आध्यात्मिक क्षेत्रातील संतपुरुष शेगांवचे गजानन महाराज

महाराष्ट्राला ‘संतांची भूमी ‘ म्हटलं आहे. श्री गजानन महाराज हे आध्यात्मिक क्षेत्रातील संतपुरुष होते. त्यांनी आध्यात्मिक तत्त्वज्ञान भक्तजनांना सांगितले. सर्वांचे कल्याण करणे आणि ईश्वर भक्तीतून समाजप्रबोधन करुन सकस, सत्त्वशील, विवेकी समाज घडविणे हा श्री गजानन महाराजांच्या जीवनाचा उद्देश होता.

दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती, मधुरा भक्तीचे अंध संत श्री गुलाबराव महाराज, नरसिंग महाराज, बैरागी महाराज, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज अशा अनेक संतांनी या भूमीत जन्म घेऊन लोकांना ईश्वरनिष्ठा, श्रद्धा व भक्तीची शिकवण दिली. अशा या संतांच्या पवित्र भूमीत शेगांवी श्री गजानन महाराज माघ वद्य सप्तमी शके १८०० दिनांक २३/२/१८७८ रोजी चमत्कारिक रीतीने प्रकट झाले.

एके दिवशी देवीदास पातुरकर ह्यांच्या मठाबाहेर पडलेल्या उष्ट्या पत्रावळीतील अन्नकण खाताहेत, अशा विचित्र अवस्थेत महाराजांचे दर्शन शेगांवकरांना झाले. आणि प्रथमदर्शनी ते लोकांना वेडे वाटले. परंतु बंकटलाल व दामोदर ह्यांना मात्र महाराज वेडेपिसे वाटले नाहीत. त्यांना ते आत्मानंदात निमग्न असणारे महान सत्पुरुष वाटले. म्हणून बंकटलालने महाराजांना विनवणी करुन घरी आणले.

दिवसेदिवस त्यांच्या दर्शनास गर्दी होऊ लागली. ब्रह्मनिष्ठ कीर्तनकार गोविंदबुवा टाकळकर ह्यांचे महादेवाच्या मंदिरात कीर्तन झाले. त्यावेळी गोविंदबुवाच्या नाठाळ, बेफाम असलेल्या घोड्याच्या पायात महाराज जाऊन झोपले. कीर्तन झाल्यानंतर बुवा येऊन पाहातात तो घोडा शांत झालेला दिसला. तेव्हा गोविंदबुवांना त्यांची योग्यता समजून आली. त्यांनी महाराजांची पूजा करुन त्यांची महती शेगांव निवासी लोकांना सांगितली.

लोकांनी महाराजांचा चमत्कार पाहिला होता. म्हणून दुःखी, पीडीत जन आपले दुःख निवारण्यासाठी महाराजांना साकडे घालू लागली. महाराजांनी लोकांची संकटे दूर केल्याची हजारो उदाहरणे त्यांच्या चरित्रात आढळून येतात.

सन १९०८ साली श्री स्वामीच्या समोरच संस्थानचे बीजारोपण झाले आणि १२ विश्वस्त नेमले गेले. त्याप्रसंगी विश्वस्तांना उपदेश केला. ‘पैशाला स्पर्श करु नका.’, ‘पैसा साचवून ठेवू नका.’, यात्रा थांबवू नका.’ असे हे शेगांव तालुक्याचे मुख्य शहर आहे. शेगांव हे रेल्वेस्टेशन मध्य रेल्वेच्या नागपूर-भुसावळ मार्गावर असून मुंबई शहरापासून ५४७ कि. मी. अंतरावर आहे. स्टेशनपासून समाधी स्थान सुमारे २ कि. मी. आहे.

श्री गजानन महाराज यांनी आध्यात्मिक तत्त्वज्ञान भक्तजनांना सांगितले. तीच परंपरा पुढे चालू आहे. संस्थानात श्रींचा प्रकटदिन, समाधीदिन, रामनवमी इत्यादी गोष्टींबरोबर आध्यात्मिक क्षेत्रातील अधिकारी व्यक्तीच्या प्रवचनांचे, कीर्तनांचे संस्थान आयोजन करते. प्रतिदिन ५ पासून रात्री ९.३० पर्यंत म्हणजे विधीवत काकड आरतीपासून शेजारतीपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले असते.

सन १९६८ पासून दरवर्षी पंढरपूरची पायी वारी सुरु केली. तसेच संस्थान वारकरी शिक्षणसंस्था चालवते. वैद्यकीय सेवा, शैक्षणिक सेवा क्षेत्रातही संस्थानाचे भरीव कार्य आहे. श्री गजानन महाराजांचे एक जागृत देवस्थान आहे. हजारो लोकांना त्याची प्रचिती आली आहे.

श्री गजानन महाराज यांनी या ठिकाणी अनेक दिवस वास्तव्य करुन येथेच समाधी घेतली. समाधी स्थानावर विशाल मंदिर असून चारी बाजूला देवतांच्या मूर्ती खोदल्या आहेत. मंदिरामध्ये राम-लक्ष्मण-सीतेची मूर्ती असून त्यापुढे गजानन महाराजांच्या पादुका आहेत. मंदिरामध्ये तळघरात समाधी असून त्यावर गजानन महाराजांची मूर्ती आहेत. मंदिराजवळ निवासाची सोय आहे. रामनवमीला मोठी जत्रा भरते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: