चंद्रराव मोऱ्यांचे पारिपत्य
शिवरायांनी मोंगलांशी संधान बांधल्याचे समजताच आदिलशाहने शहाजीराजांना कैदेतून मुक्त केले. आपण शहाजीला कपटाने अटक करून त्याचा अपमान केला आहे. अशा परिस्थितीत आपण याला कर्नाटकच्या मोहिमेवर पाठविले, तर अपमानाचा सूड घेण्यासाठी तो शिवाजीकडे जाईल किंवा मोंगलांची सरदारकी पत्करून आपल्या विरुद्ध त्यांना मदत करील अशी भिती आदिलशाहला वाटू लागली; म्हणून त्याने प्रेमळपणाचा आव आणून शहाजीराजांना सांगितले, “अनेक मोहिमांमुळे तुम्हांला विश्रांतीची गरज आहे; म्हणून तुम्ही काही दिवस विजापुरातच राहून विश्रांती घ्यावी.”
शहाजीराजांनी ते मान्य केले. शहाजीराजे चार वर्षे विजापुरात राहिले, पण त्यामुळे शिवरायांची मोठी पंचाईत झाली. आपण स्वराज्य विस्तारासाठी लगतचा आदिलशाही मुलूख ताब्यात घेऊ लागलो, तर आदिलशाह आपल्या वडिलांना पुन्हा कैद करेल अशी त्यांना भीती वाटत असल्याने शहाजीराजे विजापुरात असेपर्यंत शिवरायांना काहीच करता येत नव्हते; परंतु त्यामुळे शिवाजीची स्वराज्य विस्ताराची हौस फिटलेली दिसते असे आदिलशाहला वाटले आणि त्याने शहाजीराजांना कर्नाटकात पाठविले. याच वेळी जावळी प्रकरण निर्माण झाले.
महाबळेश्वर, मकरंदगड, मंगलगड आणि पारघाटाचे प्रचंड पहाड यांच्या दाटीत मोऱ्यांची जावळी वसली होती. मोरे पिढ्यान्पिढ्या जावळीच्या दरीत आपली दौलत थाटून बसले होते. ते विजापूरच्या ताब्यात नांदत होते. जावळी जहागिरीचे चंद्रराव (दौलतराव) मेल्यानंतर ते निपुत्रिक असल्याने त्यांची जहागिरी नको त्या भाऊबंदांकडे जाऊ नये किंवा आदिलशाहने ती जप्त करू नये; म्हणून दौलतरावांच्या विधवा पत्नीने शिवरायांच्या मदतीने आपल्या पसंतीचा वारस म्हणून यशवंतराव मोरे याला दत्तक घेतले ; त्यामुळे तो जावळीचा चंद्रराव झाला. …पण आपल्या उपकारका शिवरायांशी तो कृतज्ञतेने वागू लागला.
पुढे तीन-चार वर्षांत त्याला सत्तेची, वैभवाची धुंदी चढली. तो शिवरायांना तुच्छ मानू लागला. त्याची भूक वाढली. गुंजण मावळची देशमुखी आपलीच आहे असे तो हक्काने बोलू लागला. खरे तर, गुंजण मावळाच्या देशमुखीवर शिळमकर देशमुखांचा हक्क होता. याच शिळमकर मंडळींनी फत्तेखानाच्या स्वारीत शिवरायांच्या बाजूने उभे राहून पराक्रम गाजविला होता; म्हणून शिवरायांनी शिळमकरांची बाजू घेऊन त्यांना अभय दिले. चंद्ररावाला ते आवडले नाही. याच वेळी शिवरायांच्या राज्यात एक पाप घडले. मुसे खोऱ्यातील रंगो त्रिमल कर नावाच्या एका कुलकर्याने एका विधवाबाईशी जबरदस्तीने पापकर्म केले.
