न देता, तो स्वत: घेऊ लागला. स्वर्ग-पृथ्वीवरील देवदेवतांना, ऋषी, मुनी, जपी-तपी, सर्वसामान्य जनता ह्यांना त्रास देणे, पीडा पोहोचविणे इ. गोष्टी ह्या वाढतच गेल्या. असुरराज हिरण्यकश्यपू ह्यांचा सर्वांना एक दरारा व भीती वाटू लागली. ह्या हिरण्यकश्यपूला एकूण चार पुत्र होते.
त्यातलाच एक म्हणजे प्रल्हाद! हा मात्र इतरांपेक्षा वेगळा होता. हा आपल्या चारही पुत्रांना हिरण्यकश्यपूने गुरुगृही विद्याभ्यासासाठी पाठवले होते. टाटाची स्मरणशक्ती अफाट होती. तो एकपाठी, ईश्वरनिष्ठ अन ईश्वरभक्त होता. असुराच्या, राक्षसांच्या कुळात जन्म घेतला असला, तरी त्याचे देवाशी राग, वैर, शत्रुत्व नव्हते; तर उलट… एकदा हिरण्यकश्यपूने गुरुगृही ज्ञान संपादन करून आलेल्या प्रल्हादाला विचारले, “प्रल्हादा,तुला गुरूंनी काय शिकविले?” तेव्हा प्रल्हाद म्हणाला, “ज्याला आदि नाही, अंत नाही; जो जन्माला येत नाही; व मरतही नाही;
ज्याचा कधीच क्षय होत नाही किंवा नाश होत नाही; अशा त्या एका परमेश्वराला, ह्या सकल सृष्टीतील सर्व प्राणिमात्रांचे संगोपन, संवर्धन अन् संरक्षण करणाऱ्या विष्णू भगवंतालाच सर्वांनी शरण जावे. आपल्या प्राप्त नरजन्माचे सार्थक करून घ्यावे.’ हे शब्द ऐकले मात्र अन् हिरण्यकश्यपू एकदम रागाने म्हणाला, “मूर्खा! माझ्यापुढे तू त्या विष्णूचे, माझ्या शत्रूचे गुण गातोस? अरे, राजा हाच प्रजेचा पिता अन् परमेश्वर असतो. पिता हाच पुत्राचा परमेश्वर असताना, तू मला परमेश्वर न मानता; ह्या विष्णूला परमेश्वर किंवा पिता का अन् कसे मानतोस.
त्याचा विचार सोड. त्याचं नाव सोड. तो आपला शत्रू आहे. त्याला विसरून जा.” तेव्हा प्रल्हाद मोठ्या विनयाने म्हणाला, “तात, शत्रू किंवा मित्र कोण, हे कुणी ठरवायचं? ते आपणच ठरवतो ना? आपण जर एखाद्याशी वैर ठरलं, तर तो आपला शत्रू, आणि आपण जर मैत्री केली, त्याच्याबद्दल आदर, मैत्री, सख्यभावना बाळगली; तर तोच आपला मित्र होतो. मग शत्रू न मानता कुणालाही मित्र मानायला काय हरकत आहे? ” “नाही प्रल्हाद, नाही.
देवांशी मी कधीच मैत्री केली नाही, अन् करणारही नाही; मी त्याला मानणार नाही, त्याची पूजा करणार नाही, इतकंच काय; साधं त्याचं तोंडाने नावही घेणार नाही. बाळा, मलाही असंच वाटतं की, तू पण एक राक्षसपुत्र आहेस. तू त्या आपल्या शत्रूची म्हणजेच देवांची पूजा-भक्ती, नामस्मरण इ. काहीही करू नयेस. तू असला विचारही तुझ्या मनात येऊ देऊ नकोस.’ हिरण्यकश्यपूच्या ह्या सांगण्याचा त्या प्रल्हादाच्या मनावर मात्र काहीच परिणाम होत नव्हता. प्रल्हादाच्या मनातील ईश्वरभक्ती, निष्ठा अन् त्याची ईश्वरावरील श्रद्धा ह्यावर कोणताच परिणाम होत नव्हता.
आपल्या ह्या ईश्वरभक्त मुलाला त्या देवभक्ती, श्रद्धा, निष्ठा ह्यापासून दूर करण्याची. चाला परावृत्त करण्यासाठी म्हणून त्याच्या पित्याने काय काय केले नाही! हिरण्यकश्यपूने प्रल्हादाचा एका उंच कड्यावरून कडेलोट केला, तरी त्याला दवान अलगद झेलले. त्याला उकळत्या तेलाच्या कढईत टाकले, तरी त्याला काही झाल नाही. त्याला धगधगत्या अग्निज्वालेत टाकले; तरी त्या ज्वाला प्रल्हादाला जाळ शकल्या नाहीत. तर उलट प्रत्येक वेळी त्या सर्वसाक्षी, सर्वेश्वर अन् सर्वत्र भरून राहिलेल्या भगवंताने सर्व संकटांपासून त्या बालभक्ताचे संरक्षणच केले.
त्याचे प्रत्येक वेळी प्राण वाचवले. अन् एक दिवस बोलता-बोलता पिता-पुत्र ह्यांच्यात परमेश्वराचा दयाळूपणा, त्याचे भक्त रक्षणाचे ब्रीद, त्याचे सर्वत्र अणू-रेणू व्यापून राहणे, देव, देवत्व अन् त्याचे अस्तित्व ह्यावरून मोठा वाद झाला. शब्दाशब्दानं पित्याला क्रोध, राग, संताप वाढत गेला. एकदा कमरेच्या तलवारीला हात घालत हिरण्यकश्यपू म्हणाला, “बोल कुठे आहे, तो तुझा भगवंत? आण त्याला माझ्या समोर, नाहीतर आज मीच तुझा वध करतो.
बघू, ह्या माझ्या महालात तुझा देव हा कुठून अन् कसा येऊन तुला वाचवतो ते.” तेव्हा प्रल्हाद म्हणाला, “पिताजी! अहो, तो प्रभू सर्वत्र भरलेला आहे.” प्रल्हादाच्या ह्या शांत, गंभीर अन् तितक्याच विश्वासपूर्वक केलेल्या विधानाने पित्याचा राग आणखीनच वाढला. मग संतापलेला पिता पुत्राला विचारू लागला, “काय तुझा तो देव इथे, माझ्या महालात पण आहे?” “होय आहे.” एक निश्चयी उत्तर. “काय तुझा तो विष्णू, ह्या खांबातही आहे?’ हिरण्यकश्यपूने एका खांबाजवळ जात अन् त्यावर बुक्कीने आघात करत विचारले. “पिताजी! अहो, जो सर्वसाक्षी, सर्वव्यापी परमेश्वर तुमच्या माझ्यात आहे. तो परमात्मा ह्या खांबात नाही, असं कसं म्हणता येईल?” प्रल्हादाने उत्तर दिले.
“थांब, ह्या खांबात आहे ना तुझा देव? मग मीच आता त्याचा वध करतो.’ असं म्हणत त्या उन्मत्त हिरण्यकश्यपूने त्या खांबावर जोरात लाथ मारला. अन् काय! प्रचंड मोठा कडकडाट व्हावा तसा आवाज झाला अन् त्या खांबातून देव नरसिंह रूपात प्रगट झाले. त्यांनी हिरण्यकश्यपूला ओढत-ओढत उंबऱ्यापाशी नेले.
तेथे बसून नसिहाने त्याला आपल्या मांडीवर घेतले आणि आपल्या तीक्ष्ण नखांनी त्याचे पोट फाडून त्याला मारून टाकले.. ‘देव सर्वत्र आहे’, हे आपल्या भक्ताचं वचन सिद्ध करण्यासाठी, त्याची सत्यता पटवून देण्यासाठी, दिल्या वचनातील अटीची पूर्णता करण्यासाठी देवानं नरसिंह अवतार घेतला. अर्धा सिंह व अर्धा पुरुष ह्या रूपात, जमीन व आकाशात नाही; म्हणून मांडीवर, दिवसा व रात्री नाही म्हणून संध्याकाळी, अस्त्र व शस्त्रांनी नाही म्हणून नखांनी; असा नरसिंह अवतार घेऊन भगवंतांनी असुर हिरण्यकश्यपूचा वध केला व भक्त प्रल्हादाला दर्शन दिले. असा हा देव सर्वव्यापी व सर्वेश्वर आहे.
तात्पर्य : परमेश्वर हा सर्वव्यापी, सर्वसाक्षी आहे. तो सर्वत्र भरलेला आहे.