मांढरदेवची काळूबाई
सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातल्या पश्चिमेस उंच डोंगरावर असलेले मांढरदेव येथील श्री काळेश्वरी देवी उर्फ काळूबाई हे संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक, व आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान तसेच कुलदेवता आहे. समुद्रसपाटीपासून साडेचार हजार फूट उंचीवर असलेले हे स्थान थंड हवेचे ठिकाण म्हणून विकसित होत आहे. वाई तालुक्यातील मांढरदेव गावाजवळ महादेवाच्या डोंगरावर श्री मांढरादेवीचे मंदिर आहे.
श्री मांढरादेव काळूबाई, कालिका किंवा काळेश्वरी या नांवानेही ओळखली जाते. मांढरादेवीचे मंदिर हेमाडपंथी असून ते बाराव्या किंवा तेराव्या शतकातील असावे असे संशोधकांचे म्हणणे आहे. मांढरादेवी डोंगरावर १९ किलोमीटर लांबीचे पठार असून पठाराच्या वायव्येस ६६० मीटर खोल दरी आहे. या मंदिरातील सभागृह १९२४ मध्ये बांधण्यात आले.
सभागृहात जो भव्य पितळी दरवाजा आहे, तो सन १९३७ मध्ये उभारला गेला. हे मंदिर पूर्वाभिमुख असून पुढे २ दीपमाळा आहेत. गाभाऱ्यात ही स्वयंभू काळेश्वरीची मूर्ती आहे. सिंहावरुन आलेली ही देवी येशे वसली आहे. डोक्यावर चांदीचा मुकुट आणि गळ्यात सोन्याचे लखलखते दागिने असणाऱ्या देवीला परण-वरणाचा नैवेद्य दाखवला जातो आणि दिवसातून तीन वेळा पूजा केली जाते. पौष पौर्णिमा हा मांढरादेवीच्या जत्रेचा प्रमुख दिवस असतो. महाराष्ट्राप्रमाणेच शेजारच्या राज्यांमधून लाखोभक्त यात्रेसाठी मांढरादेवीच्या दर्शनाला येत असतात.
साडेतीन शक्तिपीठांमध्ये मांढरादेवी क्षेत्राचा समावेश जरी केला गेला नसला तरी श्रद्धाळू भाविकांनी साडेतीन पीठासारखा दर्जा दिला आहे. सातारापासून वाईमार्गे ५५ कि.मी. अंतर असणाऱ्या या डोंगरावर जाण्यासाठी वाई व भोर या दोन्ही बाजूंनी पक्का घाट रस्ता असून रम्य गर्द वनराई मनाला वेगळा आनंद देऊन जाते.
मांढरादेव परिसरातून अंधश्रद्धेचे जवळजवळ उच्चाटन झाले आहे. नवसाला पावणारी म्हणून मांढरादेवी प्रसिद्ध आहे. जानेवारी २००५ रोजी यात्रेच्या मुख्यदिवशी येथे मोठी दुर्घटना घडून अनेक भक्तांना प्राण गमवावे लागले होते. आता यात्राकाळात दर्शनरांग व पायऱ्यांचे मजबूतीकरण, लोखंडी रेलींग, सुरक्षित कठडे, अशा उपयुक्त सुरक्षा योजना करण्यात आल्या आहेत.