शिव समजताच ते भयंकर संतापले. शिवरायं आपणास ठार मारतील या भीतीने गोल जावळीच्या चंद्रराव मोऱ्याच्या आश्रयाला गेला. चंद्ररावांनी गुन्हेगाराला पाठीशी घातले हे शिवरायांना आवडले नाही. चंद्रराव मोकी टगेगिरी दिवसेंदिवस वाढू लागली; त्याने कान्होजी जेध्यांच्या व स्वराज्याच्या हद्दीत असले रोहिडखोऱ्यावरच चाल केली; चिखलीच्या रामजी वाडकर पाटलाला व त्याच्या मलाला र केले; चंद्रराव शिवरायांचे उपकार विसरून गेला; त्याची बुद्धी फिरली. त्याचा कारभारी हणमंतराव मोरे हाही अत्यंत उर्मट बनला. तो शिवरायांचे अनुकरण करून स्वत:च स्वतंत्र व्हावे या आकांक्षेने त्यांच्याशी स्पर्धा करू लागला.
अशा या शिरजोर चंद्ररावाचा बंदोबस्त केलाच पाहिजे असे शिवरायांना वाटू लागले. शिवरायांनी जासुदाबरोबर जावळीला चंद्ररावास अत्यंत कडक शब्दांत निरोप पाठविला, ‘तुम्ही स्वत:ला राजे म्हणविता. राजे तर आम्ही आहोत. आम्ही मावळ प्रांतावर स्वराज्य स्थापन करून स्वधर्माचा उत्कर्ष चालविला आहे. ह्या कामी तुम्ही आम्हांला संतोषाने सामील व्हावे. हे राज्य श्री शंभूने आम्हांला दिले आहे.
तुम्ही आपणास राजे म्हणवू नये. आमच्या विरुद्ध विजापुराकडे फितुरी करू नये. आपला मुलूख खाऊन हरत-हेने स्वराज्याची चाकरी करावी. गैरमार्गाने चालाल, तर तुमची जावळी जमीनदोस्त करून तुम्हाला कैदेत ठेवू.’ शिवरायांच्या पत्रातील हा मजकूर ऐकताच चंद्रराव खो खो करून हसला. तो भयंकर संतापला. त्याने शिवरायांना उलट, अत्यंत तिखट असे उत्तर पाठविले. लामाला ‘तुम्हाला राजे कोण म्हणतो? तुम्ही काल राजे जाहला.
तुम्हास राज्य कोणी दिले? आपले घरी बसून आपणच स्वत:ला राजे म्हटल्यास तुम्ही राजे बनता की काय? तुम्ही म्हणता की, जावळीत येऊ. येता जावळी जाता गोवळी. या तर खरे जावळीवर चालून, म्हणजे समजेल कसे गोवून पडाल ते. एक मनुष्य जिवंत माघारी जाणार नाही. तुम्हामध्ये पुरुषार्थ असेल, तर उदईक येणार ते आजच या! आम्ही कोकणचे राजे असून, आमचा राजा श्रीमहाबळेश्वर. त्याचे कृपेने राज्य करतो.
आम्हास श्रींचे कृपेने बादशहाने मेहेरबान होऊन राजे किताब, मोरचेल, सिंहासन दिले आहे. पिढ्यान्पिढ्या आम्ही हा सन्मान उपभोगीत आहोत. इतक्या उपर तुम्ही आमच्या वाटेस जाऊ नये. आमचे नाव काढाल, तर पस्तवावे लागेल. यश न घेता अपयशास पात्र होऊन जाल.’ हे मग्रुरीचे उत्तर ऐकताच शिवराय संतापले. हे जातभाई… ह्याजवर शस्त्र चालवू नये… अशी शिवरायांची इच्छा होती, पण त्यास दस्त न करावे तर स्वराज्याचा सगळाच उद्योग सोडून द्यावा लागेल.
हे मोरे शिवरायांना हलका समजतात. हा घाव त्यांच्या वर्मी लागला. मोरे जन्माने क्षत्रिय असतीलही, पण आपण पराक्रमाने क्षत्रिय आहोत हे सिद्ध करण्याची वेळ आली आहे. मातोश्री, सोनोपंत डबीर, नेताजी पालकर, नारोपंत हणमंते अशा सर्वांनी एकत्र जमून पुष्कळ वाटाघाटी केल्या आणि मनाचा निश्चय करून मोऱ्यास निरोप पाठविला. ‘जावळी खाली करोन, हात रुमाले बांधोन, भेटीस येवोन हजूरची चाकरी करणे. इतकियावरी बदफैला केलिया मारले जाल!’ शिवरायांचा हा निरोप कळताच चंद्ररावाने मिशीला पीळ भरला व उर्मट उत्तर पाठविले. ‘जावळीस येणारच तरी यावे! दारुगोळी महजूद आहे.
