कामधेनूचा पराक्रम

आपली भारतीय संस्कृती आपल्याला गोमातेला म्हणजेच गाईला देवता मानते. आता देवता म्हटली म्हणजे त्या देवतेच्या अंगी प्रचंड शक्ती, सामर्थ्य हे हवेच. खरं ना? मग वाचा तर, ही कामधेनूच्या पराक्रमाची गोष्ट! देव आणि दानव ह्या दोघांनी अमृतप्राप्तीसाठी जेव्हा समुद्रमंथन केले. तेव्हा त्या समुद्रमंथनातून जी चौदा रत्ने वर आली, त्यातील एक मौल्यवान आणि श्रेष्ठ रत्न म्हणजे कामधेनू! धेनू म्हणजे गाय आणि काम म्हणजे इच्छा ! जी मनातील इच्छा पूर्ण करते. हवी ती गोष्ट प्राप्त करून देते, तीच कामधेनू! सहस्रार्जुन नावाचा एक राजा एकदा भल्या मोठ्या सैनिकी ताफ्यासह एकदा शिकारीला गेला.

घोर जंगलात शिकार करून दमून-भागून राजा आणि त्याचे सैन्य परत येत असताना वाटेतच त्यांना जमदग्नीऋषींचा आश्रम लागला. तेव्हा जमदग्नी ऋषींचे दर्शन, त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी म्हणून राजा व सैनिक त्यांच्या आश्रमात गेले. राजाला असा अचानक आपल्या आश्रमात आलेला पाहून जमदग्नीऋषींना आनंद झाला. जमदग्नींनी राजाचे स्वागत तर केलेच पण ‘आपण सर्वांनी आज आमच्या इथून भोजन करून जावे’ अशी राजाला प्रार्थना केली. तेव्हा राजाला असे वाटले की, ‘ही ऋषी-मुनी मंडळी माझ्याच आश्रयावर जगणारी! त्यांना माझ्यासह इतक्या लोकांना भोजन देता येणं कसं शक्य आहे?’ तेव्हा तो सहस्त्रार्जुन राजा जमदग्नींना म्हणाला, “मुनीवर! अहो, आम्ही अनेक लोक आहोत.

तेव्हा आम्हा सर्वांसाठी भोजन बनविण्याचा त्रास तुम्हाला कशाला?” तेव्हा जमदग्नी राजाला म्हणाले, “राजन,त्याची चिंता तू करू नकोस. तुम्ही सर्व जण जाऊन नदीवरून स्नान करून या, तोवर भोजन तयार असेल.” राजा सहस्रार्जुनाला तो आग्रह मोडता येईना. त्याला नाही म्हणवेना आणि जशी आपली इच्छा’ असे म्हणून सर्व जण नदीवर स्नानाला गेले. इकडे जमदग्नीमुनी आणि त्यांची पत्नी रेणुका ह्यांनी “सर्वांना भोजन देण्यासाठी आमची इच्छा पूर्ण कर,” अशी प्रार्थना आश्रमातल्या कामधेनूला केली.

ऋषींची ती भोजन देण्याची प्रामाणिक इच्छा, त्यांचा विनय, उभयतांची प्रार्थना ऐकून कामधेनूने फक्त ‘तथास्तु’ असे म्हटले मात्र आणि…. आश्रमात भला थोरला मांडव पडला. आसने आणि पाने मांडली गेली. सर्व पाकसिद्धी काही क्षणातच झाली. सुग्रास अन्नाचा सर्वत्र सुवास येऊ लागला. थोड्या वेळातच स्नान करून आलेला राजा अन् अन्य सर्व सैनिकांना एकाच वेळी, एकाच जगी अन् अनेक प्रकारचे सुग्रास भोजन वाढले गेले. त्या भोजनाने सर्वांची तृप्ती झाली.

भोजनानंतर विडा-वेलदोडेही देऊन मुखशुद्धी करण्यात आली. तो सर्व प्रकार पाहून, प्रत्यक्ष अनुभवून राजा सहस्रार्जुन विचार करू लागला की, या मुनींना एवढ्या सर्व लोकांना, एवढ्याशा अल्पावधीत अन् एवढे सुंदर, सुग्रास भोजन देणे; हे कसे शक्य झाले? त्यांना अशी कोणती देवता प्रसन्न झाली आहे? – राजाने आपल्या मनातील ती शंका बोलून दाखवताच, सत्यवचनी, जमदग्नीऋषी राजाला म्हणाले, “राजा, अरे ह्यात आमचं ते काय? हा सर्व त्या कामधेनूचाच सारा प्रताप आहे.” ते शब्द ऐकले मात्र आणि… राजाला मोठे नवल वाटले. त्याचबरोबर त्या सहस्रार्जुनाच्या मनात असाही विचार आला की, अशी ही सामर्थ्यशाली धेनू ह्या मुनींकडे कशाला हवी? ती आपल्यालाच मिळावी.

झाले, राजाने जमदग्नी ऋषींकडे त्या कामधेनूची मागणी केली. पण त्यांनी मात्र त्या गोष्टीस स्पष्ट नकार दिला. राजाला तो नकार म्हणजे आपला उपमर्द, अवमान, अपमान वाटला. तो मुनींना रागावू, धमकावू अन् नाही नाही ते बोलू लागला, तरी ही जमदग्नी मात्र राजाला ती कामधेनू देण्यास काही तयार होईनात… तेव्हा राजाने आपल्या शक्ती-सामर्थ्याचा वापर करण्याचा प्रयत्न केला. त्याने आपल्या सैनिकांना ‘कामधेन्स ओढत घेऊन चला’, अशी आज्ञा दिली. झाले! ती राजाज्ञा मिळताच ते सैनिक पुढे सरसावले व शक्तिबलाचा वापर करून त्या कामधेनूस ओढून नेण्याचा प्रयत्न करू लागले. त्या वेळी अचानकपणे त्या कामधेनच्या अंगामधून शेकडो सैनिक बाहेर पडले आणि ते त्या सहस्रार्जुनाच्या सैनिकांशी युद्ध करू लागले.

राजाचे सैनिक त्या अचानक झालेल्या प्रतिकाराने घाबरले. राजाचे बरेच सैनिक मारले गेले. काही पळून गेले…. राजाचा पराभव झाला. राजा हतबल होऊन, निदान त्या वेळेपुरता तरी कामधेनूचा विचार सोडून देऊन आपल्या नगरीकडे परतला आणि दुसऱ्याच क्षणी कामधेनूच्या पोटामधून बाहेर आलेले ते सैनिक पुन्हा तिच्या पोटातच गुप्त झाले.

तात्पर्य : प्रत्येक गोष्ट ही शक्तीच्या बळावरच मिळवता येत नाही. तसेच जर आपली इच्छाशक्ती ही प्रबळ असेल, तर आपण संकटांवर मात करू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: