Site icon My Marathi Status

अशी होती करडी शिस्त

शिवाजी महाराज न्यायनिष्ठुर होते. प्रत्येक बाबतीत त्यांची करडी शिस्त होती. स्वकीय किंवा परकीय, कोणावरही अन्याय झालेला त्यांना सहन होत नसे. प्रत्येक स्त्रीला ते मातेसमान मानीत असत. स्वराज्यातील कोणत्याही स्त्रीची विटंबना झालेली त्यांना जराही खपत नसे. एकदा काय झाले? महाराजांच्या सैन्याचा मुक्काम संपगावाजवळ पडला होता. खासेखासे मंडळी पुढच्या योजनेची चर्चा करीत होती. कर्नाटकात प्रवेश केल्यापासून मराठ्यांना सर्वत्र विजय मिळत होता; त्यामुळे लष्करात मोठे उत्साहाचे, आनंदाचे वातावरण होते.

एके दिवशी सखूजीराव गायकवाड दौडत दौडत छावणीपाशी आले. त्यांना महाराजांना काहीतरी महत्त्वाची बातमी द्यावयाची होती. सखूजीरावांनी छावणीत जाऊन महाराजांना मुजरा केला. “काही खास खबर?” महाराजांनी विचारले. “महाराज, काल एक मोठी गंभीर गोष्ट घडली आहे.” सखुजीराव म्हणाले. मम “काय झाले?” महाराजांनी विचारले. “काल संध्याकाळी आघाडीवरचे सामान बैलांवरून हलविले जात होते. बेलवाडीच्या बाजूने बैल जात असता तेथील गढीतील पाटलाने बैल अडविले. नुसते अडविले नाही, तर त्याने सगळे बैल मालासकट हाकून आपल्या गढीत नेले.

आपले सैनिक पाठलाग करू लागले. इतक्यात त्याने गढीचे दरवाजे बंद केले व आतून आपल्या लोकांवर हल्ला केला.” सखूजीरावांनी सांगितले. “त्या पाटलाची गढी केवढी आहे?” महाराजांनी विचारले. सखुजीराव म्हणाले. “गढी अगदी लहानच आहे. मातीच्या भिंती आणि बुरुज! एक दिवससुद्धा लागणार नाही ती गढी घ्यायला!” “मग वेळ का घालविता? काम फत्ते करून आगेकूच करा!” महाराजांनी अशी आज्ञा करताच सखूजीराव मुजरा करून बाहेर पडले व ताबडतोब आघाडीवर रवाना झाले.

मध्ये फार वेळ न दवडता ते बेलवाडीच्या गढीजवळ आले. गढीभोवती मोर्चेबंदी करून त्यांनी गढीतील पाटलाला निरोप पाठविला. ‘आमचे बैल सामानासह ताबडतोब परत करा व झाल्या प्रकाराबद्दल क्षमा मागा. नाहीतर गढी जमीनदोस्त करू. आम्हांला येथे एक दिवसही थांबावयास वेळ नाही.’ पाटलाने बैल तर परत केले नाहीच. उलट निरोप पाठविला. ‘बैल मिळणार नाहीत. हिंमत असेल तर ते सोडवून न्या.’ पाटलाचा हा उर्मट निरोप मिळताच गायकवाडांनी गढीवर सर्व बाजूंनी हल्ला चढविला. एक , दिवसातच गढी खलास करू असा सखूजींचा अंदाज होता, पण तो साफ चुकला.

गढीतील कर्नाटकी प्यादी जोरात झुंज देत होती. जोरात खणाखणी सुरू झाली. गढीच्या तटावरून बंदुका झडू लागल्या. सखूजींनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, पण गढीत प्रवेश करणे जमत नव्हते. सखूजी भयंकर चिडले… पेटून उठले… त्यांनी गढीच्या दरवाजावर जोरात धडक दिली… या हल्ल्याचा जोर सहन न झाल्याने पाटलाची फौज मागे.

सरू लागली, म्हणून पाटील स्वत:च गढीबाहेर पडला, पण त्याचा अंदाज चुकला… सखूजींच्या फौजेपुढे त्याचा निभाव लागला नाही. त्या युद्धात पाटील ठार झाला! पाटलाचे लोक पाटलाचे प्रेत घेऊन गढीत परत गेले. गढीचा दरवाजा बंद झाला. बेलवाडीचा पाटील ठार झाला, पण त्याची बायको पार्वतीबाई हिने मोठ्या हिमतीने लढा चालूच ठेवला. तिच्या हाताखालच्या सैनिकांनी तिला चांगलीच साथ दिली होती; त्यामुळे सखूजीराव गायकवाडांचेही काही चालेना.

सखूजी अगदी इरेला पेटले… त्यांनी गढीच्या दरवाजावर जोरदार हल्ला केला… गढीचा दरवाजा ढासळला… सखूजींनी आपल्या सैन्यासह गढीत प्रवेश केला… जोरदार चकमक उडाली… सखूजींनी पार्वतीबाईंना पकडून शिवाजी महाराजांपुढे हजर करण्यासाठी त्यांची शोधाशोध केली, पण त्या हाती लागल्या नाही. पार्वतीबाई तटावरून घोडा उडवून पसार झाल्या. सखूजीराव गायकवाडांनी त्यांचा पाठलाग केला.

तीन दिवस बाई अन्नपाण्याशिवाय पळत होती. तिचा पाठलाग करणाऱ्या अनेक शिपायांचा तिने बळी घेतला होता. अखेर नाइलाज झाल्याने तिने हत्यार खाली ठेवले. सखूजीराव गायकवाडांनी पार्वतीबाईना जेरबंद केले व त्यांना घेऊन महाराजांच्या तळावर आले. सखूजींनी तंबूत जाऊन महाराजांना मुजरा केला. सखूजी महाराजांना म्हणाले, “तीन दिवस पाठलाग करून बाईंना पकडले. त्यांनी आपल्या पंधरा वीस जवानांचे प्राण घेतले. त्यांना धरून आणले आहे. आपल्यासमोर हजर करण्याची परवानगी मिळावी.”

महाराजांनी परवानगी दिली असता सखूजी बाहेर गेले व दोरखंडाने जेरबंद केलेल्या बाईंना तंबूत घेऊन आले. त्या बेलवाडीच्या पार्वतीबाई होत्या. त्यांना जेरबंद करून आणलेले पाहून महाराज संतापले. ते सखूजींवर कडाडले, “यांना दोरखंडाने बांधून आणण्याची गरज काय? स्त्रियांशी असे वागणे ही आपली संस्कृती नाही. स्त्रियांचा असा अपमान आपण करत असू, तर आपल्यात व इतरांच्यात काय फरक ? त्यांना अगोदर मोकळे करा.” शिवाजी महाराजांनी असे सुनावले असता पार्वतीबाईंना मोकळे करण्यात आले. त्या खाली मान घालून उभ्या होत्या.

महाराज त्यांना म्हणाले, “बाई, तुम्हाला त्रास देण्याची मुळीच इच्छा नव्हती. आमचे बैल तुम्ही पळविलेत; म्हणून पुढचे सगळे रामायण घडले. तुम्ही आमचे बैल सोडून दिले असते, तर पुढचे काहीच घडले नसते. आमच्या माणसांकडून तुमचा जो अपमान झाला, त्याबद्दल क्षमा करा.” पार्वतीबाई म्हणाल्या, “महाराज, या अपमानापेक्षा तुमच्या माणसांनी माझ्याशी फार असभ्य वर्तन केले. त्यांनी माझी अब्रू घेण्याचा प्रयत्न केला. हे दुःख मी कोणाला सांगणार? शिवाजी महाराजांचे राज्य न्यायनीतीचे आहे. या राज्यात स्त्रियांना सन्मानाने वागविले जाते असे म्हणतात, हाच का तो सन्मान?” पार्वतीबाईंचे हे बोलणे ऐकताच महाराज अतिशय संतापले. त्यांनी झाल्या गोष्टीची नीट चौकशी केली.

सखूजींनी पार्वतीबाईंशी असभ्य वर्तन केल्याचे सिद्ध झाले. महाराजांच्या राज्यात अपराध्याला क्षमा नाही. त्यांनी आपल्या सेवकांना आज्ञा केली, “या सखूजीचे डोळे काढा व त्याचे हात तोडा. त्याला पन्हाळ्याच्या तुरुंगात टाका.’ शिक्षेची अमंलबजावणी ताबडतोब झाली. शिवाजी महाराजांनी पार्वतीबाईंच्या शौर्याची, धाडसाची प्रशंसा करून त्यांचा गौरव केला व बेलवाडीची गढी पार्वतीबाईंना परत केली. अशी होती शिवरायांची करडी शिस्त! त्यांच्याकडे शौर्याची कदर होती, पण गैरवर्तनाला कठोर शिक्षाही होती.

Exit mobile version