देवगिरी तुंगार पर्वतावर असलेले श्री तुंगारेश्वर मंदिर

पश्चिम रेल्वेच्या वसईरोड स्थानकाच्या पूर्वेला सहा कि. मी. अंतरावर राष्ट्रीय महामार्ग क्र. आठ वर सातिवली गावच्या पूर्वेला तुंगार पर्वताचे उंच शिखर दृष्टीला पडते. या राष्ट्रीय महामार्गापासून पूर्वेला अरण्याकडे जाणारा एक रस्ता आहे. तेथे तुंगारेश्वर महादेव मंदिराकडे जाण्याचा मार्ग’ असा बोर्ड आहे. या महामार्गापासून ४ कि. मी. अंतरावर शंभू महादेवाचे मंदिर आहे. हेच तुंगारेश्वर देवस्थान.

देवळाकडे जाताना वाटेत चार ओहोळ लागतात. पावसाळ्यात हे ओहोळ दुथडी भरुन वाहात असतात. मंदिराकडे जाताना चढ आहे. त्यामुळे थोडी दमछाक होते. रस्त्याच्या दुतर्फा आजूबाजूला खूप झाडी आहेत. ही झाडी निसर्ग सौंदर्यात भर घालतात. येथील ८४ चौरस कि. मी. चा परिसर अभयारण्य म्हणन घोषित करण्यात आला आहे. तुंग म्हणजे अति उंच आणि अर म्हणजे अरण्य जे अरण्य अति उंच आहे ते तुंगार.

या तुंगारचा उल्लख महद्र अथवा मंदाग्नी पर्वत असादेखील केला जातो. हे मंदिर अगदी सुशोभित व भव्य आहे. भव्य सभामंडप असलेल्या या मंदिरात प्रवेश केल्यानंतर गाभाऱ्यात दर्शनी सभा मंडपात श्री गजानन, श्रीविष्णू भगवान व नंदी या देवांच्या मूर्ती आहेत. गाभाऱ्यातील खोलगट भागात स्वयंभूमहादेवाची पिंड तर एका कोपऱ्यात पार्वतीची मूर्ती आहे.

मंदिराच्या मागील बाजूस भैरव मंदिर असून मंदिराच्या दर्शनी भागात एका बाजूस हनुमान मंदिर तसेच वर टेकडीवर श्री जागमाता मंदिर, दत्तमंदिर व आई खोडियार मंदिर व खालील भागात रामकुंड आहे. मंडपाच्या छतावर नागपाश मंत्र कोरलेला आहे. महाराष्ट्रात फक्त दोनच ठिकाणी असे नागपाश कोरलेले आहेत.

या मंदिरासंबंधी अशी आख्यायिका आहे की, खूप वर्षापूर्वी या तुंगार परिसरात विमलासुर नावाच्या राक्षसाचे राज्य होते. परंतु त्याने १२ वर्षे तपश्चर्या करुन भगवान शंकराला प्रसन्न करुन घेतले. तो शिवभक्त त्याच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन भगवान महादेव म्हणाले, ‘मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न झालो आहे, हवा तो वर माग.’ त्यावर विमलासर राक्षस म्हणाला, ‘मी आपल्या सहवासाला आसुसलेलो आहे.

म्हणून आपण या देवगिरीतंग पर्वतावर वास्तव्य करावे.’ भगवान शंकर ‘तथास्तु’ म्हणाले आणि त्यांनी दिव्य लिंग स्थापन करण्यासाठी दिले. भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे विमलासुराने दुसरा वर मागितला तो म्हणजे मी युद्धात सदैव अजिंक्य राहावे. देव, दानव, मानव व पशृंकडून मला मृत्यू येऊ नये. नंतर शंकरांनी वरदहस्त देऊन म्हटले की, तुझी मनोकामना पूर्ण होईल. तू ऋषी, तपस्वी, मुनीवरांना त्रास देऊ नकोस व परस्त्रीकडे वाईट भावनेने पाहू नकोस.

पुढे विमलासुराने भगवान शंकरांनी दिलेल्या शिवलिंगाची स्थापना देवगिरीतुंगार पर्वतावर केली हेच ते तुंगारेश्वर मंदिर. मंदिराजवळ दोन निसर्ग निर्मित कुंड आहेत. लोक त्यात आंघोळ करुन आनंद लुटतात. महाशिवरात्री व श्रावणमासी दर सोमवारी विशेषत: शेवटच्या सोमवारी भक्तगणांना सुग्रास भोजन (भंडारा) दिले जाते. नित्य आरती व नैवेद्य असतो. वैकुंठ चतुर्दशी व त्रिपुरारी पौर्णिमेस देवस्थान विश्वस्थ मंडळातर्फे खास अभिषेक केला जातो. सदर अभिषेकाच्यावेळी १००१ कमळांची फुले महादेवाला चढवली जातात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: