शिवाजी महाराजांचे आग्ऱ्यास प्रस्थान

दख्खनची एकंदरीत बिकट परिस्थिती पाहिल्यावर मिझाराजे जयसिंग यांना एक नवीनच सुचली. कुतुबशाही, आदिलशाही आणि शिवाजी हे एकत्र आले, तर दख्खन भारी पडेल हे ओळखून त्यांनी शिवाजी महाराजानांच आग्ऱ्यास बादशहाकडे पाठवावे असे अगदी पक्के ठरविले. औरंगजेबालाही ते पटले होते. त्याच्या डोक्यात काही निराळ्याच कल्पना तरळू लागल्या या. शिवाजी आपल्याला भेटावयास यावाच असे त्याला अगदी मनापासून वाटत होते; म्हणून काहीही करून शिवाजी भोसले यास आग्ऱ्यास जरूर पाठवा असे औरंगजेबाने मिझाराजे जयसिंगाला पत्रही पाठविले.

शिवाजी महाराजांनी एकदा आग्रा येथे जाऊन औरंगजेबास भेटावे यासाठी शिवाजी महाराजाचे मन वळविण्यासाठी मिझोराजे जयसिंगाने आपले सगळे कौशल्य पणाला लावले होते. औरंगजेब हा काय माणूस आहे? हे महाराजांना चांगले माहीत होते. तो महाकपटी, वाटेल तेव्हा वचन मोडणारा, निगरगट्ट आहे हे माहीत असूनही आणि त्याच्या भेटीत आपल्या जिवास अपाय होणार हे कळत असतानाही महाराजांनी हा जिवावरचा खेळ मुद्दाम पत्करला. त्यांना मोठी तळमळ होती हिंदुपदपातशाहीची.

ह्या मुसलमानांनी शेकडो वर्षे हिंदभूमीवर आक्रमण करून लोकांचा छळ केला, पण कोणीही प्रतिकार केला नाही. तो आपण का करू नये? दक्षिणची भरपूर माहिती आपणास आहे; परंतु उत्तरेची ओळख आपणास नाही. आपण औरंगजेबाचे नुसते नाव ऐकतो, पण त्याचे सामर्थ्य काय आहे, त्याचा कारभार कसा चालतो, तिकडे आपले शत्रू-मित्र कोण आहेत, आपण दक्षिणेतून उठाव केला, तर त्याला उत्तरेतून कितपत पाठिंबा मिळेल हे सगळे आपण प्रत्यक्ष पाहणे आपल्या भावी उद्योगास जरुरीचे आहे. स्वधर्मस्थापनेसाठीच आपला जन्म आहे.

औरंगजेबाच्या छळाने त्रस्त झालेल्या प्रजेला सोडवावे असा आदेश, प्रत्यक्ष परमेश्वरानेच आपणास दिला आहे अशी महाराजांची मनोदेवता त्यांना सांगत होती आणि म्हणूनच महाराजांनी दख्खनच्या पटावरील आपला विस्कटलेला डाव थोडा वेळ नजरेआड करून, नर्मदा ओलांडून उत्तर हिंदुस्थानात पाऊल टाकायचे ठरविले. औरंगजेबाच्या सत्तासामर्थ्याचे केंद्र त्यांनाही अजमावून पाहावयाचे होते. त्यांच्याही मनात काही निराळेच मनसुबे होते. डोक्यात निराळ्याच कल्पना तरळू लागल्या होत्या. महाराजांनी आपल्या गडकिल्ल्यांची, आरमाराची नीट व्यवस्था लावली.

