मुलाचे पाय पाळण्यात दिसतात
शिवाजी महाराजांचा जन्म किल्ले शिवनेरी येथे झाला. शिवनेरीवरील शिवाई देवीच्या कृपाशीर्वादाने, नवससायासाने जिजाबाईंना हा मुलगा झाला; म्हणून त्याचे नाव ‘शिवाजी’ असे ठेवले. शिवाजी दिसामासी तिळातिळाने, कलाकलांनी वाढू लागला. जिजाऊंचा तो विसावा. त्या त्याला ‘शिवबा’ या नावानेच हाक मारीत असत. शिवबा गुटगुटीत, गोजिरवाणा होता. हसरा, खेळकर शिवबा गडावर सगळ्यांना अतिशय आवडत असे. शिवबाचे उष्टावण झाले. शिवबा रांगू लागला. घराचा उंबरठा ओलांडून अंगणात जाऊ लागला. खाऊ पिऊ लागला.
जिजाऊंची व दासींची नजर चुकवून तोंडात मातीचा बोकणा भरू लागला. बालशिवाजीच्या लीला शिवनेरीवर सुरू झाल्या. तो पाचूंच्या भूमीवर पडलेले स्वत:चे प्रतिबिंब पकडण्याचा प्रयत्न करीत असे. ते सापडत नसल्याने रडू लागे व दासींना ते पकडून देण्यास सांगत असे. तो वाड्याच्या अंगणात रांगत असता त्याच्या पायांतील रत्नांच्या चाळांचा छुमछुम आवाज ऐकताना जिजाऊंना खूप आनंद होत असे. बालशिवाजी आता दुडुदुडु चालू लागला. दासीच्या मुखातून बाहेर पडणारे शब्द तो शिकू लागला, बोलू लागला. शिवबा आता धावू लागला.
धावता धावता पडू लागला व पडतां पडतां धावू लागला. जिजाऊंनी शिवबाला खेळण्यासाठी मातीचे हत्ती, घोडे दिले. शिवबा त्या खेळण्यांशी खेळू लागला. ‘हा माझा हत्ती. मी या हत्तीवर बसणार! मी या घोड्यावर बसणार!’ असे तो बोलू लागला की, सगळ्यांना गंमत वाटत असे. आज मातीच्या हत्ती घोड्यांशी खेळणारा माझा शिवबा उद्या तो खरोखरच आपल्या दारी खरेखरे हत्ती घोडे ठेवेल असे जिजाऊंना वाटत होते. गडावर मोर होते. पोपट होते. कोकीळ होते. शिवबा त्यांच्या आवाजाची अगदी हुबेहुब नक्कल करीत असे. हत्तींच्या ओरडण्याची, घोड्यांच्या खिंकाळण्याची, वाघांच्या डरकाळीचीही तो नक्कल करीत असे.
नई शिवबाला खेळायला गडावर लहान लहान खेळगडीही मिळाले. तो आपल्या मित्रांच्या बरोबर लपाछपी, आंधळी कोशिंबीर, पकडापकडी खेळत असे. कधीकधी गडावर कुस्त्यांचा फड रंगत असे. रात्रीच्या वेळी जिजामाता शिवबाला रामायण, महाभारतातील श्रीराम, हनुमान, भीम, अर्जुन, श्रीकृष्ण यांच्या गोष्टी सांगत असत. शिवबा त्या गोष्टी अगदी मन लावून ऐकत असे. त्या कथा ऐकता ऐकता त्याची चर्या बदलत असे. ‘आपणही या युगपुरुषांप्रमाणे व्हावे, अतुल पराक्रम करावा, दुष्टदुर्जनांचा नाश करावा, अन्यायाविरुद्ध लढावे’ असे त्याला वाटत असे.
शिवबा व त्याच्या बाळगोपाळ सवंगड्यांचा आवडता खेळ म्हणजे मातीच्या गडकिल्ल्यांचा! तो आपल्या मित्रांबरोबर मातीचे किल्ले तयार करायचा. त्या किल्ल्यांवर ध्वज लावायचा. ‘मग हा गड माझा, हा गड तुझा’ अशी गडांची वाटणी होत असे. ‘ मित्र, शत्रू असे खोटेच गट तयार होत. गड जिंकण्यावरून त्यांच्यात लुटुपुटुच्या लढाया होत. लढाईसाठी हत्ती, घोडे तयार होत. लढाईत हत्ती, घोडे, योद्धे जखमी होऊन मरत. अर्थात, हे सगळे खोटे खोटेच. लढाईत मरण पावलेले हत्ती, घोडे, योद्धे थोड्याच वेळात जिवंत होऊन उठत. ‘हर हर महादेव’ अशा गर्जना होत.
कधीकधी शिवबा स्वत: राजा होत असे. दगडावर दगड ठेवून राजसिंहासन तयार होत असे. शिवबा त्या सिंहासनावर बसत असे. त्यांच्या भोवती बाळगोपाळ सैनिक म्हणून बसत आणि बालराजे त्यांना आज्ञा करीत असत. ‘मुलाचे पाय पाळण्यात दिसतात’ असे म्हणतात ते खरे आहे. मुलगा मोठेपणी कोण होणार, काय करणार हे त्याच्या लहानपणीच्या कृतीवरून, हालचालींवरून समजते. शिवरायांनी मोठेपणी अपार कष्ट करून, अतुल पराक्रम गाजवून शत्रूला चारीमुंड्या चीत करून अक्षरश: शून्यातून स्वकीयांचे, रयतेचे ‘हिंदवी स्वराज्य निर्माण केले. त्याचे बीजारोपण त्यांच्या बालपणातच झालेले होते.
जिजामाता शिवबांच्या ह्या बाललीला दररोज पाहत होत्या. या मातृदृष्टीत फार मोठ्या आकांक्षा अपेक्षा साठलेल्या होत्या. त्यांना मनोमन वाटत होते; नव्हे, खातरी वाटत होती, ‘आज ही मुले मातीचे दगडधोड्यांचे किल्ले, गड करीत आहेत, लुटूपुटुच्या लढाया करून गड, किल्ले जिंकीत आहेत, पण उद्या हीच मुले खरेखुरे किल्ले जिंकतील, नवीन किल्ले उभारतील…
मातीच्या हत्ती-घोड्यांनिशी ही मुले आज खोटीखोटीच युद्धे करीत आहेत, पण उद्या हीच मुले प्रत्यक्ष हत्ती-घोड्यांच्या फौजा घेऊन स्वाऱ्या करतील… तोफांचे धडाके सुरू करतील… माझा शिवबा उद्या खरोखरच स्वराज्याचे सिंहासन निर्माण करील! आज फुलपाखरांप्रमाणे बागडणारी ही मुले उद्या शक्तिशाली गरुड होतील! त्यांच्या भरारीला, पराक्रमाला आकाश कमी पडेल!’