रामनवमी माहिती, इतिहास मराठी । Ram Navami Information in Marathi
हॅलो मित्रांनो कशे आहात तुम्ही आज मी तुम्हाला रामनवमी माहिती, इतिहास मराठी । Ram Navami Information in Marathi सांगणार आहे तर चला बघुयात.
आणखी वाचा – महावीर जयंती
रामनवमी चैत्र शुद्ध नवमी हिलाच रामनवमी असे म्हणतात. संतसज्जनांच्या रक्षणासाठी व दुष्ट दुर्जनांचा नाश करण्यासाठी भगवान विष्णू युगे-युगे विविध नावरूपानी अवतार घेतात अशी भारतीयांची श्रद्धा आहे. दुष्ट अशा रावणसत्तेचा, रावणी, राक्षसी वृत्तीचा नाश करून पृथ्वीवर न्यायाचे, सत्तेचे, सर्वांना सुख-आनंद-समाधान देणारे राज्य निर्माण करण्यासाठी विष्णूंनी चैत्र शुद्ध नवमी या दिवशी आपला सातवा अवतार – रामावतार धारण केला. तीच ही रामनवमी.
लंकेचा राजा रावण अत्यंत बलाढ्य, शूर वीर होता. तो अतिशय दुष्ट, क्रूर, अत्याचारी होता. ब्रह्मदेव, शंकर इत्यादींनी दिलेल्या वरांमुळे तो उन्मत्त झाला होता. तो गोब्राह्मणांचा, ऋषिमुनींचा छळ करीत असे. त्याने यज्ञांचा विध्वंस केला. स्त्रियांवर अत्याचार सुरू केले. अनेक देवकन्यांना पळवून नेले. त्याने अनेक देवांना, नवग्रहांना बंदिवासात टाकले. पच्यापुढे कुणाचे काहीही चालत नसे. रावणाच्या व त्याच्या राक्षसांच्या त्रासामुळे पृथ्वी आक्रोश करू लागली.
आता काय करायचे! या रावणाचा नाश कसा करायचा याचा सर्व देव विचार करू लागले. मग ब्रह्मदेवासह सर्व देव क्षीरसागरावर गेले. क्षीरसागरात शेषनागावर पहुडलेल्या भगवान विष्णूंची त्यांनी स्तुती करून आपले दुःख सांगितले. तेव्हा भगवान विष्णू त्यांना म्हणाले, “चिंता करू नका. रावणसत्तेचा नाश करण्यासाठी व पृथ्वीला सुखी करण्यासाठी मी लवकरच सूर्यवंशातील दशरथ राजाच्या पोटी अवतार घेत आहे.” भगवान विष्णूंनी असे आश्वासन दिले असता सर्व देव, ऋषी, मानव यांना अतिशय आनंद झाला.
त्या वेळी अयोध्येत सूर्यवंशातील राजा दशरथ राज्य करीत होता. तो अत्यंत शूर वीर, पराक्रमी होता. त्याचे राज्य समृद्ध होते. दशरथाला कौसल्या, सुमित्रा व कैकेयी अशा तीन राण्या होत्या. दशरथाला सर्व सुखे होती पण पुत्रसंतान नव्हते. त्यामुळे तो व त्याच्या राण्या अतिशय दुःखी होत्या. दशरथाने अनेक नवससायास केले. पण त्याच्या वंशवेलीला फूल येत नव्हते. त्या वेळी देवगुरू बृहस्पती दशरथाला म्हणाले “राजा, तुझ्या पोटी साक्षात परमेश्वर अवतार घेणार आहे.
अनंत ब्रह्मांडाचा नायक, पुराणपुरुष भगवान विष्णू तुझा पुत्र होईल, म्हणून तू पुत्रकामेष्टी यज्ञ कर.” दशरथाला हा उपाय योग्य वाटला. मग वसिष्ठ ऋषींच्या मार्गदर्शनाखाली त्याने पुत्रकामेष्टी यज्ञ सुरू केला. त्याअगोदर अश्वमेध यज्ञ केला. पुत्रकामेष्टी यज्ञ पूर्ण होत आला त्या वेळी एक मोठा चमत्कार झाला. यज्ञकुंडातून एक अत्यंत तेजस्वी महापुरुष प्रकट झाला. त्याच्या हातांत पायसाने भरलेले सुवर्णपात्र होते. तो दशरथाला म्हणाला “दशरथा, घे हे पायसदान.
