भर दरबारात असह्य अपमान
शनिवार दि. १२ मे रोजी शिवाजी महाराज संभाजीराजांसह सकाळी बादशहा औरंगजेबापुढे आले. ठरलेल्या वेळेपेक्षा त्यांना उशीर झाला होता; त्यामुळे त्या प्रसंगाचा ‘दिवाण-इ-आम’चा दरबार आटपून औरंगजेब ‘दिवाण-इ-खास’ मध्ये बसला होता. शिवाजीराजे येत असल्याची वर्दी औरंगजेबास समजली. त्याने शिवाजी महाराजांना दरबारात घेऊन येण्याची असदखानास आज्ञा केली. बक्षी असदखान महाराजांपाशी आला व त्याने महाराजांना दरबारात चलण्याची विनंती केली. महाराज, संभाजीराजे, रामसिंग व मुखलीसखान घुशलखान्यात आले. तेथील दरबारात फक्त औरंगजेब बसला होता.
बाकी सर्व दरबारी मंडळी आपापल्या जागी उभी होती. तो दरबाराचा रिवाजच होता. महाराज व संभाजीराजे औरंगजेबासमोर गेले. औरंगजेबाने त्यांना पाहिले. तो मनात म्हणाला, हाच तो शिवाजी भोसला! आमचा दुश्मन ! शिवाजी महाराजांनी रिवाजाप्रमाणे १५०० मोहरांचा नजराणा व एक हजार रुपयांचा निसार म्हणजे ओवाळणी ठेवून तीन वेळा प्रणाम केला. बक्षी असदखानाने महाराजांची व शंभुराजांची औरंगजेबाला ओळख करून दिली, पण औरंगजेबाने त्यांच्या स्वागतार्थ साधा शिष्टाचार म्हणून एक शब्द सुद्धा उच्चारला नाही. औरंगजेबाच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा भाव नव्हता.
अगदी निर्विकार! याचे नाव औरंगजेब! यानंतर लगेच औरंगजेबाने अगोदरच ठरवून ठेवल्याप्रमाणे महाराजांना व शंभूराजांना खूप पाठीमागे ताहीरखानासारख्या पंचहजारी सामान्य सरदारांच्या रांगेत नेऊन दाटीवाटीने उभे केले. औरंगजेबाने अगदी जाणूनबुजून ही उपेक्षा केली होती. अगदी आग्ऱ्याच्या सीमेवरील स्वागतापासून त्याने महाराजांचा अपमान सुरू केला होता. या उपेक्षेने, अपमानाने महाराजांचे मस्तक पेटून उठले. थोड्याच वेळात दरबारात पानसुपारीचे तबक फिरले. महाराजांना पानविडा मिळाला. मग खिलत म्हणजे मानाचे पोशाख वाटण्यात आले. वजीर जाफरखानास पोशाख दिले.
महाराजांच्या पुढच्या रांगेत पाठमोरा उभ्या असलेल्या एका सरदारालाही पोशाख दिले. या सरदाराचे नाव महाराजा जसवंतसिंग राठोड. महाराजांनाही मानाचा पोशाख द्यावयास हवा होता, पण तो न देऊन औरंगजेबाने त्यांचा ठरवून अपमान केला. औरंगजेबाने वचन मोडून आपला अपमान केला अशी महाराजांची खातरीच पटली. शहाजाद्यांप्रमाणे दरबारात महाराजांचा मान राहावा असा पूर्वीचा ठराव होता. त्याविरुद्ध भरदरबारात असा आपला अपमान बादशहाने केल्यामुळे महाराजांना भयंकर राग आला.
आपल्यासारख्या स्वाभिमानी, कर्तृत्ववान, पराक्रमी राजाला पंचहजारी अशा सामान्य सरदारांच्या रांगेत उभे केले आहे हे पाहून महाराज कमालीचे संतापले. संतापाने त्यांच्या डोळ्यांत पाणी तरारले. दुःख आणि राग अनावर झाला आणि रामसिंगाकडे नजर फेकून महाराज कडाडले, “रामसिंग, आमच्या समोर हा कोण उभा आहे?” महाराजांची ती गर्जना ऐकताच सगळा दरबार भयचकित झाला. डोळे विस्फारून महाराजांकडे पाहू लागला. बापरे! बादशहाच्या दरबारात ही गर्जना? या दरबारात कोणीच बोलत नाही.
बोलायचेच नसते. बोलले तर या कानाचे त्या कानाला ऐकू जात नाही आणि आज ही गर्जना? महाराजांनी दरडावून विचारले, “आमच्या समोर हा कोण उभा आहे?” अडीच हजारी सरदारांच्या रांगेत उभा असलेला रामसिंग घाबरून धावत धावत आला व महाराजांना समजावीत म्हणाला, “हे महाराज जसवंतसिंग आहेत.’ “काय? जसवंतसिंग?” महाराज कडाडले. “अनेकवेळा मराठ्यांचा मार खाऊन पळत सुटलेला हा जसवंतसिंग? आणि हा माझ्या पुढच्या रांगेत उभा? तुझा बादशहा मला जसवंतसिंगापेक्षाही कमी लेखतो?” पृथ्वीने आपल्याला पोटात घेतले तर बरे होईल असे रामसिंगाला वाटू लागले.