काही बेजबाबास खुले घालून लिहिले, ते कासियास ल्याहाविले?’ हे उत्तर ऐकताच शिवरायांचा क्रोधानी पेटला. त्यांनी ताबडतोब कान्होजी जेधे, हैबतराव शिळमकर, संभाजी कावजी कोंढाळकर, बांदल आणि रघुनाथ सबनीस यांना बोलावून घेतले. शिवराय त्यांना म्हणाले, “चंद्रराव मोरा बेवकूफ, बदतमीस आहे. मोऱ्यांची हरळी जावळीतून उखडलीच पाहिजे. त्याला मारल्याशिवाय राज्य साधत नाही. तुमच्याशिवाय दुसरा कोणीही हे कार्य करू शकणार नाही.” शिवरायांनी आज्ञा करताच कान्होजी जेधे, हैबतराव शिळमकर, कोंढाळकर, बांदल इत्यादी जावळीच्या खोऱ्यात शिरले. त्यांनी चंद्रराव मोऱ्याला चहूबाजूंनी घेरले.
चंद्ररावांजवळ घोडदळ, पायदळ भरपूर होते. शिवरायांनी एकदम हल्ला केला. भयंकर कापाकापी झाली. मोऱ्यांची दाणादाण उडाली. जावळी हातची जात आहे हे पाहून चंद्रराव मोरे पळाला. त्याने रायरीचा गड गाठला. या वेळी मोऱ्यांच्या बाजूने मुरारबाजी देशपांडे लढत होता. दुसरा अर्जुनच तो! त्याने पराक्रमाची शर्थ केली. शिवरायांना त्याच्या शौर्याचे कौतुक वाटले. त्यांनी त्याला प्रेमाने समजाविले व स्वराज्यात सामील केले. चंदराव रायरीवर जाताच शिवरायांनी रायरीला वेढा घातला. शेवटी चंद्रराव शिवरायांना शरण आला. चंद्ररावाला गडाखाली लष्करात ठेवून शिवराय गडावर गेले.
चंद्ररावाला दुर्बुद्धी झाली. त्याच्या आयुष्याची दोरीच तुटली! त्याने महाराजांच्या छावणीत राहून विजापूरशी सूत बांधले. मुधोळच्या बाजी घोरपड्यांकडे चोरून पत्रे पाठविली. शिवरायांच्या हेरांनी ती वाटेतच पकडली. त्याच वेळी चंद्ररावाने छावणीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण तो पकडला गेला. शिवरायांनी त्याची गर्दन उडविली व बाजी व कृष्णाजी या त्याच्या मुलांनाही ठार मारले. जावळी स्वराज्यात आली. तिच्या जवळचे चंद्रगड, मकरंदगड, कांगोरी, सोनगड, चांभारगड हेही किल्ले स्वराज्यात दाखल झाले. रायरी गड हाती येताच शिवरायांनी त्याचे नाव ‘रायगड’ असे ठेवले.
जावळी खोऱ्यातच एक डोंगर होता. त्यावर गड उभा केला तर तो शत्रूपासून सुरक्षित राहील असा विचार करून त्यावर गड बांधण्याची जबाबादारी शिवरायांनी मोरोपंत पिंगळे यांच्यावर सोपविली. त्यासाठी होणाऱ्या खर्चाची चिंताच नव्हती, कारण त्याला पुरून उरेल इतके धन शिवरायांना चंद्ररावाच्या वाड्यात मिळाले होते; त्यामुळे मोरोपंतांनी गडबांधणीचे काम ताबडतोब हाती घेतले. त्या गडाचे नाव शिवरायांनी प्रतापगड’ असे ठेवले. मोऱ्यांचे पारिपत्य केल्यावर शिवराय मुरारबाजीसह अत्यंत आनंदाने राजगडाकडे निघून गल.