ब्रह्मराक्षसाची कथा

‘वामदेव’ नावाचे एक ऋषी अरण्यातून एकटेच जात होते. ते रानातून जाताना शंकराचे ध्यान करीत होते. ते ध्यान ते मनातल्या मनात करीत होते. कारण त्यांनी मौनव्रत धारण केले होते. ते अरण्यातून चालत असता एक भयानक ब्रह्मराक्षस त्यांच्यापुढे आला. त्याचे डोळे निखाऱ्यासारखे लाल होते. तो भुकेला होता. त्याने वामदेवाला घट्ट धरले.

वामदेवांना तो खाऊन टाकणार होता. तो वामदेवांना तोंडात टाकणार तोच त्या ऋषींचा स्पर्श होताच राक्षसाच्या अघोरी वृत्तीच पालटल्या. वामदेवाचे भस्म त्या राक्षसाच्या अंगी लागताच तो सात्त्विक झाला. त्याचे रूपही सुंदर झाले. वामदेवाना याचे भान नव्हते. बह्मराक्षस वामदेवांच्या पाया पडला. तो वामदेवांना म्हणाला, “गुरुवर्य, आपल्या स्पर्शाने मी पुनित झालो.

मला २५ जन्मांचे ज्ञान झाले. पूर्वी मी ‘दुर्जय’ नावाचा राजा होतो. कितीतरी लोकांना मी लुटले. खूप स्त्रिया मी भ्रष्ट केल्या. शेवटी मला क्षय झाला व मी मेलो. यमदूतांनी मला अनेक वर्षेपर्यंत नरकात टाकले. माझे हातपाय तोडले. लिंग कापले.

माझ्या देहाचे यमाच्या कुत्र्यांनी लचके तोडले. ३००० वर्षे निरनिराळे हाल करून त्या यमदूतांनी मला वाघाच्या जन्माला घातले. त्यानंतर अनेक प्राण्यांचा जन्म घेऊन शेवटी मला हा ब्रह्मराक्षसाचा जन्म आला. आज तुमच्या स्पर्शाने मी पावन झालो. मला पूर्वजन्मीचे ज्ञान प्राप्त झाले.” वामदेव त्याला म्हणाले, “शिवाचा महिमा अगाध आहे. मी तुला एक सत्यघटना सांगतो. एक ब्राह्मण होता.

एका शूद्र स्त्रीशी त्याने शरीरसंबंध ठेवले होते. तिच्या पतीला जेव्हा हे कळले तेव्हा त्याने त्या ब्राह्मणाला गुप्तपणे ठार मारले व त्याचे प्रेत गावाबाहेर टाकून दिले. यमदूतानी त्याचा सूक्ष्म देह यमाकडे नेला. तो दिवस महाशिवरात्रीचा होता. शिवालयासमोर एक चिता जळत होती. तेथे एक कुत्रा त्या चितेत लोळला आणि धावत तो कुत्रा त्या ब्राह्मणाच्या प्रेतावरून उडी मारून गेला.

कुत्र्याच्या अंगावरचे चिताभस्म त्या प्रेताच्या कपाळावर पडले. त्या भस्माचा प्रभाव असा झाला की तो ब्राह्मण शिवलोकात गेला. म्हणूनच हे बह्मराक्षसा, तुझासुद्धा माझ्या भस्मस्पर्शाने उद्धार झाला.” तोच वामदेव हे सांगत असताना त्या बह्मराक्षसाला शिवलोकी नेण्यासाठी विमान आले व तो राक्षस दिव्यरूपाने शिवलोकी गेला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: