Site icon My Marathi Status

भिल्लाची कथा

पांचाल देशात ‘सिंहकेतू’ नावाचा एक राजा होता. तो त्याच्याबरोबर काही भिल्लांना घेऊन रानात शिकारीला गेला. ते सगळे चालले असता त्यांच्यातील एका भिल्लाला एक पडके शिवमंदिर दिसले. तो मंदिरात शिरला असता तेथे त्याला जमिनीतून वर आलेले पण आडवे पडलेले शिवलिंग दिसले. त्याने ते राजाला दाखविले. राजा भिल्लाला म्हणाला, “हे शिवलिंग तुला मिळाले आहे. याची तू श्रद्धेने पूजा कर.”

भिल्ल म्हणाला, “पण पूजा कशी करायची? मला माहीत नाही.” राजा म्हणाला, “पूजेचा विधी साधा आहे. शंकराला चिताभस्म खूप आवडते. म्हणून तू रोज नव्या चिताभस्माने शंकराची पूजा कर आणि शंकराच्या पिंडीवर चिताभस्म वाहिले की लगेच नैवेद्य दाखव.” भिल्लाचा राजावर पूर्ण विश्वास होता. भिल्लाने ते शिवलिंग घरी आणले आणि राजाने सांगितलेला पूजाविधी त्याने आपल्या पत्नीला सांगितला.

भिल्ल नगरात जाऊन थोडेसे चिताभस्म आणी व शिवलिंगाची पूजा करी. आरती संपल्यावर त्याची बायको घरातून नैवेद्य करून आणी. अशा रीतीने तो भिल्ल रोज शंकराची पूजा करू लागला. एक दिवस शंकराने त्या भिल्लाची परीक्षा घेण्याचे ठरविले. त्याला नगरात कोठेही चिताभस्म मिळेना. त्यामुळे त्याला पूजा करता येईना, नैवेद्य दाखवता येईना. भिल्लाची बायको म्हणाली, “तुम्ही पूजेत खंड पाडू नका.

मी स्वत:ला जाळून घेते. म्हणजे तुम्हाला शंकराच्या पूजेसाठी चिताभस्म मिळेल.” इतके बोलून ती स्वयंपाकघरात गेली आणि तिने स्वतःला पेटवले. भिल्ल बघतच राहिला. तिचा देह जळून त्याचे भस्म झाले. त्या भिल्लाने ते भस्म शिवलिंगावर वाहिले. आता स्वयंपाकघरातून नैवेद्य यायला हवा होता. तो भिल्ल पूजा पूर्ण होईपर्यंत पूजेतून उठत नसे. त्याची बायको नेहमी नैवेद्य आणत असे.

भिल्ल पूजेतच मग्न होता. आपल्या बायकोचे भस्म झाले आहे, हे तो विसरून गेला होता. त्याने सवयीप्रमाणे तिला हाक मारली. म्हणाला, “अगं नैवेद्य आण. उशीर करू नकोस. नैवेद्याला विलंब झाला तर शंकर आपल्यावर कोपेल. लवकर ये.” तोच त्याची बायको नैवेद्य घेऊन स्वयंपाकघरातून बाहेर आली आणि त्याच्यामागे उभी राहिली. भिल्लाने मागे वळून बघितले. त्याची बायको तेजस्वी झाली होती. भिल्लाने नैवेद्य दाखवला.

पति-पत्नीनी शंकराची पूजा केली. भिल्लाचे रूपही पालटले होते. तो शिवशंकरासारखा दिसत होता. भिल्लाच्या लक्षात आले. त्याने पत्नीच्या चितेचे भस्म शंकराला वाहिले होते. ती पुन्हा जिवंत झालेली पाहून भिल्ल आश्चर्यचकित झाला. त्याने ‘सिंहकेतू’ राजाला सर्व चमत्कार सांगितला. राज्यात सगळीकडे हा चमत्कार लोकांना कळला. लोकांनी भिल्ल व त्याची पत्नी यांचे बदललेले रूप बघण्यास गर्दी केली. त्याचवेळी आकाशातून एक दिव्य विमान खाली आले आणि तो भिल्ल व त्याची पत्नी शिवलोकाला गेली.

Exit mobile version