Site icon My Marathi Status

अखेर सेनापती स्वराज्यात परत आला!

जयपूरचा राजा जयसिंग हा मोंगलांचा सेनापती होता, पण औरंगजेबाचा त्याच्यावर विश्वास नव्हता; म्हणून त्याला दक्षिणेत पाठविताना त्याच्या बरोबर कडवा पठाण सरदार दिलेरखान यालाही पाठविले. औरंगजेबाची प्रचंड फौज घेऊन दोघेही दक्षिणेच्या मोहिमेवर गेले. परंदरवर तोफांचा भडीमार झाला. शिवरायांच्या सैन्याची फार मोठी हानी झाली. मुरारबाजीसारखा शूर सरदार या युद्धात कामी आला. शिवरायांचे वकील रघुनाथ पंडित जयसिंगाशी बोलणी करावयास गेले, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. जयसिंग पुरंदरचा वेढा उठविण्याचे नाव काढीना.

शिवरायांच्या सेनेचा सर्वनाश होण्याची वेळ आली. शेवटी नाइलाजाने शिवरायांनी जयसिंगाची भेट घेतली. दोघांचे बोलणे झाले. त्यानुसार.. शिवरायांनी आपले तेवीस किल्ले बादशहाच्या ताब्यात द्यावेत. फक्त तेरा किल्ले स्वत:कडे ठेवावेत व इतःपर बादशहाची चाकरी इमानेइतबारे करावी. विजापूरवर स्वारी करण्यासाठी मदत करावी अशीही अट होती. या अटीनुसार शिवराय व त्यांचा अत्यंत पराक्रमी सेनापती नेताजी पालकर आदिलशाहीच्या मुलखात धुमाकूळ घालू लागले. त्यांनी आदिलशाहीची अनेक गावे बेचिराख केली. दोघेही पन्हाळ्याच्या किल्लेदाराला फसवायला गेले, पण जमले नाही.

समोरासमोर हल्ला केला, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. याच दरम्यान शिवरायांचे व नेताजीचे काही कारणाने बिनसले. शिवराय रागावले. नेताजी रुसला व आदिलशाहीत गेला. नेताजीचे शौर्य, धैर्य विजापूरकरांना माहीत होते. त्याला विजापूरकरांनी जहागिरी दिली. आता नेताजी आदिलशाहीच्या बाजूने मोंगलांच्या मुलखाला त्रास देऊ लागला. जयसिंगाला हे सहन झाले नाही. त्याने नेताजीला पकडले व त्याचा पराक्रम लक्षात घेऊन त्याला मनसबदारी दिली. आता नेताजी पुन्हा आदिलशाहीतून मोंगलशाहीत आला.

मनसबदार झाला. अत्यंत पराक्रमी आणि शिवरायांच्या अगदी जवळचा नेताजी मोंगलांचा मनसबदार झाला असला, तरी महाधूर्त औरंगजेब काही फारसा खूश झाला नाही, कारण त्याचा कोणत्याच मराठ्यावर विश्वास नव्हता. याच मराठ्यांनी व शिवाजीने यापूर्वी शाइस्तेखान, दिलेरखान, जसवंतसिंह, दाऊदखान, महाबतखान या सर्वांना हातोहात चकविले होते. जयसिंगाने शिवाजीला आग्ऱ्याला पाठविले, पण त्याही वेळी शिवाजीने औरंगजेबाला बेमालूमपणे फसविले होते. तेव्हा अगदी प्रती शिवाजीच असलेला नेताजी पालकर आपला मनसबदार असला, तरी शेवटी तो एक हिंदू आहे, मराठा आहे; म्हणून त्याला हिंदू म्हणून राहू देणे धोक्याचे आहे.

त्याला मुसलमानच केले पाहिजे व दूरच्या मोहिमेवर पाठवावयास हवे असा विचार करून, औरंगजेबाने तू धर्मांतर केलेस तरच वाचशील.’ असा फास घालून त्याला बाटविले; त्याला मुसलमान केले. आता नेताजी पालकर हा ‘महंमद कुलीखान’ झाला. नेताजीला महाराष्ट्रात परत यायचे होते, पण औरंगजेबाने त्याला मोठ्या धूर्तपणे काबूलकडे पाठविले. महाराष्ट्रात जाण्याचे त्याचे स्वप्न हे स्वप्नच ठरले.

