/dasara-information-in-marathi/
मथुरा नगरीत दाशार्ह नावाचा राजा राज्य करीत होता. तो पराक्रमी होता. अनेक राजे त्याची सत्ता मानीत. त्याच्या कीर्तीच्या पताका सगळीकडे फडकत होत्या. त्याच्या पत्नीवर त्याचे प्रेम होते. दाशाह राजाची पत्नी फारच सुंदर होती. तिचे नाव कलावती. तिचे नेत्र सुंदर होते. ओठ सुंदर होते. तिची चाल हंसासारखी डौलदार होती. तिचे दात शुभ्र हिरकण्यांसारखे चमकत. राजाला तिच्याकडे कितीही पाहिले तरी समाधान होत नसे.
एकदा राजाचे मन तिच्याकडे आकृष्ट झाले. त्याने तिला जवळ बोलावले. पण ती आली नाही. तेव्हा राजा उठून तिच्याजवळ गेला. राजा तिला मिठीत घेण्यास आतुर झाला होता. तो तिला म्हणाला, “कलावती माझ्याजवळ ये. आपले मिलन घडू दे. मला नाराज करू नकोस.” कलावती स्मित करत म्हणाली, “राजसा, आपण धीर धरा. आत्ता माझ्याजवळ येऊ नका.
मला स्पर्शही करू नका.” राजा म्हणाला, “असं का म्हणतेस? मी तुला आवडत नाही का?” कलावती म्हणाली, “आपण मला प्रिय आहात. पण यावेळी मला स्पर्श करू नका. कारण मी शिवशंकराचे व्रत करीत आहे. मी आपल्याबरोबर रममाण होऊ शकत नाही.” राजा म्हणाला, “कलावती, मला तर तू हवी आहेस.” कलावती म्हणाली, “गर्भवती, ऋतुमती, उपाशी किंवा व्रतस्त स्त्री मिलनाला योग्य नसते. मी व्रतस्त आहे.
आपण मला स्पर्श करू नये.” पण राणीचे बोलणे न ऐकता राजा पुढे झाला. त्याने कलावतीला आपल्या जवळ आढले व मिठीत घेतले. पण कलावतीचा स्पर्श होताच राजाचे अंग भाजून निघाले. राजा दूर झाला आणि कलावतीला विचारू लागला, “माझे अंग कशाने भाजले?” कलावती म्हणाली, “नाथ, दुर्वास ऋषींनी मला ‘नमः शिवाय’ हा पंचाक्षरी मंत्र दिला आहे. त्याचा मी दिवसरात्र जप करीत असते.
माझे शरीर अत्यंत शीतल आहे. आपणच जपतप, शंकराची पूजा यातले काहीही केले नाही. त्यामुळे माझ्या शरीराला स्पर्श करताच आपले अंग भाजून निघाले!” राजा म्हणाला, “कलावती, तू सद्गुणी आहेस. मलाही शिवमंत्र दे. मी त्याचा जप करीन.” कलावती म्हणाली, “मला आपणास मंत्र देण्याचा अधिकार नाही. धर्मशास्त्राप्रमाणे आपण माझे पती असल्याने आपणच माझे गुरू आहात.
आपण आपल्या कुळाचे गुरू गर्गमुनी यांच्याकडून उपदेश घ्यावा.’ दाशाह राजा राणीसह गर्गमुनींच्या आश्रमात गेला. गर्गमुनींना वंदन करून तो नम्रपणे म्हणाला, “मी तुम्हाला शरण आलो आहे. मला शिवमंत्र द्यावा.” गर्गमुनींना राजाची दया आली. ते राजाला नदीवर घेऊन गेले. त्याला नदीत स्नान करण्यास सांगितले व राजाकडून त्यांनी शिवशंकराची पूजा करून घेतली.
नंतर गर्गमुनींनी राजाच्या मस्तकावर हात ठेवून ‘ॐ नमः शिवाय’ हा षडाक्षरी मंत्र दिला. मंत्राचे शब्द राजाच्या कानी पडताच त्याच्या शरीरातून शेकडो कावळे कर्कश ओरडत बाहेर पडले. राजाच्या शरीराची आग सहन न होऊन कित्येक कावळ्यांचे पंख जळाले. काही कावळे बाहेर पडता पडता भस्मसात झाले. राजा आश्चर्याने पाहत राहिला. तेव्हा गर्गमुनी म्हणाले, “राजा, हे जळलेले कावळे म्हणजे तुझी मोठमोठी पापे.
तुझी पापे आता शिवनामाच्या प्रभावाने नष्ट झाली.” राजा म्हणाला, “मी दुराचारी होतो. स्त्रीलंपट होतो. मी कर्मभ्रष्ट होतो. अनेक जन्मांतील पापे मला आठवताहेत. माझे भाग्य थोर म्हणून तुमची गुरुकृपा झाली. माझा उद्धार झाला.” गर्गमुनींना वंदन करून राजाराणी मथुरा नगरीत परतले. राजा षडाक्षरी शिवमंत्राचा नित्य जप करू लागला व तो कलावतीबरोबर सुखाने राज्य करू लागला. दाशार्ह राजाची कथा जे ऐकतील, लिहितील व पठण करतील त्यांचाही संसार सुखाचा होईल. शिवशंकर त्यांचे जीवन सफल करील.