संत श्री एकनाथ बद्दल माहिती मराठीत – Sant Eknath Information in Marathi
हॅलो मित्रांनो आज मी तुम्हाला संत श्रीएकनाथ बद्दल माहिती मराठीत – Sant Eknath Information in Marathi देणार आहे तर चला बघुयात. आणखी वाचा – संत श्री तुकाराम महाराज
संत एकनाथ – Sant Eknath Information in Marathi
१] | नाव – | संत श्री एकनाथ |
२] | जन्म – | इसवी सन १५३३ |
३] | आई – | रुक्मिणी |
४] | वडील – | सूर्यनारायण |
५] | मृत्यू – | इसवी सन १५९९ |
संत श्रीएकनाथ (भागवत धर्माचे प्रसारक) हे प्रसिद्ध संत भानुदास ह्यांचे पणतू. एकनाथांचा जन्म पैठण येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण होते आणि आईचे नाव रुक्मिणी होते.
एकनाथ लहान असतानाच त्यांचे आईवडील मरण पावल्यामुळे त्यांचा सांभाळ त्यांच्या आजोबांनी केला. एकनाथांची मुंज वयाच्या सहाव्या वर्षीच झाली आणि मग संस्कृत भाषेचे आणि नित्य- नैमित्तिक ब्रह्मकर्मांचे त्यांचे शिक्षण सुरू झाले.
एकनाथ बारा वर्षांचे असतानाच त्यांना अध्यात्माची ओढ लागली आणि एक दिवस, घरात कोणालाही न सांगता, ते सद्गुरूला शोधण्यासाठी घराबाहेर पडले.
देवगिरी येथे त्यांना जनार्दनस्वामी भेटले, हेच आपले सद्गुरू आहेत, असे मानून नाथ त्यांच्याकडेच राहू लागले. प्रपंच आणि परमार्थ ह्यांची सांगड कशी घालावी, ह्याची शिकवण एकनाथांना जनार्दनस्वामींकडूनच मिळाली.
गुरूंच्या घरी सहा वर्षे काढल्यानंतर त्यांना ‘सुलभ’ पर्वतावर ईश्वराचा साक्षात्कार झाला. त्यानंतर एकनाथ व जनार्दनस्वामी हे दोघे तीर्थयात्रेला निघाले.
पंचवटी येथील मुक्कामात स्वामींच्या आज्ञेवरून नाथांनी चतुःश्लोकी भागवतावर ओवीबद्ध प्राकृत टीका लिहिली. नाथांच्या काव्यरचनेची ही सुरुवात होती.
पुढे काही काळानंतर जनार्दनस्वामी देवगिरीस परत आले आणि एकनाथांनी त्यांची तीर्थयात्रा पुढे सुरू ठेवली. उत्तर आणि दक्षिण भारतातील अनेक ठिकाणी एकनाथ जाऊन आले.
ही तीर्थयात्रा करत असताना त्यांनी त्या काळातील देशाच्या परिस्थितीचेही निरीक्षण केले. वयाच्या बाराव्या वर्षी घराबाहेर पडलेले एकनाथ वयाच्या पंचविसाव्या वर्षी घरी परत आले. त्यांचे आजोबा त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसले होते.
जनार्दनस्वामींच्या आदेशावरून त्यांनी गृहस्थाश्रमात प्रवेश केला. नाथांचा विवाह गिरिजाबाई ह्या सुशील मुलीशी झाला. संसारात राहूनही नाथांनी परमार्थ साधला, ह्याचे श्रेय गिरिजाबाईंकडेच जाते.
दारी आलेल्या अतिथी-अभ्यागताला भोजन देणे, ईश्वराचे नामस्मरण करणे, कथा-कीर्तन करणे, अध्यात्म विवेचन आणि ग्रंथलेखन करणे असा एकनाथांचा नित्यक्रम होता.
इसवी सन १५७० मध्ये एकनाथांनी भागवत पुराणाच्या अकराव्या स्कंधावरील टीकेचे पाच अध्याय पूर्ण केले. भागवतासारख्या पवित्र ग्रंथावर नाथांनी प्राकृत टीका लिहावी, हे काशीच्या सनातनी मंडळींना आवडले नाही.
त्यांनी एकनाथांना काशीत बोलावून त्यांचा अपमान केला. त्यानंतर काही काळ एकनाथ काशीतच राहिले. इसवी सन १५७३ साली त्यांनी आपला टीका- ग्रंथ पूर्ण केला.
तो ग्रंथ काशीतल्या ब्राह्मणांना आवडला आणि त्यांनी त्या ग्रंथाची पालखीतून मिरवणूक काढली. काव्यदृष्ट्या सरस असलेला हा टीका-ग्रंथ पुढे ‘एकनाथी भागवत’ ह्या नावाने प्रसिद्ध झाला.
नाथांनी ‘भावार्थ रामायण’ आणि ‘रुक्मिणी स्वयंवर’ ह्या दोन ग्रंथांचीही रचना केली. लोकप्रबोधनासाठी त्यांनी अनेक भारुडे आणि गवळणी ह्यांची रचना केली.
एकनाथांची भारुडे आणि भावार्थ रामायण यांतून त्या काळच्या मुसलमानी अमलाखालील महाराष्ट्राचे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक स्थिती ह्यांचे चित्रण पाहावयास मिळते.
नाथांचे आणखी एक महत्त्वाचे कार्य म्हणजे त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध आवृत्ती तयार केली. ज्ञानेश्वरीच्या ठिकठिकाणी असलेल्या हस्तलिखित पोथ्या नाथांनी शोध घेऊन गोळा केल्या. त्यांवर संशोधन केले आणि मग संशोधित शुद्ध आवृत्ती तयार केली.
महाराष्ट्रात सध्या प्रचारात असलेली ज्ञानेश्वरी ही नाथांनी संशोधित केलेली आवृत्ती आहे. नाथांचा मोठा मुलगा हरिपंडित. तो विद्वान होता आणि संस्कृत भाषेचा कडवा अभिमानी होता.
नाथांच्या लोकाभिमुख वृत्तीला आणि मराठी ग्रंथरचनेला हरिपंडिताचा विरोध होता. पण काही काळानंतर त्याला आपल्या वडिलांचे महत्त्व पटले आणि त्याचा विरोध मावळला.
सर्वधर्मसमभाव आणि भूतदया ह्यांचा आदर्श एकनाथांनी आपल्या वागण्यातूनच लोकांना घालून दिला होता. ‘जे जे भेटे भूत, ते ते मानिजे भगवंत’ (प्रत्येक प्राणिमात्रामध्ये ईश्वर आहे.) ही त्यांची शिकवण होती.
निष्कलंक चारित्र्य, विवेक, औदार्य ह्या गुणांबरोबरच सत्याशी प्रामाणिक राहणे आणि प्रपंचात राहूनही परमार्थ साधणे; हे आदर्श त्यांनी त्या काळच्या समाजासमोर ठेवले.
संस्कृत, अरबी, फारसी, उर्दू आणि हिंदी ह्या भाषा त्यांना अवगत होत्या. त्यांची साधना, लोकसंग्रह आणि प्रासादिक वाणी ह्या वैशिष्ट्यांमुळे ते संतपदाला पोहोचले.
काय शिकलात?
आज आपण संत श्रीएकनाथ बद्दल माहिती मराठीत – Sant Eknath Information in Marathi पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.