होता होता नऊ वर्षे उलटली. आता आपण कसले महाराष्ट्रात जातो? ज्याने नऊ वर्षे मुसलमानांची चाकरी केली, भाकरी खाल्ली त्याला आता महाराष्ट्रात कोण जवळ करणार? कोण आपला म्हणणार? आपण मुसलमान झालो; म्हणून लोक आपल्याला परका समजतील, बाटगा म्हणतील, आपला उपहास करतील हीच भीती नेताजीला सतावीत होती. अशीच नऊ वर्षे गेली आणि एके दिवशी औरंगजेबाने त्याला हकूम केला. ‘दख्खनवर जा’ कारण शिवरायांना दमवील, नमवील असा फक्त एकच एक म्हणजे ‘महंमद कुलीखान’ (नेताजी पालकर). अशी औरंगजेबाची खातरी होती.

अत्यंत प्रखर पराक्रमी सरदार म्हणून औरंगजेबाला नेताजीचा अनुभव आला होता. शिवाय आता तो मराठी नव्हता, हिंदू नव्हता; तो मुसलमान झाला होता. उत्तरेतून दक्षिणेकडे म्हणजे दिल्लीहून महाराष्ट्रात येण्यासाठी नेताजी रात्रंदिन मनातून तळमळत होता, पण हे औरंगजेबाला कळणे शक्यच नाही. त्याने नेताजीचे शरीर बाटविले होते. त्याला मुसलमान केले होते, पण त्याचे मन?… ते तसेच पवित्र होते. हिंदू होते.

‘दख्खनवर जा.’ असा औरंगजेबाने हकूम करताच नेताजीच्या सगळ्या रम्य स्मृती जाग्या झाल्या. ते डोंगर, गडकिल्ले, नद्या, मंदिरे आणि प्रत्यक्ष आपले महाराज, आईसाहेब अशा सगळ्या सगळ्यांच्या गोड आठवणी त्यांच्या मनात उचंबळून आल्या…” ….आणि मग तो पन्हाळा, महाराजांचा राग, आपण बादशहाची स्वीकारलेली चाकरी, तो विश्वासघात, धर्मांतर, काबूल-कंदाहार आणि आता पुन्हा महाराष्ट्रावर नेमणूक, प्रत्यक्ष महाराजांशी लढायचे? या विचारांनी नेताजी मनातून घायाळ झाला. डोके गरगरू लागले; पण आता इलाज नाही. दक्षिणेत गेलेच पाहिजे.

बादशहाचा हकूम आहे तसा. आणि नेताजी, नव्हे महंमद कुलीखान दख्खनकडे निघाला. नऊ वर्षानंतर पुन्हा त्याच्या घोड्यांच्या टापा महाराष्ट्राकडे पडू लागल्या. त्याच्याबरोबर दिलेरखान होता. मोंगली सेना दख्खनकडे दौडत निघाली, पण त्याआधीच नेताजीचे मन शिवरायांपाशी जाऊन पोहोचले. त्याला आता शिवरायाखेरीज दुसरे काही सुचेना! काही दिसेना! एका मुक्कामातून तो सर्वांचा डोळा चुकवून गुपचूप निसटला आणि त्याने रायगड गाठला.

एके काळचा स्वराज्याचा महासेनापती अगदी विचित्र अवस्थेत रायगडावर आला व शिवरायांच्या पायावर डोके ठेवून रडू लागला. शिवरायांनी त्याला ‘आपला’ म्हणून प्रेमाने गाढ आलिंगन दिले. महाराजांनी झाले गेले गंगेला मिळाले असे समजून त्याचे विधिवत शुद्धीकरण केले. देव-ब्राह्मणांच्या आशीर्वादाने त्याला पुन्हा हिंदू केले. कुलीखानाचा पुन्हा नेताजी पालकर झाला! मराठ्यांचा सेनापती पुन्हा स्वराज्यात परत आला! रायगडावर आनंदी आनंद झाला.

Exit mobile version