चंद्रसेन राजा व श्रीकर गोप
उज्जैनी नगरीत ‘चंद्रसेन’ नावाचा राजा राज्य करीत होता. त्याचा ‘मणिभद्र’ नावाचा एक जीवश्च कंठश्च मित्र होता. चंद्रसेन राजा शिवभक्त होता. तो ‘महाकालेश्वर’ या नावाच्या ज्योर्तिलिंगाची पूजा करीत असे. एक दिवस मणिभद्राने राजाला एक अजब मणी आणून दिला. तो मणी लखलखीत होता. कोणत्याही धातूला त्याचा स्पर्श झाला की त्याचे सोने होई. तो मणी पाहताच अनेकांचे अनेक रोग बरे होत असत.
चंद्रसेन राजा त्या मण्याला प्राणपणाने जपत असे. त्याचा गोफ करून राजाने तो मणी आपल्या गळ्यातच घातला होता. आजूबाजूच्या राज्यांतील अनेक राजांना तो मणी आपल्याकडे असावा असे वाटे. चंद्रसेनाजवळ तो मणी आहे, या एकाच कारणामुळे ते त्याचा द्वेष करीत. अनेकदा चंद्रसेनाला दुसरे राजे धमकी देत. पण चंद्रसेन कुणालाच घाबरत नव्हता.
एकदा अनेक राजे एकत्र आले. त्यांनी आपापले सैन्य उज्जैनी नगरीच्या सीमेवर आणले आणि नगरीला वेढा घातला. चंद्रसेन राजाकडे दूत पाठवला. दूताने भर दरबारात येऊन चंद्रसेनाला धमकावले. तो म्हणाला, “महाराज, तुमच्या गळ्यातला तो तेज:पुंज मणि नेण्यास मी आलो आहे. बऱ्या बोलाने तुम्ही तो दिलात तर ठीक. अन्यथा युद्धाला तयार व्हा. आम्ही चोहोकडून उज्जैनी नगरीस घेरले आहे.”
चंद्रसेन मनात विचार करू लागला. ‘अरे रे, या मण्यामुळे केवढा मोठा अनर्थ ओढवला गेला आहे. हा मणी देऊन टाकला तर आजूबाजूचे सर्व राजे व प्रजा मला भीरु समजेल. माझा क्षात्रधर्म लयास जाईल. हा मणी दिला नाही तर घनघोर युद्ध पेटेल. त्यात हजारो निरपराधी मारले जातील. काय करावे?’ राजाला काही सुचेना. विचार करून राजाने ठरविले व तो महाकालेश्वराला शरण गेला.
मंदिरात जाऊन त्याने महाकालेश्वराची पूजा करण्यास सुरुवात केली. इकडे राजाच्या सेनापतीने सैन्य जमवून शत्रूवर चाल केली. घनघोर युद्ध सुरू झाले. पण राजा मात्र शिवशंकराच्या आराधनेत मग्न होता. नगराबाहेर संहारक अस्त्रांनी युद्ध चालले होते. राजा मात्र निर्भयपणे शिवपूजनात मग्न होता. राज्यातील अनेक लोक त्याची पूजा पाहायला जमले. त्याच्या निर्भयपणाची प्रशंसा करू लागले. त्यात एक गुराख्याचा मुलगा होता.
राजाची पूजा पाहून त्यालाही पूजा करण्याची इच्छा झाली. तो घरी परतला. त्याच्या घराशेजारी माळरानात त्याने शंकराच्या पिंडीसारखा एक दगड ठेवला. त्याला मनोमन शिव समजून त्याने पूजा सुरू केली. आजूबाजूला दगडमातीशिवाय काहीच नव्हते. म्हणून त्याने पिंड म्हणून मानलेल्या दगडाला बिनवासाची रानफुले, गवत आणि दगड वाहिले.
डोळे मिटून तो ध्यानस्थ बसला व देवळातील महाकालेश्वराची मूर्ती त्याने डोळ्यापुढे आणली. त्याच्या आईने त्याला दुपारी जेवणासाठी हाका मारल्या. पण तिच्या हाका त्याला ऐकू आल्या नाहीत. आई झोपडीबाहेर येऊन बघते तर काय? मुलगा दगड मांडून माळरानात बसलेला. ती म्हणाली, “जेवायला चल बघू.” पण मुलगा ध्यानस्थ बसला होता. तिला राग आला. रागारागाने तिने फुले व दगड फेकून दिले आणि त्याची पूजा मोडून टाकली.
मुलगा भानावर आला. तेव्हा त्याला फार दुःख झाले. पूजा उधळलेली पाहून तो मूर्च्छित झाला. आईने त्याला शुद्धीवर आणले. तो आईला म्हणाला, “मी आता घरी कधीही येणार नाही. मी जीव देईन.” रागारागाने आई म्हणाली, “तुला जे करायचे ते कर. मी आपली घरी जाते.” इकडे मुलगा “हे शिवशंकरा, महाकालेश्वरा” असे म्हणत रडत बसला. शिवशंकराला त्या मुलाची दया आली. शंकराने विलक्षण चमत्कार केला.
मुलाची झोपडी रत्नजडित शिवमंदिर दिसू लागले. ते पाहून त्या मुलाला खूपच आनंद झाला. त्या मुलाने बाजूला पाहिले तर त्याला पूजेचे साहित्य दिसले. त्या साहित्याने त्याने मन लावून देवाची पूजा केली. शिवमंत्राचा जप त्याने अखंड चालू ठेवला. त्यामुळे शिव प्रसन्न झाला. शिव म्हणाला, “मी प्रसन्न झालो आहे. तू वर माग.” मुलगा म्हणाला, “देवा, माझ्या आईने अज्ञानाने तुझी पूजा उधळून लावली. तिला क्षमा कर.”
शंकराने ‘तथास्तु’ म्हटल्यावर मुलगा आईकडे गेला व त्याने तिला शंकराच्या दर्शनासाठी आणले. प्रत्यक्ष शिवशंकर दारी आलेले पाहून तिला खूप आनंद झाला. तिने वाकून शंकराला नमस्कार केला. तिला राहवेना. तेथून ती निघाली. ती थेट राजाकडे. राजा महाकालेश्वराच्या मंदिरात होता. तिथे कथन केलेला चमत्कार ऐकून राजा ते रत्नजडित मंदिर बघण्यासाठी तिच्याबरोबर निघाला.
राज्यात ही वार्ता पसरली आणि लोकांच्या झुंडीच्या झुंडी रत्नजडित देवळापुढे आल्या. नगराबाहेरील शत्रूच्या सैन्यातही ही वार्ता पसरली. शत्रुराजांनी आपले दूत रत्नजडित मंदिर बघण्यासाठी पाठवले. अनेक राजांनी चंद्रसेन राजाला निरोप पाठवले. काहींनी लिहून कळवले, “राजा तुझी व तुझ्या राज्यातील लोकांची शिवभक्ती अद्भुत आहे. ती पाहून आमची मने पालटली.
आम्ही त्या भक्त बालकाचे दर्शन घेण्यासाठी उज्जैनीस येत आहोत.” सर्व शत्रुराजांनी एकतर्फी युद्ध थांबवले. शिवमंदिरापुढे येऊन सर्व राजांनी शंकराच्या पिंडीला साष्टांग दंडवत घातले व ते म्हणू लागले, “शिव प्रसन्न झाला की काहीही अद्भुत घडू शकते. झोपडीचा राजवाडा होतो.
शत्रू मित्र होतात. उमा-रमणाची कृपा झाली की अशक्य शक्य होते हेच खरे.” त्याचवेळी या रत्नजडित शिवालयात मोठी जत्रा होती. तेथे हनुमान प्रकट झाला. हनुमानाने त्या छोट्या मुलाला जवळ घेतले व त्याला “नमः शिवाय’ हा पंचाक्षरी मंत्र दिला व त्याचे नाव ‘श्रीकर’ असे ठेवले. हनुमंताने त्या मुलाला सांगितले, “श्रीकरा, तुझ्या आठव्या पिढीत नंद नावाचा गवळी जन्माला येईल.
श्रीविष्णू त्याच्या पोटी श्रीकृष्ण म्हणून जन्माला येतील. हा श्रीकृष्ण कंस, शिशुपाल यांचा वध करून कौरवांचा नाश करील.” एवढे सांगून हनुमान अंतर्धान पावला. सर्व राजे हा प्रसंग आश्चर्याने पाहत होते. नंतर त्यांनी श्रीकराच्या नावाने प्रचंड जयजयकार केला.
अंती चंद्रसेन व श्रीकर हे दोघे शिवधराला पोहोचले. ही कथा श्रवण केल्यास किंवा या कथेचे वाचन केल्यास संतती, संपत्ती व दीर्घायुष्य प्राप्त होईल. “हे शंकरा, स्कंद पुराणातील ही अमृतमय कथा सज्जनांना सदैव श्रवण करण्यास मिळो.” “श्री सांबसदाशिव अर्पणमस्तु ॥”