हॅलो मित्रांनो कशे आहात तुम्ही आज मी तुम्हाला बैलपोळा माहिती, इतिहास मराठी । Bail Pola Information in Marathi सांगणार आहे तर चला बघुयात.
आणखी वाचा – गोकुळाष्ठमी
बैलपोळा मराठी । Bail Pola Information in Marathi
आपला देश कृषिप्रधान आहे. पूर्वापार येथील मुख्य व्यवसाय शेती हा आहे. शेतकरी बारा महिने अठरा काळ शेतात कष्ट करतो. अनेक प्रकारची धान्ये पिकवितो म्हणून आपल्याला पोटभर अन्न मिळते. ही शेती मुख्यतः बैलावर अवलंबून असते. नांगरणी, कुळवणी, पेरणी, मळणी इत्यादी शेतीची कामे बैल करतात. बैल आहेत म्हणून आपणाला अन्न मिळते. बैल हे शेतकऱ्याचे सर्वस्व आहे. दैवत आहे. आपली संस्कृती श्रमाची पूजा करणारी आहे. म्हणून आपल्या अनेक सण-उत्सवांत बैलांसाठी सुद्धा एक सण आहे. त्या सणाचे नाव आहे बैलपोळा.
श्रावणातल्या अमावास्येला बैलपोळा असतो. सांगली-सातारा या भागात आषाढात बैल पोळा असतो. त्याला बेंदूर असेही म्हणतात. काही भागात भाद्रपद अमावास्येलाही हा पोळा साजरा करतात. शेतीची कष्टाची मुख्य कामे संपली की पोळा सण साजरा करतात. हा सण मुख्यतः खेड्यात शेतकरी कुटुंबात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. त्या दिवशी बैल हा शेतकऱ्याचा देव असतो. मुख्य सणाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी शेतातून बैल घरी आले की या सणाला सुरुवात होते. संध्याकाळी शेतकरी व त्याची पत्नी स्वच्छ स्नान करतात.
मग ते पूजेचे साहित्य घेऊन गोठ्यात जातात. प्रथम बैलाच्या नाकातील वेसण काढून टाकली जाते. त्याला कसलाही त्रास होणार नाही अशा दाव्याने बांधतात. मग तेलात हळदीची पूड कालवून ती बैलाच्या खांद्याला लावून हलक्या हाताने त्याचा खांदा चोळतात. वर्षभर अनेक प्रकारची शेतीची कष्टाची कामे केल्याने बैलाच्या खांद्याला खूप त्रास झालेला असतो. खांदा दुखावलेला असतो. त्याला थोडा आराम मिळावा म्हणून शेतकरी पति-पत्नी अत्यंत प्रेमाने, हलक्या हातांनी बैलाचा खांदा चोळतात व गरम पाण्याने तो शेकतात. मग शेतकऱ्याची पत्नी बैलाच्या पुढच्या पायांवर गरम पाणी घालून त्याची पूजा करते.
मग बाजरी भरडून त्याचा शिजवून तयार केलेला गोडगोड खिचडा ( सांजा ) बैलाला खायला देतात. त्याला भरपूर ओली वैरण खाऊ घालतात. मग शेतकरी व त्याची पत्नी हात जोडून बैलाला प्रार्थना करतातः ‘हे अतिथिदेवा, उद्या तुमचा सण आहे. तुमच्यासाठी पुरणपोळी करणार आहोत. म्हणून उद्या तुम्ही आमच्याकडे भोजनाला या. पोटभर पुरणपोळी खा. आम्हाला आशीर्वाद द्या.’ असा हा आदल्या दिवशीचा कार्यक्रम असतो. दुसऱ्या दिवशी म्हणजे मुख्य सणाच्या दिवशी सकाळी शेतकरी आपल्या बैलांना नदीवर नेऊन त्यांना स्वच्छ धुतात.
अगदी सुगंधी साबण लावून त्यांना स्नान घालतात. नदी नसेल तर घरीच बैलांना स्नान घालतात. काही हौशी शेतकरी गरम पाण्याने बैलांना धुत्त. मग ज्वारीच्या पिठाची किंवा नाचणीची आंबोण बैलांना पाजतात. या दिवशी बैलांना रंगवतात. बैलांच्या शिंगांना तांबडा, निळा, पिवळा यापैकी आवडीचा पक्का रंग लावतात. त्यावर सोनेरी किंवा पांढरी बेगड चिकटवितात. शिंगांच्या टोकावर पिवळे लिंबू बसवतात. त्या दिवशी शेतकऱ्याची बायको खास बैलासाठी म्हणून पुरणाच्या पोळ्या करते. ती आपल्या हाताने बैलांना पुरणपोळ्या खाऊ घालते.
संध्याकाळी बैलांना सजविले-नटविले जाते. बैलांच्या गळ्यात फुलांचे हार घालतात. त्यांच्या अंगावर रेशमी झूल घालतात. मग गावातील सर्व बैल एखाद्या चौकात आणतात. मानाप्रमाणे व प्रथेप्रमाणे बैल एकामागे एक असे उभे करतात. मग बैलांची गावभर मिरवणूक निघते. पुढे वाजंत्री, बॅन्ड, ढोल वाजत असतात. लेझीम पथके लेझीम खेळत असतात.
मिरवणूक संपल्यावर शेतकरी आपल्या बैलांना घेऊन आपल्या दारात येतो. तेथे बैलांना ओवाळले जाते. मग बैल गोठ्यात जातात. असा हा बैलपोळ्याचा सण ग्रामीण भागात अतिशय उत्साहाने, थाटात साजरा केला जातो. या दिवशी घरोघरी मातीच्या बैलांची जोडी आणून त्यांची यथाविधी पूजा केली जाते. त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो. आपल्याला अन्न देणाऱ्या बैलांबद्दल कृतज्ञता, प्रेम, आदर दाखविण्यासाठी हा बैलपोळा सण केला जातो.
काय शिकलात?
आज आपण बैलपोळा माहिती, इतिहास मराठी । Bail Pola Information in Marathi पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.