हिंदूंच्या गौरवाचे स्थान अयोध्या

अयोध्याचे माहात्म्य वर्णन करताना म्हटले आहे की, श्रीरामाचे अयोध्यातील मार्गावरुन मनुष्य यात्रार्थ जितका मार्ग चालून जाईल तितके त्याला पावलोपावली अश्वमेघ यज्ञ करण्याचे फल प्राप्त होते. शरयू नदीच्या उत्तर तीरावर वसलेल्या या नगरीचे वर्णन वाल्मिकी रामायणात वाचावयास मिळते. मनूने ही नगरी स्वतः निर्माण केली. पुढे मनुचा पुत्र इक्ष्वाकू अयोध्येच्या सिंहासनावर बसला.

श्रीरामपूर्वीच्या अनेक सूर्यवंशी राजांची ही राजधानी होती. अयोध्येचा उल्लेख अथर्ववेदात आहे. यावरुन ही नगरी अतिप्राचीन आहे. ‘अयुद्ध’ म्हणजे जिंकून घेण्यास कठीण यावरुन ‘अयोध्या’ हा शब्द तयार झाला. इक्ष्वाकू (सूर्यवंशी) वंशी राजांच्या कोसल देशाची राजधानी अयोध्याच होय. प्रभू श्री रामचंद्रांची जन्मभूमी. त्यांच्या निवासाने इथल्या मातीचा प्रत्येक कण पवित्र झाला.

सूर्यवंशाच्या राजांनी हिचे वैभव आणि प्रतिष्ठा वाढवली. मोठमोठ्या प्रासादांनी तिला शोभा आणली. श्रीरामाच्या काळी ऐश्वर्यसंपन्न अशी ही नगरी दिमाखाने तळपत होती. श्रीरामानंतर अयोध्येस अवकळा आली. तिचे वैभव नष्ट झाले. आता नवी नगरी उभी राहिली. त्या सगळ्याला साक्षी शरयू नदी आहे. या शरयू नदीतच शेषावतार लक्ष्मणाने प्रवेश करुन आपले अवतार कार्य संपवले. तसेच आपले अवतारकार्य पूर्ण झाले आहे हे लक्षात घेऊन श्रीराम शरयूत प्रवेश करुन वैष्णवतेजात विलीन झाले. ते स्थान स्वर्गद्वार म्हणून प्रसिद्ध आहे. मंदिर स्थापनेमागे एक ऐतिहासिक घटना आहे ती अशी.

उज्जैयिनीच्या विक्रमादित्य राजा श्री रामचंद्रांच्या जन्मभूमीचा शोध घेण्यासाठी अयोध्येला आला आणि शरयूकाठी विचार करीत बसला. तेथे त्याला दिव्यरुपाने घोड्यावर बसून आलेल्या तीर्थराज प्रयाग’चे दर्शन घडले व त्याने राजाला सांगितले की, श्री रामजन्मस्थानाची माहिती तुला काशीविश्वनाथाकडून मिळेल. त्याप्रमाणे राजा काशीस गेला व विश्वनाथाचे दर्शन घेऊन श्री रामजन्मभूमीची माहिती देण्याबद्दल प्रार्थना केली.

तेव्हा भगवान म्हणाले, ‘मी तुला कामधेनू देतो. ती घेऊन तू अयोध्येस जा व शरयूकाठी चरण्यास सोड व जेथे तिच्या स्तनांतून दूध गळेल तेथेच मर्यादापुरुषोत्तम श्रीरामाचा जन्म झाला आहे असे समज.’ त्याप्रमाणे जन्मस्थानाचा पत्ता लावून राजाने तेथे मंदिर बांधले. अयोध्येतील श्री राममंदिर हे हिंदूंच्या श्रद्धेचा विषय आहे. इ. स. पू. १५० मध्ये अयोध्येवर पहिले विदेशी आक्रमण झाले.

तद्नंतर अयोध्येचे स्वातंत्र्य राखण्यासाठी ७९ लढाया झाल्या. बाबर ते औरंगजेब यांच्या कालखंडातच बहुसंख्य लढाया झाल्या. श्री राममंदिर पाडून तिथे बाबरी ढाचा उभारला. रामजन्मभूमीवरील हा कलंक दूर करण्यासाठी तेथे श्री राममंदिर निर्माण व्हावे म्हणून कायदेशीर प्रयत्न केले. पुढे बऱ्याच घटना घडल्या. – शेवटी ९/११/१९८९ रोजी रामजन्मभूमी मुक्ती यज्ञ समितीने विवाद्य जागेवर शिलान्यास केला.

पुढे कारसेवक रामभक्तांनी बाबरी ढाचा धुळीस मिळवला. बाबरी ढाचा हा रामजन्मभूमीवरच उभारला गेला. याचे असंख्य पुरावे देण्यात आले. ६ डिसेंबर १९९२ पासून श्रीरामाचे छोटे मंदिर जन्मभूमीच्या जागी असून न्यायालयाने ५७ फूटांवरुन नऊ इंचावरुन राममूर्तीचे दर्शन घेण्याची परवानगी दिली आहे. शरयू नदी किनाऱ्यावर अनेक पक्के घाट बांधले आहेत. भाविकांसाठी धर्मशाळा आहेत.

श्रीरामनवमीच्या दिवशी मोठी जत्रा भरते. श्रावणशुक्ल पक्षात ८-९ दिवसाचा ‘झुलेका मेला’ असतो. कार्तिक पौर्णिमेला अनेक भाविक शरयू नदीच्या स्नानासाठी येतात. अयोध्येच्या आत आणि परिसरात अनेक तीर्थेव मंदिरे आहेत. अयोध्येला जाण्यासाठी मुंबईहून थेट अलाहाबादपर्यंत रेल्वेने व तेथून फैजाबादला उतरावे. फैजाबाद-अयोध्या अंतर ५ मैल आहे. प्रयागपासून अयोध्या १६० कि.मी. आहे. तर काशीपासून १९२ कि.मी. आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: