बुद्ध पौर्णिमा माहिती, इतिहास मराठी | Buddha Purnima Information in Marathi
हॅलो मित्रांनो कशे आहात तुम्ही आज मी तुम्हाला बुद्ध पौर्णिमा माहिती, इतिहास मराठी | Buddha Purnima Information in Marathi सांगणार आहे तर चला बघुयात.
आणखी वाचा – श्री नृसिंह जयंती
बुद्ध पौर्णिमा मराठी | Buddha Purnima Information in Marathi
“आपल्या मनातील शत्रुत्वाची भावना नष्ट करा. हिंसा, चोरी, व्यभिचार, असत्य भाषण, मद्यपान करू नका. कुणाचीही निंदा करू नका. कठोर बोलू नका. न्यायनीतीने वागा.” अखिल मानव जातीला असा अत्यंत मोलाचा उपदेश करणारे भगवान गौतम बुद्ध बौद्ध संप्रदायाचे (धर्माचे) संस्थापक आहेत. वैशाख पौर्णिमा हा दिवस बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो.
वैशाख पौर्णिमेला बुद्धांच्या जीवनात अगदी आगळेवेगळे महत्त्व आहे. गौतम बुद्धांचा जन्म झाला वैशाख पौर्णिमेला. त्यांना ज्ञानप्राप्ती झाली ती वैशाख पौर्णिमेला व त्यांनी आपला देहत्याग केला तोही वैशाख पौर्णिमेला! म्हणून या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा असे म्हणतात. इ. स. पूर्व ६२३ मध्ये वैशाख पौर्णिमेला कपिलवस्तूचा राजा शुद्धोदन व राणी मायावती यांना एक पुत्र झाला. त्याचे नाव सिद्धार्थ. सिद्धार्थाच्या जन्मानंतर सातच दिवसांनी मायावती मृत्यू पावली. सिद्धार्थाची मावशी-सावत्र आई गौतमी हिने त्याचे लालनपालन केले, म्हणून त्याला गौतम असे नाव प्राप्त झाले.
सिद्धार्थ घरदार सोडून जाऊ नये म्हणून राजाने सर्व प्रकारची काळजी घेतली. त्याला दुःखाचा वाराही लागू दिला नाही. त्याला राज्यकारभाराचे, युद्धकलेचे शिक्षण दिले. परंतु युद्धात लोकांना मारणे सिद्धार्थाला आवडत नसे. तो अत्यंत कोमल अंतःकरणाचा होता. दुसऱ्याचे दुःख पाहून त्याच्या डोळ्यांत टचकन पाणी येई. तो तासन् तास चिंतन करीत बसे. सिद्धार्थ विरक्त बनेल, घरदार सोडून जाईल या भीतीने राजा शुद्धोदनाने त्याचे यशोधरा नावाच्या रूपवती व गुणवती मुलीशी लग्न करून दिले.
सिद्धार्थाला यशोधरेपासून एक मुलगा झाला. त्याचे नाव राहुल. सिद्धार्थ आता संसारात रमला आहे असे राजाला वाटले. परंतु तसे घडावयाचे नव्हतेच. एके दिवशी सिद्धार्थ गौतम रथात बसून राजरस्त्यावरून जात होता. रस्त्यावर एक महारोगी तळमळत पडला होता. त्याच्या झडलेल्या बोटांतून रक्त गळत होते. ते पाहून सिद्धार्थ खिन्न झाला. मानवी जीवनानात अशीच दुःखे येत असतात असे त्याला वाटू लागले. पुढे काही अंतरावर एक अत्यंत वाकलेला म्हातारा माणूस काठी टेकत टेकत जात असलेला दिसला. सिद्धार्थ अधिकच विषण्ण झाला. हेच ते म्हातारपण.
प्रत्येकाच्या आयुष्यात ते येणारच, असा विचार करीत त्याने आपल्या शरीराकडे पाहिले. पुढे एक प्रेतयात्रा दिसली. ती पाहून सिद्धार्थ स्वतःशीच म्हणाला- प्रत्येकाला, अगदी मलासुद्धा मरण येणारच… सिद्धार्थाच्या मनावर या दृश्यांचा फार खोल परिणाम झाला. हे जग दुःखाने भरलेले आहे. सगळे काही क्षणभंगुर आहे, असा विचार करून या जगातील दुःख कसे नाहीसे करता येईल याचा शोध घेण्यासाठी गृहत्याग करण्याचा निश्चय त्याने केला. आणि एके दिवशी आषाढी पौर्णिमेच्या मध्यरात्री घरादाराचा, राजवैभवाचा, आपल्या पत्नीचा व मुलाचा त्याग करून सिद्धार्थ सत्यज्ञानाच्या शोधासाठी वनात निघून गेला.
त्या वेळी त्याचे वय २९ होते. त्याने अनपाण्याचा त्याग करून कठोर तपश्चर्या सुरू केली. त्याचे शरीर अत्यंत कृश व दुबळे बनले. पण दुःखातून सुटण्याचा मार्ग त्याला सापडत नव्हता. अशी सात वर्षे खडतर तपश्चर्या चालू होती. त्या दिवशी वैशाख पौर्णिमा होती. सिद्धार्थ निरंजना नदीच्या काठावरील पिंपळाच्या झाडाखाली-बोधिवृक्षाखाली चिंतन करीत बसला होता. आणि एकाएकी त्याला ज्ञानाचा प्रकाश दिसला. त्याला सत्यज्ञान झाले. माणसाची लालसा, वासना हेच दुःखाचे मूळ आहे.
अभिलाषा नष्ट केली की मनुष्य दुःखमुक्त होईल. बोधिवृक्षाखाली सिद्धार्थाला हे ज्ञान झाले, म्हणून त्याला बुद्ध म्हणतात. आता गौतम बुद्धाचे सगळे दुःख संपले होते. तो पूर्णज्ञानी झाला. त्याला अनेक शिष्य मिळाले. त्याने एका नवीन धर्माची-संप्रदायाची स्थापना केली. तो म्हणजे बौद्ध धर्म. त्या वेळी गौतम बुद्धाचे वय ३५-३६ होते. त्याने देशभर फिरून अहिंसा, सत्य व प्रेम या तत्त्वांचा अगदी सोप्या भाषेत सर्वांना उपदेश केला.
त्याला हजारो अनुयायी मिळाले. सर्व जगाला प्रेम, मैत्री व शांती यांचा संदेश देऊन वयाच्या ८०व्या वर्षी वैशाख पौर्णिमेला कुशीनगर येथे गौतम कदांनी देहत्याग केला. वैशाख पौर्णिमेला म्हणजे बुद्ध पौर्णिमेला बौद्ध धर्माचे लोक बुद्धविहारात-बुद्धमंदिरात भावान बुद्धांची प्रार्थना करतात. त्यांच्या उपदेशाचे-संदेशाचे चिंतन-मनन करतात.
काय शिकलात?
आज आपण बुद्ध पौर्णिमा माहिती, इतिहास मराठी | Buddha Purnima Information in Marathi पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.