काय करावे त्याला समजेना. त्याचा चेहरा पार पडला. तो महाराजांना शांत करू लागला असता महाराज अधिकच चिडून म्हणाले, “रामसिंग, हे काय चालले आहे ? आज माझा मुलगा शंभूसुद्धा पंचहजारी मनसबदार आह. माझा नोकर नेताजी पालकरसुद्धा एवढ्याच दर्जाचा आहे आणि मी स्वत: एवढ्याच दर्जाचा आहे? मी स्वत: इतक्या खालच्या दर्जाचा मनसबदार म्हणून येथे आलो आहे काय?” महाराजांचा हा संताप पाहून दरबारात चुळबूळ सुरू झाली. कित्येकांनी महाराजांचे मनातल्या मनात कौतुक केले, तर कित्येकांना महाराजांचा हा उद्धटपणा पाहून राग आला.
महाराजांचे संतप्त शब्द औरंगजेबाच्या कानावर आले. त्याने रामसिंगाला बोलावून विचारले, “शिवाला विचार, इतके बिघडण्याचे कारण काय?” म्हणजे औरंगजेबाच्या दृष्टीने विशेष असे काही घडलेच नाही. रामसिंग पुन्हा महाराजांच्या जवळ आला तेव्हा महाराज रामसिंगास पुन्हा म्हणाले, “रामसिंग, मी कोण आहे? कोणत्या तोलाचा माणूस आहे. हे तुला माहीत आहे आणि तुझ्या या बादशहालाही चांगले माहीत आहे. तुझ्या पित्यालाही माहीत आहे आणि तरी देखील मला इतका वेळ कुठेतरी कोपऱ्यात उभे केले आहे.
याचा अर्थ काय ? मला तुमची ती मनसब नको आणि काही नको.” इतके बोलून महाराज औरंगजेबाकडे पाठ करून बाहेर पडले. रामसिंग हात धरून त्यांना थांबवू लागला, पण त्याचा हात झिडकारून महाराज बाजूला गेले. रामसिंग त्यांची समजूत घालू लागला. महाराजांचा नेहमीचा संयम सुटला. अपमान असह्य झालेले महाराज म्हणाले, “यापेक्षा मेलेले काय वाईट? ठार करा मला. नाहीतर मीच माझा घात करून घेतो. माझी मान कापली तरी मी पुन्हा तुझ्या बादशहापुढे जाणार नाही.” रामसिंगाने औरंगजेबाला हे सांगितले असता तो शुद्धीवर आला त्याने मुलफतखान, आफिलखान व मुखालीसखान या तीन सरदारांना सांगितले, “शिवाकडे जा. त्याला खिलत द्या व त्याची समजूत घालून पुढे आणा.”
महाराज त्या सरदारांना म्हणाले, “मी खिलत घेणार नाही. माझा जाणूनबुजून अपमान केला आहे. माझा दर्जा तुम्ही काय समजता? मला तुमच्या बादशहाची मनसब नको. मी कोणाचा नोकर होणार नाही. हवे तर मला ठार मारा. नाहीतर कैदेत टाका.” मग रामसिंग महाराजांना आपल्या निवासस्थानी घेऊन गेला. तेथे एकांतात त्यांचे मन वळविण्याचा त्याने खूप प्रयत्न केला, पण महाराजांनी त्याचे काही एक मानले नाही. दुसरे दिवशी औरंगजेबाने रामसिंगाला विचारले, “शिवा आज दरबारात येणार आहे का?” “शिवाजीला ताप आला आहे. आज ते येणार नाही.”
असे रामसिंगाने सांगितले. औरंगजेब काय समजायचे ते समजला. संध्याकाळी रामसिंग शंभूराजांना दरबारात घेऊन आला. बादशहाने त्याला पोशाख, रत्नजडित कट्यार आणि मोत्यांचा कंठा दिला. मिा राजांनी औरंगजेबास कळविले, “शिवाजीस विनाकारण दुखवू नये. अपाय केल्यास वाईट परिणाम होईल. वचन मोडून त्याला शिक्षा करणे राज्यास बाधक झाल्याशिवाय राहणार नाही.” अर्थात मिझाराजाचा हा इशारा औरंगजेबाला रुचला नाही. दरम्यान दरबारात, लोकांत, आत, बाहेर एकसारखा शिवाजी हा एकच विषय चर्चिला जात होता व जो तो आपापल्यापरीने तर्ककुतर्क चालवत होता.