तुझ्या या यज्ञाने भगवान विष्णू प्रसन्न झाले आहेत. हे पायस तुझ्या तिन्ही राण्यांना दे. हे पायस पुत्रप्राप्ती करून देणारे आहे. तुझ्या राण्यांनी हे पायस प्राशन केल्यावर भगवान विष्णूचे मानवी अंश असे चार पुत्र त्यांना होतील.” अतिशय आनंदित झालेल्या दशरथाने ते पायस घेतले व आपल्या तिन्ही राण्यांना ते पिण्यास दिले. त्या पायससेवनाने दशरथाच्या तिन्ही राण्या गर्भवती झाल्या. ही गोड बातमी ऐकून प्रजाजनांना खूप आनंद झाला. गर्भवती राण्यांचे नवमास पूर्ण भरले. प्रसूतिकाळ जवळ आला.
मग वसंत ऋतू, चैत्र मास, शुद्ध नवमी, रविवार, पुनर्वसू नक्षत्र या शुभमुहूर्तावर भर दुपारी सूर्य मध्यावर आला असता कौसल्या प्रसूत झाली. तिच्या पोटी साक्षात नारायण अवतरला. तो म्हणजेच श्रीराम. श्रीरामाचा जन्म होताच देवांनी जयजयकार केला. आता हा रावणादी राक्षसांना ठार मारून आम्हाला बंदिवासातून मुक्त करील. पृथ्वीचा भार हलका करील. या विश्वासाने देवांना आनंद झाला. आकाशात विमानांची गर्दी झाली. पुष्पवृष्टी सुरू झाली. दुंदुभी वाजू लागल्या. कौसल्येला पुत्र झाला.
ही शुभवार्ता समजताच अवधी अयोध्यानगरी आनंदसागरात डुंब लागली. सगळीकडे मंगल वाद्यांचा गजर सुरू झाला. अयोध्येत लोकांनी गुढ्या-तोरणे उभारली. नगरातील स्त्रिया कौसल्येची ओटी भरण्यासाठी राजवाड्याकडे धावू लागल्या. ब्राह्मणांनी मंगल पाठ सुरू केले. ह्या वेळी दशरथाने फार मोठा दानधर्म केला. ज्याला जे हवे ते भरभरून दिले. दुसऱ्या दिवशी दशमीला कैकेयी प्रसूत झाली. तिला जो पुत्र झाला त्याचे नाव भरत. त्यानंतर एकादशीला सुमित्रा प्रसूत झाली.
तिला दोन पुत्र झाले. ते म्हणजे लक्ष्मण व शत्रुघ्न. यापैकी श्रीराम हा अत्यंत बुद्धिमान, तेजस्वी व बलवान होता. त्याने आपल्या आयुष्यात लोकोत्तर कृत्ये केली म्हणून त्याला अवतारी पुरुष मानले आहे. श्रीराम हा सत्यवचनी, एकबाणी, पित्याचे वचन पाळणारा, आदर्श राजा होता. तो आदर्श बंधू, आदर्श मित्र, आदर्श शिष्य व आदर्श शत्रूही होता. म्हणूनच भारतीय लोक श्रीरामाला परमेश्वर समजून त्याच्यावर प्रेम करतात. साधुसंत, देवादिकांना छळणाऱ्या दुष्ट रावणाचा त्याने नाश केला. श्रीरामाचा अवतार त्यासाठीच होता.
श्रीरामाच्या या अलौकिक सत्कार्यामुळे त्याची कीर्ती अजरामर झाली. श्रीरामाच्या आदर्श जीवनचरित्राचे स्मरण म्हणून दरवर्षी चैत्र शुद्ध नवमीला श्रीरामनवमीचा-श्रीरामजन्माचा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी गावातील श्रीराममंदिरात, विष्णुमंदिरात श्रीरामाचा जन्मोत्सव साजरा केला जातो. त्या वेळी श्रीरामजन्माचे कीर्तन होते. जन्म झाल्यावर सर्वांना प्रसाद म्हणून सुंठवडा वाटला जातो.
श्रीरामाची सवाद्य मिरवणूक काढली जाते. काही ठिकाणी हा उत्सव चैत्र शुद्ध प्रतिपदा ते नवमी असा नऊ दिवस करतात. या काळात रोज श्रीरामाचा जप, रामरक्षास्तोत्राचे पारायण, रात्री कथा-कीर्तन इत्यादी कार्यक्रम होतात. दशमीला उत्सवाची सांगता व महाप्रसाद असतो. श्रीरामासारखा आदर्श राजा नंतर झाला नाही. पुढे होणार नाही. श्रीराम मानवांना प्रेरणा देणारा, प्रोत्साहन देणारा, सागरासारखा गंभीर, आकाशासारखा विशाल व हिमालयासारखा उदात्त होता. त्याच्या अनंत गणांपैकी काही गुण तरी आपल्या अंगी यावेत, याचा निश्चय करण्यासाठी हा रामनवमीचा उत्सव.
काय शिकलात?
आज आपण रामनवमी माहिती, इतिहास मराठी । Ram Navami Information in Marathi पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.