आपण आग्ऱ्याला गेल्यावर आपल्या पाठीमागे स्वराज्याच्या दौलतीचा कारभार कडक शिस्तीने चालावा अशी महाराजांची धारणा होती. महाराज औरंगजेबाला भेटावयास जाणार ही बातमी सर्वांना समजताच सर्वांची मने काळजीने ग्रासून गेली. महाराष्ट्रापासून दर, पाचशे कोसांवर आग्ऱ्याला औरंगजेबाला भेटायला जायचे? केवढे हे साहस? औरंगजेब म्हणजे साक्षात कर्दनकाळ! मूर्तिमंत कपट! महाभयंकर हलाहल! त्याची परीक्षा पाहावयाची? अफजलखान भेटीपेक्षाही ही भयंकर भेट. शिवाय महाराज आपल्या बरोबर नऊ वर्षांच्या संभाजीलाही नेणारे होते.

जिजामातांच्या जिवाची घालमेल होत होती. महाराजांनी मांसाहेबांना धीर दिला, “काळजी करू नये. श्रींच्या कृपेने सगळे काही ठीक होईल. तुमचा आशीर्वाद आणि श्रींचे छत्र आमचे पूर्ण रक्षण करेल.” त्यांच्या जीवितरक्षणाची पूर्ण हमी मिझाराजांनी घेतली होती. त्यांच्या सूचनेवरूनच महाराज जात होते; त्यामुळे आपल्या मुलखाला मोंगलांचा नवा त्रास होणार नाही याची त्यांना खातरी होती. तथापि, राज्यव्यवस्था सुरळीत चालेल अशी सगळी व्यवस्था महाराजांनी केली. राज्यकारभाराचा शिक्का मांसाहेबांच्या हाती दिला.

मोरोपंतादींनी मांसाहेबांच्या आज्ञेत वागून स्वराज्याचे रक्षण करावे. कोणत्याही प्रसंगाने किंवा बातमीने भयभीत होऊ नये, गडबडून जाऊ नये असे सर्वांना सांगितले. याच वेळी औरंगजेबाचे महाराजांना एक ‘प्रेमपत्र’ आले. ‘इकडील लोभ तुम्हांवर पूर्ण आहे. खातरजमेने यावे. म्हणजे भेटीअंती बहुत सत्कार पावून माघारे जाण्याविषयीचा निरोप दिल्हा जाईल.’ या पत्रासोबतच एक पोशाखही पाठविण्यात आला होता. महाराजांनी आग्ऱ्याला जाण्याचा दिवस निश्चित केला. फाल्गुन शुद्ध नवमी, सोमवार, ५ मार्च १६६६. त्यांच्याबरोबर जाणार होते त्यांचे जिवलग राजकारणातले मुरब्बी असे निराजी रावजी, त्र्यंबक सोनदेव, रघुनाथ बल्लाळ कोरडे, बाजी सर्जेराव जेधे, माणको हरी, दत्ताजी त्र्यंबक, हिरोजी फर्जंद, राघोजी मित्रा, कवींद्र परमानंद आणि मदारी मेहतर हा एक तरुण मुलगा.

रघुनाथ बल्लाळ कोरडे हे शिवाजी महाराजांचे वकील म्हणून पुढे गेले होते. याशिवाय अत्यंत विश्वासू असे शंभर लोक महाराजांच्या बरोबर होते. औरंगजेबाच्या भेटीला जाताना महाराज आणि संभाजी राजे यांचा लवाजमा श्रीमंती थाटाचा आणि स्वतंत्र राजाच्या इतमामाला साजेसा बाळगण्याची काळजी घेतली होती. आग्ऱ्यात असताना जरूर त्यांचा मुखलेप करण्यासाठी, मुठी दाबण्यासाठी भरपूर खजिना बरोबर घेतला होता. महाराजांच्या या स्वारीत १०० पायदळ, २५० घोडेस्वार, अधिकाऱ्यांसाठी पालख्या, गणवेषधारी सेवक, आवश्यक ती सामग्री पुरविण्यासाठी वणजारी बैलांच्या शंभर जोड्या घेतल्या होत्या.

ओझ्याचे काही उंटही होते. याशिवाय आघाडीला ढालेचा हत्ती, पुढे संरक्षकदल, घोड्यांवर भरजरी सरंजाम, सोन्याचांदीने मढविलेले सामान आणि पाठीमागे अंबारी असलेल्या दोन हत्तिणी होत्या. लोक थोडे पण पुरेसे आणि एकंदर थाट डोळे दिपविणारा. अशी सगळी योजना मोठ्या चातुर्याने केली होती. महाराजांचे दर्शनही मोठे छाप पाडणारे. हुकमत चालविणारा आविर्भाव, चेहऱ्यावर निर्भयता व बेफिकीरीचा रुबाब. सर्वश्रुत अद्भुत पराक्रमांचे सभोवती गूढ वलय; यामुळे महाराजांचे आग्ऱ्यातील आगमन सर्वांना अगदी नवखे व खळबळजनक वाटेल असेच होते. महाराज निघाले.

मांसाहेबांनी आशीर्वाद दिला, “यशवंत व्हा. लवकर परत या.” महाराज म्हणाले, “काळजी करू नका. सर्वांनी स्वराज्याची काळजी घ्या. मांसाहेबांना सांभाळा.” महाराज राजगडाचा निरोप घेऊन निघाले. शिवाजीराजे निघाले आहेत अशी पत्रे औरंगजेबास रवाना झाली. महाराजांना दिलेल्या आश्वासना प्रमाणे मिझाराजे जयसिंगांनी आग्ऱ्यास आपला पुत्र रामसिंग यास पत्रे माठवून बजाविले, ‘शिवाजीराजे आग्ऱ्यात असेपर्यंत त्यांच्या जीविताची काळजी घे. त्यांना कसलाही दगा होणार नाही याची दक्षता घे. आपण रजपूत आहोत. महाराजांना हमी दिली आहे हे विसरू नकोस.’ औरंगजेबाने महाराजांच्या प्रवासाची व्यवस्था उत्तम केली होती.

प्रवासातील खर्चासाठी दक्षिण सुभ्यातून एक लाख रुपयांची व्यवस्था केली होती. मार्गातील ठिकठिकाणच्या ठाणेदारांना ताकीदपत्रे पाठवून महाराजांची व्यवस्था ठेवण्यासाठी कळविले होते. त्यांचा शहाजाद्या प्रमाणेच मान राखावा अशी आज्ञा केली होती. स्वराज्याच्या सीमा ओलांडून महाराज औरंगाबादला पोहोचले. शहरात त्यांनी मिरवणुकीने प्रवेश केला. शहरातील हजारो स्त्री-पुरुष तृषार्त नजरेने महाराजांची वाट पाहत होते. महाराज आले. लोकांच्या नजरेचे पारणे फिटले. मिरवणुकीच्या आघाडीवर एक हत्ती झुलत होता. त्या हत्तीवर भगवा ध्वज फडकत होता.

महाराज एका पालखीत बसले होते. त्यांच्या पालखीचे दांडे सोन्याच्या पत्र्याने मढविलेले होते. महाराजांबरोबर असलेले स्वार मोठ्या रुबाबात व तोऱ्यात चालत होते. सारा थाट मराठी मर्दानी होता. त्या वेळी औरंगाबादचा सुभेदार सफशिकनखान हा होता. तो मोठा उर्मट होता; परंतु महाराजांनी त्याला त्याची जागा दाखवून नरम केले. मग त्याने केलेल्या सन्मानाचा स्वीकार करून महाराज पुढे निघाले. महाराजांनी तापी नदी ओलांडली.

नर्मदाही पार केली व मजल दरमजल करीत ते आग्रा शहराजवळ आले. १२ मे १६६६ या दिवशी औरंगजेबाचा पन्नासावा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा होणार होता. या दिवशी शिवाजी महाराजांना औरंगजेबाच्या भेटीला न्यायचे ठरलेले होते. या समारंभाच्या अगोदर एक दिवस म्हणजे ११ मे ला आग्ऱ्यात येण्याची सूचना महाराजांना पाठविली होती. महाराजांनी चंबळा ओलांडून यमुनेच्या प्रदेशात प्रवेश केला. त्या भूमीची दुर्दशा पाहून महाराजांचे मन व्यथित झाले.

