पुरीचे जगन्नाथ मंदिर

कलियुगातील पावनकरी धाम म्हणजे ‘पुरी’ असे मानले जाते. ओडिसात विष्णूच्या चार आयुधांची क्षेत्रे आहेत. त्यापैकी हे शंखक्षेत्र होय. याचा आकारही शंखासारखाच आहे. आद्य शंकराचार्याने स्थापलेल्या चार धर्मपीठांपैकी एक पीठ जगन्नाथ पुरी आहे. या पीठाला गोवर्धन मठ म्हणतात. भुवनेश्वरापासून ३२ कि.मी. वर समुद्रकिनारी वसलेले हे प्राचीन तीर्थक्षेत्र पुरी जिल्ह्यातील दक्षिणेच्या टोकाला आहे.

शाक्त पंथाचे लोक त्याला उड्डीयन पीठ’ म्हणतात. जगन्नाथ ही देवता इश्वाकू कुलदैवत होते. जगन्नाथ (पुरी) येथे चैतन्य महाप्रभू आल्यावर येथील वैष्णव संप्रदायाची महती वाढत गेली. पुरी येथील जगन्नाथ मंदिर हे ओडिसातील श्रेष्ठ दर्जाचे मंदिर होय. ओरिसातील कोणार्क हे सूर्यक्षेत्र, भुवनेश्वर हरक्षेत्र तर परी हे हरिक्षेत्र किंवा विष्णूक्षेत्र किंवा पुरूषोत्तम क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे.

भुवनेश्वरचे लिंगराज मंदिर, कोणार्कचे सूर्यमंदिर व पुरीचे जगन्नाथ मदिर ओरिसाचे धार्मिक वैभव होय. हे मंदिर ओडिसा राज्यातील सर्व मंदिरात उंच मंदिर आहे. जगन्नाथपुरी हे भारतातील प्रख्यात चार धामांपैकी एक धाम असून जगन्नाथाचे मंदिर भारतात अत्यंत पवित्र मानले जाते. हे मंदिर विशाल असून दोन कोटाच्या आत आहे. चार दिशांना चार महाद्वारे आहेत.

पूर्वेच्या सिंहद्वारावर कोणार्क येथून आणून स्थापित केलेला उंच अरुणस्तंभ आहे., या मंदिरात जगन्नाथ (कृष्ण) बलराम व सुभद्रा यांच्या ओबडधोबड मूर्ती आहेत. या तिन्ही मूर्तीना फक्त डोळे, नाक, तोंड हे अवयव आहेत. या मूर्तीपैकी बलराम पांढऱ्या रंगाचा, सुभद्रा पिवळ्या रंगाची आणि जगन्नाथ काळ्या रंगाचा आहे. या मूर्ती रत्नाच्या सिंहासनावर सुप्रतिष्ठित केल्या आहेत.

जगन्नाथ विषयी एक वेगळी आख्यायिका आहे ती अशी आहे. युद्धानंतर जेव्हा श्रीकृष्णाने देहत्याग केला, तेव्हा त्याचा नाभिप्रदेश चितेत जळेना म्हणून तो भाग समुद्रात सोडण्यात आला. तो भाग वाहात वाहात इंद्रद्युम्न राजा तप करीत होता, त्या नीलाचल जवळील किनाऱ्याला लागला. राजाला स्वप्नदृष्टांत झाला व देवाने आदेश दिला की.

‘माझ्या देहाचा हा अवशेष लाकडी मूर्तीत बसवून त्या मूर्तीची स्थापना करुन उपासना कर.’ राजाने स्वप्नदृष्टांताप्रमाणे मूर्ती घडवून तिची स्थापना केली. तीच ही जगन्नाथ मूर्ती होय. ‘सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण’ कारण नेहमीप्रमाणे येथे पाषाणाचा सुबक, भावपूर्ण व मनोहारी मूर्ती नसून येथील बलराम, सुभद्रा व श्रीकृष्ण यांच्या मूर्ती काष्ठाच्या असून त्यांचे हात भुंडे आहेत.

तरीसुद्धा भाविक श्रद्धेने दर्शनाला व रथयात्रेचा सोहळा पाहाण्यासाठी येतात. या देवांच्या काष्टमूर्ती सुमारे वीस वर्षातून येणाऱ्या अधिक आषाढात नवीन बनतात. त्याला नवकलेवर महोत्सव म्हणतात. जुन्या मूर्तीचे विसर्जन मंदिराच्या आवारात असलेल्या ‘कैवल्य वैकुंठात’ करतात. वायू पुराणानुसार पुरी हे पितृतीर्थ असून तेथे श्राद्ध केले जाते. नारद पुराणात जगन्नाथाचे दर्शन ज्येष्ठ शुद्ध द्वादशीला करावे असे म्हटले आहे. ब्रह्मपुराणाने या तीर्थक्षेत्राला सर्वोत्तम म्हटले आहे. भारतातील चारधाम तीर्थक्षेत्रे एकात्मतेची प्रतिके आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: