गोव्यातील श्री मंगेश देवस्थान

गोव्यातील शिवमंदिरापैकी अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेले हे मंदिर आहे. श्री मंगेश हा स्मार्त आणि वैष्णव अशा दोन्ही संप्रदायांचा कुलदेव, फोंडाच्या उत्तरेला साडेसात कि. मी. अंतरावर प्रियोळ गावी आहे. हे एक समृद्ध व भक्तजनांमुळे गजबजलेले असे जागृत देवस्थान समजले जाते. हे शिवमंदिर हिंदूंचे पवित्र असे श्रद्धास्थान आहे.

सुंदर सरोवर आणि चोहोबाजूला असलेल्या हिरव्यागार टेकड्यांनी या मंदिराच्या सौंदर्यात भर घातली आहे. हे मंदिर मुळात सालसीट जिल्ह्यात झुआरी नदीच्या दक्षिण तीरावर कटोलिम येथे होते. परकीय आक्रमणामुळे मंगेशी मंदिराचे स्थलांतर झालेले आहे. पोर्तुगिजांनी नाश करु नये म्हणून ही मूर्ती तेथून हलविण्यात आली आणि रातोरात प्रियोळ येथे आणून तेथे श्री मंगेशाची स्थापना करुन दैनंदिन पूजा-अर्चा, उत्सव चालू ठेवले.

पुढे पेशव्यांचा एक कारभारी रामचंद्रबाबा सुखटणकर यांच्या प्रयत्नाने मंदिरासाठी जमिनी मिळाल्या व देवालय उभे राहिले. मंगेशीचे मंदिर मुख्य रस्त्यापासून आत असून उंचावर आहे. मंदिर सुबक, सुंदर असून सभोवार गर्द झाडी आहेत. प्रवेशद्वाराशी हत्ती पाहावयास मिळतात. मंदिराचे बांधकाम पोर्तुगीज शैलीचे असून त्यावर इस्लामी शैलीचा प्रभाव जाणवतो. देवालयाची रचना, प्रारंभी सभामंडप नंतर थोड्या उंचावर प्राकार व त्याला लागून गाभारा अशी आहे.

चांदीचे प्रवेशद्वार असून गर्भगृहात तेलाचे दिवे अखंड तेवत असतात. चांदीच्या प्रवेशद्वाराशी दोन द्वारपालांच्या मूर्ती आहेत. गर्भगृहात लिंगमूर्ती असून सभामंडपाच्या टोकावरुनसुद्धा देवदर्शन घेता येते. शिवाचे दाढी असलेले एकमेव रुपयेथे पाहाण्यास मिळते. या मंदिराची एक आख्ययिका अशी आहे की, शिव हिमालयातून नाहिसे झाले, तेव्हा पार्वतीने उग्रतप केले.

तपामुळे शिव प्रसन्न होऊन पार्वतीसमोर व्याघ्ररुपात प्रकट झाले. तेव्हा पार्वतीने आकांताने त्राहि माम् गिरीश’ असा धावा केला. तेव्हा भगवान शंकर मूळ रुपात प्रकट झाले. ते येथे मंगेशाच्या रुपाने कायम राहिले. श्री मंगेश देवाच्या उजव्या बाजूस चौकावरच्या भिंतीत देव्हाऱ्यात श्री गणपतीची काळी दगडाची मूर्ती व डाव्या बाजूस श्री भगवतीची काळ्या पाषाणी दगडाची मूर्ती देव्हाऱ्यात आहे.

मंदिराच्या मागील बाजूस लक्ष्मीनारायण, सातेरी व बुळकेश्वर यांची लहान मंदिरे आहेत. श्री मंगेश मंदिरासमोर नगारखान्याची इमारत असून त्या इमारतीच्या तळमजल्यावर एक साजेशा लहान मंदिरात श्रीकाळभैरवाची काळ्या पाषाणाची मूर्ती श्री मंगेशदेवा सन्मुख उभी आहे. प्रांगणात सात मजली शुभ्र दगडाची दीपमाळ आहे. या परिसरात एक तळे असून दीपोत्सवाच्यावेळी केळीच्या पानावर पणती लावून ती तळ्यात सोडण्याची प्रथा आहे.

या तलावाच्या उजवीकडे उंचवट्यावर टुमदार देवालय असून त्या देवालयाच्या गर्भागारात वारुळाच्या रुपात श्री सातेरीदेवी, तिच्या उजवीकडे त्याच गर्भागारात श्री निरंकार लिंग रुपात आहेत. येथील दीपोत्सव पाहाण्यासारखा असतो. त्यावेळी मंदिर परिसरात शेकडो पणत्या लावल्या जातात आणि दीपमाळेतही ठेवल्या जातात. दर सोमवारी या देवळातून मंगेशाची पालखी निघते. असंख्य भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. महत्त्वाचे वार्षिक उत्सव पार पाडतात. या मंदिर परिसरात धर्मशाळा असून भक्तांच्या राहाण्याची सोय करण्यात येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: