25 Marathi Suvichar with Meaning

हॅलो वाचकांनो.. आज मी तुम्हाला 25 Marathi Suvichar with Meaning देणार आहे. तर चला बघुयात मराठी सुविचार आणि त्यांचा अर्थ.

१] मदतीचा हात तुमच्या मनगटाजवळ असतो. (हेन्री फोर्ड)
यशस्वी होण्यासाठी जे सामर्थ्य लागते ते आपल्यातच असते. देवावर दैवावर अथवा दुसऱ्यावर अवलंबून न राहता जो स्वतःवर अवलंबून राहतो तोच पराक्रम करतो. जो दुसऱ्यावर विसंबतो त्याचा कार्यभाग बुडतो. आत्मनिर्भर होऊन स्वतःच स्वतःचा विकास घडवून आणावा.

२] धर्माचं भांडण धर्माशी नसतं, अधर्माशी असतं. (रामकृष्ण परमहंस)
निरनिराळे धर्म म्हणजे पूर्णत्वाकडे जाणाऱ्या वेगवेगळ्या वाटा. सर्व नद्या ज्याप्रमाणे समुद्राला मिळतात त्याचप्रमाणे सर्व धर्म ईश्वराकडे नेतात. तेव्हा धर्माचा झगडा धर्माशी असूच शकत नाही. ते अज्ञानाचं लक्षण आहे. धर्माचं भांडण अधर्म व अनीती बरोबर असतं.

३] जीवन म्हणजे प्रेम, ज्ञान आणि शक्ती यांचा योग. (साने गुरुजी)
जीवन सुंदर व संपन्न करण्यासाठी तीन गुणांची गरज असते, ते तीन गुण म्हणजे प्रेम, ज्ञान आणि शक्ती. प्रेम म्हणजे हृदयाचा विकास, ज्ञान म्हणजे बुद्धीचा विकास. शक्ती म्हणजे शरीराचा विकास. तीनही गोष्टी ज्याच्यापाशी असतात त्याचं जीवन कृतार्थ बनतं.

४] अहिंसेसारखे श्रेष्ठ शस्त्र नाही. (महात्मा गांधी)
हिंसेचा प्रतिकार हिंसेने केल्यास हिंसा आणखी वाढते. ती कमी होत नाही. अहिंसा किंवा अप्रतिकार यांनीच हिंसेचं शमन शक्य असतं . अहिंसा म्हणजे अमर्याद प्रेम आणि उदारता, प्रेमानं जग जिंकता येतं म्हणून अहिंसा हे पृथ्वीवरील सर्वात मोठं शस्त्र आहे.

५] न मातुःपरदैवतम् । (महाभारत)
आईसारखे दुसरे श्रेष्ठ दैवत नाही. ईश्वराच्या अपार प्रेमाची कल्पना आईच्या प्रेमावरून येते . ईश्वराला ‘आई’ म्हणून हाक मारणं किंवा आईला ईश्वर म्हणून समजणं यासारखी दुसरी गोष्ट नाही. आईचे उपकार कधीच फिटत नसतात. त्या उपकारांच स्मरण म्हणजेच ईश्वराचं स्मरण होय.

६] पापाचा द्वेष करा, पापी माणसाचा नको. (बायबल)
एखादा माणूस परिस्थितीमुळे गुन्हा करतो. परंतु ‘गुन्हेगारी’ हा कलंक त्याला कायमचा लागतो. गुन्हेगार, गुन्हेगार म्हणून सर्व जण त्याच्याकडे बोट दाखवितात. त्यामुळे इच्छा असूनही त्याला सुधारण्याची संधी मिळत नाही. पापाचा तिरस्कार करावा पण पापी माणसाला सुधारावं.

७] असंतोषः श्रियो मूलम
असंतोषः हे सर्व सुधारणांचं मूळ आहे. जो थांबतो तो संपतो. उलट धावणाऱ्याला शक्ती येते. नवीन रस्ता सापडतो. आहे ते ठीक आहे असं म्हणणाऱ्याची प्रगती खुंटते. अल्पसंतुष्टतेनं स्वस्थ बसू नये. तसेच आहे ते पुष्कळ आहे असं म्हणूनही गप्प बसू नये. प्रगतीसाठी असंतोष व धडपड करणं आवश्यक असतं.

८] संग जया जैसा, लाभ तया तैसा, (संत तुकाराम)
संगत निवडताना चांगली निवडावी. सज्जनांची संगत चांगली. फुलांच्या संगतीनं मातीलाही सुगंध प्राप्त होतो. त्याचप्रमाणे सज्जनांच्या सहवासात दुर्जनदेखील सज्जन बनतात. माणूस त्याच्या मित्रांवरून ओळखला जातो. म्हणूनच संत तुकाराम म्हणतात संग जया जैसा, लाभ तया तैसा ।

९] संकटांना पाठ दाखविली की ती अधिकच पाठीशी लागतात. (यशवंतराव चव्हाण)
संकटांना सामोरं गेल्याशिवाय ती नाहीशी होत नाहीत. त्यांच्यापासून आपण मानवता. दूर पळालो तर ती अधिकच आपला पिच्छा पुरवितात. संकटे जाण्यासाठीच येत असतात. आपण जिद्द सोडता कामा नये. अग्निमुळे जशी सोन्याची परीक्षा होते तशी संकटामुळे माणसाची परीक्षा होत असते.

१०] ग्रंथ देवो भव । (वा.शि. आपटे)
ग्रंथामुळे ज्ञानाचं भान होतं. विचाराचा प्रचार होतो. भावाचा प्रभाव होतो. कल्पनेची साधना होते . स्फूर्तीची मूर्ती होते. सिद्धीची प्रसिद्धी होते. कला सकलांपर्यंत पोहोचते . ज्ञानधन समाजधन होते. म्हणून ग्रंथ हाच देव मानून त्याचा अभ्यास केला पाहिजे.

११] शरीरं आद्य खलु धर्मसाधनम् ।
शरीर बलवान असल्याशिवाय कोणतंच ऋण फेडता येणार नाही. समाजसेवा करून देवऋण फेडता येणार नाही. सुंदर संतती निर्माण करून पितृऋण फेडता येणार नाही. ज्ञानार्जन करून ऋषिऋण फेडता येणार नाही, ही सर्व ऋणं फेडणं धर्माचा भाग आहे म्हणून धर्मप्रचारासाठी शरीर सुदृढ पाहिजे.

१२] उत्कर्षासाठी उत्कर्षाकडे पाठ फिरवा. (स्वामी रामतीर्थ)
एखादा मनुष्य आपलीच छाया धरावयास गेला तर त्याला कधीच धरता येणार नाही. मात्र त्याने छायेकडे पाठ फिरविली की तीच छाया मग त्याच्या मागून धावू लागते. त्याचप्रमाणे उत्कर्षाकडे पाठ करताच, फळाचा विचार करण्याचे सोडून देताच, यश तुमच्यामागे आलेच म्हणून समजा.

१३] स्वातंत्र्याची आणि समतेची सार्थकता बंधुतेवर अवलंबून असते. (डॉ. आंबेडकर)
समतेवाचून स्वातंत्र्याला अर्थ नाही. समता नसेल तर हुकूमशाहीचा धोका संभवतो. स्वातंत्र्यावाचून समतेला अर्थ नाही. स्वातंत्र्य नसेल तर व्यक्तिविकास होत नाही बंधुता नसेल म्हणजे माणसं माणसांशी माणसांसारखं वागत नसतील तर स्वातंत्र्य आणि समता यांना अर्थ उरत नाही.

१४] ज्ञानाची भूक म्हणजे आत्मविकासाची भूक आहे.
ज्ञानाची भूक म्हणजे म्हणजे प्रगल्भतेची अनिवार कृपा आहे. ज्ञानाची भूक माणसाला पशुकोटीतून वर आणते. आपल्याबद्दल , सृष्टीबद्दल आणि समाजाबद्दल विचार करायला लावते. माणसाला ती द्रष्ट बनवते. माणूस मर्त्य असला तरी मानवता अमर्त्य आहे हे शिकवते.

१५] चांगलेपणाची इच्छा हाच मुहूर्त. (चाणक्य)
चांगलं काम करायचं मनात आलं की ते लगेच करून टाकावं. ते खात्रीने यशस्वी होतं. काही चांगलं करण्याची प्रेरणा जेव्हा होते तोच उचित मुहूर्त समजावा. ती वेळ टळली तर चांगली कृती टळू शकते. म्हणून चांगलं काम करण्याचा संकल्प हाच त्या कामाचा मुहूर्त समजावा.

१६] क्रोध आणि भय ही दुर्बलतेची अपत्ये असतात . (पु. ग. सहस्त्रबुद्धे)
झाकली गेलेली दुर्बलता म्हणजे भय. उघडी पडलेली दुर्बलता म्हणजे क्रोध, आपल्याला समजलं नाही, समजाविता येत नाही ही जाणीव झाली की लोक रागावतात. मुद्यावरून गुद्यावर येतात. म्हणून भय आणि क्रोध बाह्यतः वेगळे दिसत असले तरी दोहोंची जननी दुर्बलताच असते.

१७] प्रार्थना म्हणजे आत्मशुद्धीसाठी ईश्वराला घातलेली हाक. (म. गांधी)
प्रार्थना म्हणजे नवस नाही. देवाबरोबर करार नाही. आत्मशुद्धी करिता , मनःशुद्धी करिता आणि आत्मपरीक्षणाकरता प्रभूला घातलेली ती साद आहे. प्रार्थनेने अहंकार आणि गर्व दूर होतो. शरीराला जशी अन्नाची तशी आत्म्याला प्रार्थनेची गरज असते. प्रार्थना म्हणजे मनाचे स्नान .

१८] तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता हे तारुण्याचे तीन ‘त’ कार आहेत. (दादा धर्माधिकारी)
तेजस्विता म्हणजे वीरवृत्ती वीरवृत्ती म्हणजे निर्भयता. तपस्विता म्हणजे कमाई आरामाने न मिळविता श्रमाने मिळविणं. तत्परता म्हणजे पत्करलेल्या कार्याशी तदाकार होण्याची वृत्ती. तरुण हा निर्भय, चारित्र्यसंपन्न आणि सामाजिक बांधीलकी स्वीकारणारा असला पाहिजे.

१९] माणूस किती ‘मिळवितो’ यापेक्षा किती देतो यावर त्याची श्रीमंती ठरते. (तैत्तिरीय उपनिषद)
आपले जीवन हे आपणास मिळालेलं एक दान आहे. त्याचे दान करीत राहिल्यानंच त्याचं मोल वाढतं. दानाची उच्चता प्राप्त होते. द्रव्य साठवून ती प्राप्त होत नाही. नेहमी दात्याची भूमिका घ्यावी. परतीची अपेक्षा करू नये. श्रद्धेने, आदराने, नम्रतेने, सत्याने भरपूर द्यावं.

२०] नशिबात असेल तसं घडत पण आपण जे करू त्याचप्रमाणं नशीब घडतं.
नशीब पुरुषार्थाच्या मागं जातं. ते प्रयलाच्या पाठोपाठ येतं. जो निजतो त्याच नशीब निजतं जो बसतो त्यांच नशीब बसत, जो चालतो म्हणजे प्रयत्न करतो त्याचं नशीब पण चालतं. म्हणून आपण जे करू त्याप्रमाणे नशीब घडतं. शहाणी माणसं कर्तृत्त्वानं नशीब घडवितात.

२१] करा जिव्हाळा निसर्गापाशी, देईल तो सुखाच्या राशी. (मुमताज रहिमतपुरे)
परमेश्वराचेच दुसरं नांव निसर्ग. निसर्गावर निर्व्याज प्रेम करावं. परमेश्वर त्याच्यावर प्रसन्न होतो.

२२] तेच हात पवित्र असतात जे दीन दुःखितांचे अश्रू पुसतात .
दीन दुःखितांची सेवा म्हणजे प्रभूची सेवा. रंजल्या गांजलेल्यांना जो आपलं म्हणतो तो साधू, तोच देव समजावा. शांततेची गुरुकिल्ली म्हणजे ही प्रेमाची जाणीव. दीन दुःखितांवर प्रेम करणं, त्यांची सेवा करणं हाच खरा धर्म म्हणून प्रार्थनेसाठी जोडलेल्या हातापेक्षाही सेवा करणारे हात पवित्र असतात.

२३] नम्रतेसारखा सद्गुण नाही.
नम्रता म्हणजे लवचिकपणा. लवचिकपणात तणावाची शक्ती आहे. जिंकण्याची कला आहे. शैर्याची पराकाष्ठा आहे. नम्रता ही प्रेमाची आणि स्नेहाची जननी आहे. विनम्र वृत्ती दैवी गुणांचं मूळ आहे. नम्रता म्हणजे हृदयस्थ परमेश्वराचा सन्मान किंवा परमेश्वराच्या साक्षात्काराचा प्रमुख आविष्कार.

२४] दारिद्र्याची गंगोत्री पैशाच्या अभावात नसून ती माणसाच्या विचारात आहे.
माणूस आपल्या विचारांचा पुतळा असतो. गरिबी पैशांन नाही तर प्रथम मनानं सुरू होते. ज्याचे विचार दरिद्री तो श्रीमंत असूनही दरिद्री असतो. ज्याचे विचार थोर तोच खरा श्रीमंत. श्रीमंतीतल्या दारिद्र्यापेक्षा, दारिद्र्यातील श्रीमंती समाजाला उन्नत करते. जो उद्योगी, प्रयत्नवादी, आशावादी आहे त्याला श्रीमंत बनणे अवघड नाही.

२५] जीवनाचे नंदनवन करण्याचं सामर्थ्य चिंतनात असतं. (डॉ. गं. श्री . खैर)
चिंतनामुळे नवनवीन कल्पना सुचतात विचारांत स्पष्टता येते. शाश्वत वाङ्मय निर्माण होतं, तत्त्वज्ञान सुचतं. महत्त्वाचे शास्त्रीय शोध लागतात. जीवनाला आकार देण्याचं सामर्थ्य चिंतनात आहे. चिंतनामुळे जीवनाला उच्चपणा व उदात्तपणा प्राप्त होतो.

पुढे वाचा – 300+ सुंदर मराठी सुविचार

काय शिकलात?

आज मी तुम्हाला 25 Marathi Suvichar with Meaning – मराठी सुविचार अर्थासहित दिले आहे. पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: