एक पुण्य यात्रा गंगोत्री यमुनोत्री यात्रा
हिमालयातील चार धाम यात्रेतील सर्वात अवघड तीर्थक्षेत्र, उत्तरकाशी व गंगोत्री येथून निघाल्यानंतर मेनरी, भटवाडी, गंगनावी, हरासल इत्यादी स्थानांना पार करीत लंका नावाच्या स्थानावर येता येते. तेथून फक्त १२ कि.मी. अंतरावर गंगोत्री स्थान आहे. अशा या गंगोत्रीची उंची ३१४० मी. आहे. पहिल्या शतकाच्या प्रारंभी सरदार अमरसिंग थापा यांनी हे मंदिर बांधले. त्याचा जिर्णोद्धार जयपूर दरबारने केला. हिच्या पायथ्याला भगिरथ शिला असून त्याच शिलेवर तपश्चर्या करुन भगिरथाने गंगेला पृथ्वीवर अवतारीत केली होती.
गंगोत्रीपासून अठरा कि.मी. अंतरावर भगिरथी नदीचा उगम गोमुखातून झाला. या स्थानापर्यंत पोहोचण्यासाठी पादचारी मार्ग तयार करण्यात आला आहे. येथील गंगेला भागिरथी म्हटले आहे ते हे स्थान भगिरथाच्या तपश्चर्येचेच असल्यामुळे देवप्रयागापर्यंत गंगानदी भागिरथी म्हणून ओळखली जाते. येथून सुमारे १ कि.मी. अंतरावर पाषाण फोडून भागिरथीचा प्रवाह २५ हात उंचीवरुन खाली पडतो.
या प्रपातस्थानाला गौरीकुंड’ म्हणतात. त्याच्या मध्यभागी शिवलिंग असून सदर प्रपात नेमका त्याच्या मस्तकावर पडतो. भागिरथीच्या पलीकडे अनेक आश्रम व धर्मशाळा आहेत. देवघाटावरुन भागिरथी व केदारगंगा यांचा सुंदर संगम दिसतो. भगिरथशिलेच्या पलीकडे रुद्रशिला असून याच शिळेवर उभे राहून शिवाने गंगाप्रवाह आपल्या मस्तकी धारण केला.
भगवान शंकर पार्वतीला म्हणतात, ‘कलियुगात जे लोक गंगेला स्नान करुन दर्शन किंवा आचमन करतील त्यांची सर्व पापे नष्ट होऊन त्यांना वैकुंठाची प्राप्ती होईल.’ पतितोद्धारक गंगाजीच्या केवळ पाण्याचे दर्शन घेणाऱ्या प्राण्यांना सुद्धा पाप नष्ट होऊन त्यांना वैकुंठाची प्राप्ती होईल. गंगोत्रीला सहा महिने यात्रा चालते. कार्तिकात तिथे बर्फ पडू लागतो म्हणून कार्तिक पौर्णिमेला गंगाद्वार बंद होते.
मग तेथील पंडे गंगेची मूर्ती घेऊन खाली असलेल्या मार्कंडेय क्षेत्रात येतात. तेथे सहा महिने गंगेची पूजा-अर्चा चालते. अक्षय्य तृतीयेला पुनश्च ती मूर्ती गंगोत्रीला नेऊन गंगाद्वार उघडतात. यमुनोत्री- उत्तरांचल राज्यातील उत्तरकाशीमधील एक पुण्यक्षेत्र हिमालयात वसलेले आहे. यमुना नदीचा उगम येथून झाला म्हणून त्याला यमुनोत्री किंवा यमुनोत्तरी असे नांव पडले.
हे क्षेत्र उत्तरकाशीपासून ७४ कि.मी. वर बंदरपूछ नावाच्या पर्वतश्रेणीत आहेत. यमुनोत्रीची उंची १०,८०० फूट उंचीवर आहे. यमुनोत्री ते गंगोत्री २८ कि.मी. अंतर आहे. तिचे स्थान माहात्म्य खालीलप्रमाणे आहे. स्कंदजी नारदांना म्हणाले, ‘नारदा, यमुना नदीत केवळ स्नान केल्यानेसुद्धा माणसाला यमलोकाचे दर्शन होत नाही आणि जो मनुष्य या स्थानात वास्तव्यास असतो त्याच्या सर्व पापांचे क्षालन होते.’ तसेच येथे अग्निदेवाने सुरुवातीला प्रखर तपश्चर्या केली म्हणून त्याला दिग्पालाचे पद प्राप्त झाले. आणि तेच स्थान लुप्तकुंड म्हणून लौकिकास प्राप्त झाले. त्याला गोरख डिबिया नावानेही संबोधले जाते.
याच कुंडाजवळ सिद्ध नावाचे एक कुंड आहे. येथे यमाने तपश्चर्या करुन लोकपाल पदाची प्राप्ती केली होती. जो मनुष्य यमुना जलात स्नान करतो त्याच्या कोटी कोटी पापाचा नाश होतो. यमुनेचे थेंबभर पाणी पिणारासुद्धा पापमुक्त होतो आणि त्याच्या सात पिढ्या पवित्र होतात. यमुनोत्रीचा प्रवास गंगोत्रीपेक्षा कठीण आहे. असितमुंज या ऋषीचे यमुनोत्रीत वास्तव्य होते.
यमुनेच्या उगमाजवळ काही फूटावर एक धर्मशाळा असून त्याच्या वरच्या अंगाला ‘यमुनामंदिर’ आहे. ते लाकडी असून लहान आहे. त्या मंदिरात यमुनेच्या कृष्णपाषाणाच्या मूर्तीबरोबर गंगेचीही दगडी मूर्ती आहे. येथे अक्षय्यतृतीयेपासून आश्विन पौर्णिमेपर्यंत या मूर्तीची पूजा-अर्चा होते. बाकीच्या महिन्यांत हा भाग बर्फाच्छादित असतो. त्यावेळी या मूर्ती तेथून हालवून घाटाखालच्या खरसाळी गावात नेतात. तेथे पूजा-अर्चा केली जाते.