‘ही पांडवांची, श्रीकृष्णाची भूमी; पण त्यांची एकही खूण येथे शिल्लक नाही, हिंदूंची ही पुण्यभू अन्यायाविरुद्ध पेटून का उठली नाही? कोणीही बंड का केले नाही? स्वदेशासाठी, स्वातंत्र्यासाठी कुणाचेही रक्त का तापले नाही? का तापत नाही? परकीय सत्तेविरुद्ध, अन्यायाविरुद्ध, जुलमांविरुद्ध लोक दंड का थोपटत नाहीत? सगळे शांत शांत कसे? नाही. हे सगळे बदलले पाहिजे. ही भारतभूमी पुन्हा स्वतंत्र झाली पाहिजे. मुक्त झाली पाहिजे.

मुक्त केली पाहिजे. या विचारांचे वादळ महाराजांच्या मनात घोंघावू लागले. महाराज आग्रा शहराजवळ आले. महाराज आल्याची बातमी शहरात पोहोचली, पण महाराजांच्या स्वागतासाठी औरंगजेबाचा कोणताही मोठा अधिकारी, वजीर किंवा शहाजादा आला नाही. शेवटी आला कोण, तर बादशहाचा केवळ अडीच हजारी मनसबदार असलेल्या रामसिंहाचा एक सामान्य कारकून मुनशी गिरिधरलाल! कुणाच्या स्वागताला? तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या! महाराजांना अपेक्षाभंगाचा हा फार मोठा धक्का बसला; परंतु काळ वेळ पाहून महाराज काहीच बोलले नाहीत.

महाराजांची उतरण्याची सोय शाही हवेलीत किंवा शामियान्यात केली नव्हती. मुकुलचंदाची सराई नावाची एक धर्मशाळा होती. त्या धर्मशाळेत या महाराष्ट्राच्या राजांना उतरविण्यात आले. दुसरा दिवस उजाडला. औरंगजेबाच्या वाढदिवसाच्या समारंभाचा दिवस. नगरात मोठीच धांदल, गडबड होती. महाराजांना मानाने व थाटाने समारंभाच्या ठिकाणी नेण्यासाठी औरंगजेबाकडून कोणीही मोठा अधिकारी आला नाही.

औरंगजेबाने ते काम रामसिंग व मुखलीसखान या दोन सामान्य सरदारांकडे सोपविले होते. रामसिंगाने ते काम गिरिधरलाल मुनशीला सांगितले होते. तिकडे सकाळी दहा वाजता ‘दिवाण-इ-आम’ मध्ये समारंभ सुरू झाला. महाराज अद्याप कसे आले नाहीत; म्हणून काळजीत पडलेले रामसिंग व मुखलीसखान महाराजांना आणण्यासाठी निघाले, पण महाराजांना घेऊन येत असलेला गिरीधरलाल व रामसिंग यांची चुकामूक झाली.

शेवटी एकदाचे रामसिंग व मुखलीसखान महाराजांना सामोरे गेले व त्यांना रामसिंगाच्या डेऱ्याजवळ राहण्यासाठी घेऊन आले तो पर्यंत दिवाण-इ-आम मधील दरबार संपला व औरंगजेब दिवाणइ-खास मधील दरबारात जाऊन बसला. इकडे महाराजांनी थोडी विश्रांती घेतल्यावर रामसिंग व मुखलीसखान त्यांना घेऊन दरबाराकडे आले. तोच औरंगजेब दिवाण-इ-खास मधील दरबार संपवून निवडक लोकांच्या भेटीसाठी घुशलखान्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: