सीमंतिनी आख्यान

चित्रवर्मा नावाचा एक राजा होऊन गेला. तो फार पराक्रमी होता. तो शिव व विष्णू या दोघांचा भक्त होता. त्याला अनेक पुत्र होते. शिवशंकराच्या कृपेने त्याला एक कन्या झाली. ती खूपच सौंदर्यवती होती. तिच्या जन्माच्या वेळी ज्योतिषाने भविष्य सांगितले, “ही सर्व पृथ्वीवर राज्य करील.” राजाला खूप आनंद झाला. त्याने आपल्या मुलीचे नाव ‘सीमंतिनी’ ठेवले. परंतु एका विद्वान ज्योतिषाने मात्र वेगळेच भविष्य वर्तवले. तो म्हणाला, “हिला वयाच्या चौदाव्या वर्षी वैधव्य येईल.” तेव्हा मात्र राजा उद्विग्न झाला.

तेव्हा तो ज्योतिषी म्हणाला, “पण शंकराने जर कृपा केली तर हिचा वैधव्ययोग टळेल.” एवढे सांगून ज्योतिषी निघून गेला. कालांतराने सीमंतिनी उपवर झाली. एकदा गप्पा मारत असताना तिची एक सखी म्हणाली, “सीमंतिनी, तुला एक सांगू कां?” सीमंतिनी म्हणाली, “सांग की.” सखी म्हणाली, “तुझ्या जन्माच्या वेळी ज्योतिषी भविष्य सांगत होते. एक म्हणाला, “तू पृथ्वीचे राज्य करशील.” तर दुसऱ्याने “तुला चौदाव्या वर्षी वैधव्य येईल,” असे सांगितले. तो पुढे म्हणाला, “मात्र शंकराची कृपा झाली तर ते टळेल.” सीमंतिनीला खूप दुःख झाले.

तिने ‘याज्ञवल्क्य’ मुनींची पत्नी मैत्रेयीला हे सांगितले व विचारले, “हे प्राक्तन चुकविण्यासाठी मी कोणते व्रत करू?” मैत्रेयीने तिला सोमवारचे व्रत करण्यास सांगितले व ‘नमः शिवाय’ या मंत्राचा जप सांगितला. पुढे ती म्हणाली, “तुझ्यावर कोणतेही संकट आले. दुःखाचे पर्वत कोसळले तरी हे व्रत सोडू नकोस. म्हणजे तुझा वैधव्ययोग टळेल.” सीमंतिनी सोमवारचे व्रत करू लागली.

काही काळाने नलराजाचा पुत्र इंद्रसेन याचा पुत्र चित्रांगद हा वर सीमंतिनीसाठी ठरला. सीमंतिनी सोमवारचे व्रत करीत असे. पुढे चित्रांगद व ‘सीमंतिनी’ यांचा मोठ्या थाटात विवाह झाला. सीमंतिनी ‘नैषध’ देशाच्या राजाची राणी झाली. दिवसामागून दिवस गेले. एके दिवशी नैषध सैन्य घेऊन रानात शिकारीसाठी गेला. शिकारीच्या धावपळीने तो खूप दमला. जवळच यमुना नदी होती. विश्रांतीसाठी तो त्याच्या सेवकांसह एका नौकेत चढला.

नावाड्याने नौका यमुना नदीतून नेण्यास सुरुवात केली. तोच अचानक जोराचा वारा सुटला. नौका हलू लागली. नावाड्याने काही प्रयत्न करण्याच्या आत नौका बुडाली. चित्रांगद सेवकांसहित बुडाला. तीरावरील सैनिकांच्या देखत हा प्रकार घडला. त्यातील काही सैनिक धावत गेले व त्यांनी ‘चित्रवर्मा’ राजाला ही वार्ता सांगितली. सीमंतिनी आईसह तेथे आली.

सारे शोकसागरात बुडाले. तिकडे इंद्रसेन नगरात नाही. या संधीचा फायदा घेऊन त्याच्या भाऊबंदांनी त्याचे राज्य बळकावले. इंद्रसेनाला ते कळले तेव्हा तो पत्नीसह दुसऱ्या देशात गेला. पण शत्रूनी दोघांनाही पकडले आणि तुरुंगात टाकले. त्या दुःखातही सीमंतिनीने शिवव्रत सोडले नाही. अशी तीन वर्षे गेली. चित्रांगद यमुनेत बुडाला. पण त्यास नागकन्यांनी पाताळात नेले व त्यांनी त्याला तक्षकापुढे उभा केला.

