Site icon My Marathi Status

भद्रसेन आख्यान

रुद्राक्षाचा महिमा फार मोठा आहे. रुद्राक्षाचे पूजन केले तर शिवपूजनच घडते. एकमुखी रुद्राक्ष ऐश्वर्य देणारा आहे. रुद्राक्षावर जप केला. तर सर्व मंत्र फलदायी होतात. रुद्राक्षाविषयी ही कथा काश्मीर देशात ‘भद्रसेन’ नावाचा एक राजा होता. ते प्रजेचा फार आवडता होता. त्याची बायको सुंदर व पतिव्रता होती. त्याचा प्रधान सद्गुणी होता.

राजा भद्रसेन व त्याचा प्रधान दोघे शिवभक्त होते. भद्रसेनाला एक मुलगा होता. त्याचे नाव ‘सुधर्म’. प्रधानाला एक मुलगा होता. त्याचे नाव होते ‘तारक’. हे दोन्ही मुलगे रुद्राक्षाच्या माळा घालीत. शंकराची पूजा करीत. कितीही चांगली वस्त्रे व अलंकार घातले तरी ते काढून ते रुद्राक्ष धारण करीत. अंगाला भस्म फासून बसत. राजाला व प्रधानाला त्यांची काळजी वाटे.

एक दिवस राजाकडे पराशर ऋषी आले. त्यांच्याबरोबर आणखीही काही ऋषी होते. पराशर ऋषींचे राजाने स्वागत केले व तो त्यांना म्हणाला, “गुरुदेव, आमची दोन्ही मुले सुधर्म व तारक ही विरक्त आहेत. ती भस्म लावतात आणि रुद्राक्ष अंगावर घालतात. हे पुढे राज्यशकट कसा चालवणार? याची आम्हाला काळजी वाटते.” पराशर म्हणाले, “हे राजा, सुधर्म व तारक शिवभक्त कसे झाले, ते मी तुला सांगतो.”

“पूर्वी काश्मीरमध्ये ‘नंदीग्राम’ नामक नगरात ‘महानंदा’ नावाची एक सुंदर वेश्या राहत होती. ती खूप श्रीमंत होती. तिच्याजवळ सारे काही वैभव होते. ती एका रात्रीसाठी ज्या पुरुषाची शय्यासोबत करी, त्यालाच ती पती मानत असे. त्या रात्री इंद्राने जरी इच्छा व्यक्त केली, तरी ती त्याला परत पाठवी. ती शंकराची भक्त होती. शिवरात्रीला ती उपास करी. तिने घरात एक कोंबडा व माकड पाळले होते. त्या प्राण्यांच्या गळ्यात रुद्राक्ष बांधून ती त्यांना शिवलिंगासमोर नृत्य करायला शिकवत असे. ती कोंबड्याच्या व माकडाच्या अंगाला व डोक्याला आपल्या हाताने भस्म लावी.

तिच्या सहवासात त्या दोघांना शिवभक्ती घडे. एक दिवस महानंदेची परीक्षा घेण्यासाठी शिवशंकर सौदागराच्या वेषात तिच्याकडे आले. सौदागराचे तिने स्वागत केले. त्याला हाताला धरून मंचकावर नेले. त्याचवेळी तिला त्याच्या हातात एक अमूल्य कंकण दिसले. तिला ते कंकण आवडले हे सौदागराच्या लक्षात आले. त्याने आपल्या मनगटातून कंकण काढून ते तिच्या हातात घातले. तिला खूप आनंद झाला.

ती म्हणाली, “आजपासून तीन दिवस मी तुमची झाले. मी मनःपूर्वक तुमची सेवा करीन.” सौदागर म्हणाला, “पण मी शिवभक्त आहे. माझ्याजवळचे एक दिव्य शिवलिंग मी तुला देतो. त्याचा तू सांभाळ कर. मात्र एक लक्षात ठेव. हे लिंग जर नष्ट झाले किंवा जळाले तरी मी तत्काळ आगीत उडी घेईन.” महानंदेने ते देदीप्यमान शिवलिंग आपल्या नृत्यागारात ठेवले. रात्र झाली. सौदागर व महानंदा आपल्या शयनगृहात गेली.

ते दोघे एकांतात रत झाले असता तिच्या नृत्यशाळेत आग लागली. सौदागर तिला म्हणाला, “महानंदे, तुझ्या शाळेला आग लागली आहे.” ती झोपेतून उठली, आणि पाहते तर काय! नृत्यशाळेत आगीचा डोंब उसळलेला. ती नृत्यशाळेकडे धावली आणि तेथे असलेल्या कोंबड्याला आणि माकडाला बाहेर काढून त्यांचे प्राण वाचवले. पण नृत्यगार मात्र जळून गेले होते.

सौदागर तिच्या बरोबर होता. त्याने तिला विचारले, “अग महानंदे, माझे शिवलिंग कोठे आहे?” महानंदा म्हणाली, “ते मी नृत्यागारातच ठेवले होते.” ती तशीच नृत्यागारात शिरली. पण शिवलिंगाचे भस्म झाले होते. महानंदा म्हणाली, “माझ्या हातून अपराध घडला.” आणि ती रडू लागली. सौदागर म्हणाला, “मला आता अग्निप्रवेश करावा लागेल.” आणि महानंदा रडत असतानाच ‘ओम नमः शिवाय’ असे म्हणत त्याने अग्नीत उडी घेतली.

महानंदा, त्याची पती म्हणून तीन दिवस सेवा करणार होती. पण पती गेल्यावर जगून काय करायचे, असा विचार करून तिनेही शिवनामाचा जप करीत अग्नीत उडी घेतली आणि ती त्याच्याबरोबर सती गेली. त्याचवेळी एक आश्चर्य घडले. अग्नी शांत झाला आणि तेथे साक्षात शंकर प्रगटला. शिव म्हणाला, “महानंदे, मीच तुझ्याकडे आलेला सौदागर. मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. वर माग.” महानंद म्हणाली, “माझ्या नंदीग्राम नगराचा उद्धार करा.” शंकर म्हणाले, “तथास्तु.” तोच तेथे आकाशातून एक विमान आले आणि सती महानंदा त्या विमानात बसून कैलास पर्वतावर गेली.

महानंदा शिवलोकी गेली. पण तिने पाळलेला कोंबडा व माकड शिवभक्तीमुळे आता राजपुत्र व प्रधानपुत्र म्हणून जन्माला आले आहेत. ते तुमचा उद्धार करतील.” भद्रसेन व प्रधान पराशरांच्या पाया पडले. राजा भद्रसेनाने पराशराला विचारले, “मला हा एकुलता एक मुलगा आहे. त्याचे भविष्य सांगाल का?” पराशर ऋषी म्हणाले, “मी खरे तेच सांगेन. पण ते तुम्हाला विषाहून कटू वाटेल.”

भद्रसेन म्हणाला, “गुरुदेव, अनमान करू नका. सत्य तेच सांगा.” पराशर ऋषी म्हणाले, “तुझा पुत्र ज्या दिवशी बारा वर्षांचा होईल, त्याच दिवशी त्याला मृत्यू येईल.” ऋषींचे शब्द ऐकताच राजा मूर्च्छित होऊन खाली पडला. राजवाड्यात हाहाकार झाला. थोड्याच वेळात पराशर ऋषींनी राजाला सावध करून म्हटले, “हे राजन, तुला मी एक रहस्य सांगतो. ते तू मनावर घेतलेस तर तुझे दुःख दूर होईल. हे राजही वेदांचे रहस्य आहे. ते म्हणजे ‘रुद्राध्याय’.

जे रुद्राध्यायाची पारायणे करतात, त्यांना दीर्घायुष्य मिळते. म्हणून हे भद्रसेना, तू दहा हजार रुद्रावर्तने कर. त्याचा शंकरावर अभिषेक कर. त्यामुळे कोणाचाही मृत्यू टळतो. तुझ्याही मुलाचा मृत्यू टळेल.”. राजाने हजार ब्राह्मण बोलावले. त्यांनी आवर्तने सुरू केली. रुद्रघोष सुरू झाला. राजपुत्राचा मृत्यूचा दिवस. राजपुत्र एकाएकी मूर्च्छित झाला. त्याचे हृदय बंद पडले. तोच पराशर ऋषींनी रुद्रमंत्राचे पवित्र पाणी राजपुत्राच्या अंगावर शिंपडले.

राजपुत्र सावध झाला. राजाने राजपुत्र सुधाला तुला मूर्छा कशी आली? असे विचारले. तेव्हा तो म्हणाला, “एक भयानक कालपुरुष मला घेऊन जात होता. तोच चार शिवदूत धावत आले. त्यांच्यापुढे त्या कालपुरुषाचे काहीच चालले नाही.” भद्रसेनाला आनंद झाला. “जय शिवशंकर” असे म्हणत तो सांब शिवाचा जयजयकार करू लागला. त्याचवेळी एक आश्चर्य घडले. तेथे अचानक देवर्षि नारदाचे आगमन घडले.

नारदाचे आगमन होताच यज्ञकुंडातून अग्निदेव प्रगट झाला. राजा, प्रधान व ब्राह्मणानी नारदाची पूजा केली. राजाने नारदाला प्रश्न केला, “हे देवर्षि, तिन्ही लोकात आपण फिरता, आपणास काही विशेष दिसले का?” नारद म्हणाले, “मी भूलोकावर येताना वाटेत चार शिवदूत पाहिले ते तुझ्या मुलाचा प्राण घेऊन जाणाऱ्या मृत्यूला विचारत होते, “कोणाच्या आज्ञेवरून सुधाला नेत आहेस?” तेव्हा यमाने त्यांना सुधाच्या ललाटी लिहिलेला लेख दाखवला.

राजपुत्राला बाराव्या वर्षी मृत्युयोग होता. रुद्रानुष्ठानाने तो टळला आणि तो टळल्यावर राजपुत्राला दीर्घायुष्य व राजयोग होता. रुद्रानुष्ठानामुळे तो टळल्याचे लक्षात येताच यमाने शिवदूतांची क्षमा मागितली व तो निघून गेला.

हे भद्रसेनाचे आख्यान जे वाचतील त्यांना दीर्घायुष्य व संतती प्राप्त होईल, भद्रसेनाने आपल्या मुलाला राज्य दिले आणि तो व प्रधान शिवरूप झाले. शिवलीलामृताचा हा अकरावा अध्याय पठण केल्याने अकरा रुद्र संतुष्ट होतात. हा अध्याय म्हणजे कल्पतरू असून इच्छित फळ देणारा आहे.

Exit mobile version