भगवान शंकराने पार्वतीस ज्या माहात्म्याबद्दल सांगितले होते, तेच माहात्म्य अरुंधतीने विचारल्यानंतर वशिष्ठ ऋषीने ध्यान करुन सांगावयास सुरुवात केली. म्हणाले, ‘प्रिये, या कलियुगात जो बद्रीनाथाची भक्ती करेल, तोच मनुष्य धन्य आहे. कारण सर्व तीर्थात बद्रीनाथ हे सर्वश्रेष्ठ तीर्थ आहे. या तीर्थाने धर्म, काम, अर्थ आणि मोक्ष या सर्वांची प्राप्ती होते. जो मनुष्य बद्रीनाथाला जातो त्याच्या पुण्याची गणना करण्याचे सामर्थ्य कोणातही नाही.’
भारताच्या चारधामांपैकी हिमालयातील एक प्रसिद्ध पुण्यक्षेत्र. या क्षेत्राला सुद्धा आख्यायिका आहे. तप करणाऱ्या ऋषीमुनींना राक्षस त्रास देऊ लागले. तेव्हा भगवंतांनी अभय दिले व नरास म्हणाले, ‘तू राक्षसांशी युद्ध कर आणि त्यांच्या नाशार्थ मी तपश्चर्या करतो.’ त्याप्रमाणे अनेक वर्षे युद्ध करुन नराने राक्षसांचा नाश केला.
तपश्चर्या करणाऱ्या भगवंतांना ऊन लागू नये म्हणून लक्ष्मी मातोश्रींनी त्यांच्या डोक्यावर बद्री म्हणजे बोरीचे रुप घेऊन सावली दिली म्हणून हे क्षेत्र ‘बद्रीनारायण’ या नावाने प्रसिद्ध झाले. बद्रीनाथाचे मंदिर अलकनंदेच्या काठी उंचावर असून हे मंदिर फार प्राचीन आहे. हे मंदिर समुद्रसपाटीपासून १०,००० फूट उंचावर आहे.
रस्त्यापासून ८ ते ९ फूट उंचीवर असून तेथे जाण्यासाठी प्रशस्त पायऱ्या आहेत. त्याच्यापुढे महाद्वार लागते. त्याच्या आतल्या अंगास दोन्ही अंगी देवळ्या आहेत. त्यांच्या खाली तळघरात देवाचे कोठार आहे. माडीवरची जागी मुक्तद्वार आहे. तेथून पुढे थोडी मोकळी जागा सोडून बद्रीनाथाचे मंदिर आहे त्यात तीन भाग आहेत.
गाभाऱ्यात कंबरभर उंचीच्या सिंहासनावर शाळिग्राम शिळेची नारायण मूर्ती आहे. त्यालाच बद्रीनारायण म्हणतात. मूर्ती पद्मासनावर ध्यानमुद्रेत विराजित आहे. ती चर्तुभूज असून उंचीला २ ते ३ फूट आहे. तिच्या चार हातापैकी दोन हात जोडलेले तसेच दोहोत शंखचक्र आहे. नारायणाला नेहमी सुवर्णाचा मुखवटा चढविलेला असतो. डोक्यावरचा मुकुटही सुवर्णाचा असून तो हिरेजडित आहे.
डाव्या हाताला लक्ष्मी चवरी ढाळीत असून तिच्या पलीकडे नरनारायणांच्या शंख-चक्र-गदाधारी मूर्ती आहेत. उजव्या अंगाला कुबेर व गणपती आहे. या मूर्तीच्या खालील पायरीवर उजव्या बाजूला गरुड, डाव्या बाजूला नारद व मध्ये उद्धव आहे. नारायणाच्या पलीकडे अक्षय्य नंदादीप आहे. उद्धवाजवळ चरणपादुका असून डावीकडे नरनारायणाची मूर्ती आहे. जवळ श्रीदेवी व भूदेवी आहेत.
सकाळी सहा वाजता मंदिर दर्शनाला खुले होते. महाभिषेक असतो. त्यानंतर खीर अर्पण केली जाते. भागवत पाठ तसेच गीतापाठ असतो. दररोज दोन-तीन मणाचा भात शिजतो. आमटीही असते. तिसऱ्या प्रहरी भाताचा नैवेद्य दाखवला जातो. त्याला राजभोग म्हणतात. प्रसाद म्हणून यात्रेकरूंना दिला जातो. श्राद्धाकरता लागणारे पिंडही त्याच भाताचे तयार मिळतात.
रात्री शयन आरती होऊन मंदिर बंद होते. या क्षेत्रात पाच तीर्थे असून यात्रेकरूंना त्यात स्नान करावे लागते. त्या तीर्थाची नांवे – ऋषिगंगा, कूर्मधारा, प्रल्हादधारा, तप्तकुंड व नारदकुंड. तप्तकुंडातील पाणी नेहमी गरम असते. नर-नारायणाचे सनक-सनंदनाचे व अनेक योगी ऋषीमुनींचे तपश्चर्यास्थान म्हणजे बद्रीनाथ.