चित्रांगदाने तक्षकाला वंदन केले. तक्षकाने त्यास अनेक प्रश्न विचारले, “तुम्ही कोणत्या देवाची भक्ती करता?” चित्रांगद म्हणाला, “आम्ही शिवशंकराची भक्ती करतो. हे तक्षकराज शिवशंकराचा महिमा आम्ही काय सांगणार?” त्याचे बोलणे ऐकून तक्षक म्हणाला, “देवांनाहि न मिळणाऱ्या कितीतरी वस्तू इथे पाताळात आहेत. तू मला आवडला आहेस. तू इथे माझ्याबरोबर राहतोस का?” चित्रांगद म्हणाला, “नागराज, मला माझ्या आईवडिलांना केव्हा भेटेन असे झाले आहे.

माझी पत्नी सीमंतिनी माझी वाट पाहत असेल. मला पृथ्वीतलावर जाऊ द्या.” तक्षकाने त्याला अनेक वस्तू भेट दिल्या व तू माझे केव्हाही स्मरण केलेस की मी धावून येईन, असे वचन दिले. शिवाय एक वेगवान अश्व व चिंतामणी दिला. नागलोकात चित्रांगदाची तीन वर्षे गेली होती. योगायोगाने तो यमुनेतून बाहेर पडायच्या वेळी सीमंतिनी स्नानासाठी तेथे आली होती. दोघांनी एकमेकांना पाहिले पण ओळखले नाही.

चित्रांगदाने तिला विचारले, “तू कोण आहेस?” ती रडू लागली. तिच्याबरोबर तिच्या मैत्रिणी होत्या. त्या म्हणाल्या, “या यमुना नदीत हिचा पती तीन वर्षांपूर्वी नौका बुडून नाहीसा झाला. हिच्या साससासऱ्यांना शत्रने बंदिवासात टाकून हिचे राज्य बळकावले आहे.” सीमंतिनीने खणेने चित्रांगदाची माहिती विचारायला मैत्रिणींना सांगितले. मैत्रिणींनी विचारल्यावर चित्रांगद म्हणाला, “मी एक सिद्धपुरुष आहे. तिन्ही लोकांत मी फिरतो.’

हलकेच त्याने पुढे होऊन सीमंतिनीचा हात पकडला व म्हणाला, “तुझा पती जिवंत आहे. त्याची व तुझी तीन दिवसांत भेट घडविन. पण हे तू तीन दिवस गुप्त ठेव.” सीमंतिनीने हळूच त्या सिद्धपुरुषाकडे पाहिले. तिला शंका आली. हा सिद्धपुरुष चित्रांगदासारखा वाटतो. हाच चित्रांगद असावा. पण कसे शक्य आहे? तीन वर्षांपूर्वीच चित्रांगद बुडाला. तिने मनातल्या मनात शंकराचे स्मरण केले व ती म्हणाली, “हा पुरुष जर चित्रांगद असेल तर हे शंकरा, मी ११ लक्ष दाम्पत्यांची पूजा करीन.

११ लक्ष दीप लावीन व तितकीच बिल्वपत्रे तुला वाहीन.” चित्रांगद म्हणाला, “आता तू घरी जा. तुझ्या सासूसासऱ्यांना मी तुमचा मुलगा येणार आहे अशी शुभवार्ता देतो. तू मात्र तीन दिवस कोणाजवळही ही गोष्ट बोलू नकोस.’ चित्रांगद, त्याचा सर्पसेवक नैषध देशाकडे घोड्यावरून निघाला. वायूवेगाने ते ‘नैषध’ देशात पोहोचले. इथे सर्पाने मनुष्य रूप धारण केले व शत्रूराजाकडे जाऊन तो म्हणाला, “चित्रांगद जिवंत आहे. त्याला महासिद्धी प्राप्त झाल्या आहेत.

तो वायुवेगाने धावणाऱ्या घोड्यावर बसून तुम्हाला मारून राज्य परत घेण्यास आला आहे.” या बातमीने शत्रू घाबरला. त्याने इंद्रसेन व त्याच्या पत्नीला राज्यावर बसविले. त्या दोघांच्या हे पाया पडले. इंद्रसेन चित्रांगदाच्या स्वागतास पुढे गेला. चित्रांगदाला आईवडिलांनी पोटाशी धरले. तर सर्वजण चित्रवर्मा नावाच्या राजाच्या नगराकडे गेले. चित्रवर्मा राजा चित्रांगदाला व त्याच्या मातापित्याला सामोरे गेले. चित्रांगद व सीमंतिनीचा पुन्हा विवाह केला. चित्रांगदाने नंतर खूप वर्षे राज्य केले. हे सीमंतिनीचे आख्यान स्त्रियांचे सौभाग्यवर्धक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: