गुजरात व राजस्थान या दोन्ही प्रांतातील लोकांचे श्रद्धास्थान असलेले अंबाजी मंदिर पालनपूरपासून ६० कि.मी. वर आहे. अंबाजी मंदिर ज्या पहाडावर स्थित आहे. त्या पहाडाचे नांव आरासूर पर्वत असून आरासूरपर्यंतचा २५ कि.मी. रस्ता घनदाट जंगलातून जातो. आंबा मातेचे दुमजली अतिभव्य मंदिर आहे. मंदिर उंचीला कमी असून पुढे मंडप मात्र मोठा आहे. तेथे चांदीचे व पितळेचे सिंह उभे आहेत. गर्भगृहात अंबाजीची मूर्ती नाही.
परंतु तेथील कोनाड्यात वस्त्रालंकार व मुखवटा अशा त-हेने रचतात की, माताजीने वाघावर स्वारी केली आहे. या देवीला ‘घोळा गढवाळी’ असेही म्हणतात. मंदिर संगमरवरी दगडाचे असून अनेक धर्मशाळा आहेत. मंदिराच्यासमोर चौक आहे. त्याठिकाणी होमहवन होते. अंबाजीच्या यात्रेत तेल वापरत नाही. केसांना सुद्धा तेल न लावता तूप लावतात. यात्रेत स्त्री-पुरुषांची थट्टा मस्करी चालत नाही.
नियम मोडला तर माताजीचा कोप होतो अशी समजूत आहे. यात्रेत भवाई नृत्य होते. दर पौर्णिमेला यात्रा भरते. या देवीवर सर्वांची श्रद्धा असून कामना पूर्तीसाठी नवस बोलतात. कुंकवाची उधळण असते. सकाळी दर्शनाची वेळ ८ ते १२ अशी आहे. भाविकांनी लावलेल्या अनेक घंटा पाहावयास मिळतात. देवीला तीन प्रकारचे पोशाख असतात. चैत्र, भाद्रपद, आश्विन, कार्तिक महिन्यात जत्रा विशेष महत्त्वाची असते.
नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. अंबाजीविषयी कथा आहे. तेव्हा हा परिसर जंगलानी व्यापला होता. छोट्यामोठ्या डोंगरकपारी होत्या. येथे अंबामाता खेळत असे. तिने बरोबर चरावयास आणलेली गाय रानात चरत असे. एक गुराखी पण गाई चरायला येथे आणीत होता. एके दिवशी गुराखीला संशय आला की यातील एक गाय आपली नाही.
मग ही गाय कोणाची असावी असा विचार करत असताना त्याला वाटले की, डोंगरावरील गुहेत झोके घेणाऱ्या स्त्रीचा असावी म्हणून तो डोंगर चढून गुहेत विचारायला गेला. स्त्री झोपाळ्यावर बसून झोके घेत होती. गुराखीने तिची गाय चारण्याची मजुरी मागितली. तिने तात्काळ सूपभर जोंधळे दिले. ते गुराख्याने फडक्यात बांधून घेतले. घरी जाताना त्याला काय वाटले, त्याने जोंधळे वाटेत फेकून दिले.
घरी आल्यावर या गुराख्याने घडलेली घटना बायकोला सांगितली आणि वाटेत जोंधळे कसे झटकून टाकले हे दाखवू लागला. त्यावेळी त्याची बायको डोळे विस्फारुन पाहात राहिली. फडक्याला चिकटलेल्या चार दाण्याचे लखलखीत मोती झाले होते. तिने ते पटकन् काढून घेतले व नवऱ्याला पुन्हा जोंधळे मागायला गुहेतल्या बाईकडे पाठवले. पडत्या फळाची आज्ञा समजून गुराखी पळत पळत गुहेपाशी आला.
तेथे जाऊन पाहातो तो गुहेपुढे कातळाची शिळा पडून दार बंद झालेले होते. तेथे कोणीच नव्हते. गुराखी मनात म्हणाला, ‘मला देवीनेच दर्शन दिले. पण मी यत्किंचितही गाय चरण्याचे पैसे मागून तिची अवहेलना केली.’ त्याचा पश्चात्ताप त्याला झाला. तेव्हापासून गुहेत देवीचा झोपाळा बांधून तिची पूजा अर्चा केली जाते. अंबामातेचे हे स्थान अलौकिक समजले जाते. दुसरी कथा अशी आहे. एकदा प्रजापती दक्ष राजाने महायज्ञ आरंभला.
सर्व राजे महाराजे देवगण यांना निमंत्रित केले.पण मागील काही घटनांमुळे दक्ष राजाने आपली मुलगी सती व तिचा पती भोलानाथ शंकर यांना निमंत्रण केले नाही. तरी सती घरचे शुभकार्य म्हणून गेली. परंतु दक्ष राजाने सतीची उपेक्षा केली. ती सतीला झोंबली. हा राग तिला अनावर झाला म्हणून तिने यज्ञातच उडी घेतली. सर्वत्र हाहा:कार माजला. भोलानाथ शंकराने ते अंर्तज्ञानाने जाणले व रागाने यज्ञस्थळी हजर झाला.
महायज्ञातील सतीचे जळके शरीर हाती घेऊन तो तांडवनृत्य करु लागला. उपस्थित देवदेवता या तांडवाने गर्भगळीत झाल्या. आता आपले खरे नाही, या भयाने ते विष्णूला शरण गेले. तांडवनृत्याने होणारा महासंकटकारी प्रलय टाळण्यासाठी विष्णूने आपले सुदर्शनचक्र सोडले व सतीच्या देहाचे तुकडे तुकडे केले. पृथ्वीवर ते तुकडे जिथे जिथे पडले ती शक्तीपीठ बनली. येथील पर्वतावर तर सतीदेवीचे हृदय पडले, म्हणून अंबाजीने हे स्थान महत्त्वाचे आद्यपीठ बनले. असा हा मंदिरा मागील इतिहास आहे.